January 31, 2023
Need to plant Good Thoughts article by rajendra ghorpade
Home » चांगले विचार हे पेरावे लागतात
विश्वाचे आर्त

चांगले विचार हे पेरावे लागतात

अनेक जण हजारो पारायणे करतात. पण तरीही मनाची शुद्धी होत नाही. कारण वाचन मनापासून केले जात नाही. मनाला घडविण्यासाठी पारायणे केली जावीत. त्या मनात चांगल्या विचारांची पेरणी व्हावी यासाठी पारायणे असावीत. पारायणे ही मनाची मशागत आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

न पेरितां सैंध तृणें । उठती तैसें साळीचें होणें ।
नाहीं गा राबाउणें । जयापरी ।। 95 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणें न पेरतां गवत जिकडेतिकडे आपोआप उगवतें. त्याप्रमाणें साळी आपोआप उगवत नाहीत. साळीच्या पिकांस पेरणी व राब ही करावी लागतात.

गवत, तणे पेरावी लागत नाहीत. पाऊस पडला की ती आपोआप उगवतात. त्यांची वाढ ही नैसर्गिक आहे. अशी निरुपयोगी झाडे शेतात वाढतात. पण चांगली पिके, बागा ह्या फुलवाव्या लागतात. त्यांची पेरणी करावी लागते. नकोशा गोष्टींची वाढ नैसर्गिक होते. जीवनातही अनेक नको असलेल्या गोष्टी घडतात. या निरुपयोगी तणांचा नाश करावा लागतो. याचा नाश केला नाही तर त्याचा पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. चांगली पिके मात्र घ्यावी लागतात. त्यांची पेरणी करावी लागते. त्यासाठी जमिनीची मशागतही करावी लागते.

चांगल्या गोष्टींसाठी कष्ट हे करावे लागतात. वाईट विचार मनात सहज उत्पन्न होतात, पण चांगले विचार मनात उत्पन्न करावे लागतात. ते उत्पन्न व्हावेत यासाठी चांगल्या विचारांचे ग्रंथ, पुस्तकांचे वाचन केले जाते. चांगल्या विचारांच्या निर्मितीसाठी पूजापाठ केले जातात. यासाठी नेहमी मनाचे श्लोक म्हणावेत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे कशासाठी तर मनात चांगले विचार उत्पन्न व्हावेत. श्लोकांचे पठण, हरिपाठ हे सर्व चांगले व्यक्तिमत्व घडविण्याची साधने आहेत. आपले धार्मिक ग्रंथ हे व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके आहेत. या ग्रंथाच्या पठणाने मनात चांगले विचार उत्पन्न होऊन विकास होतो. पण वाचन वरवरचे नसावे. त्यामध्ये काय सांगितले आहे याचा विचार व्हावा.

अनेक जण हजारो पारायणे करतात. पण तरीही मनाची शुद्धी होत नाही. कारण वाचन मनापासून केले जात नाही. मनाला घडविण्यासाठी पारायणे केली जावीत. त्या मनात चांगल्या विचारांची पेरणी व्हावी यासाठी पारायणे असावीत. पारायणे ही मनाची मशागत आहे. येथे वाईट विचारांच्या तणांचा नाश करावा लागतो. पेरणीअगोदरही जमिनीची मशागत करावी लागते. जमीन पेरणी योग्य करावी लागते. तरच त्यामध्ये पीक चांगले येते. मनात चांगले विचार उत्पन्न व्हावेत यासाठी पारायणाची मशागत करावी. चांगले विचार हे पेरावे लागतात. सद्गुरू शिष्यामध्ये या विचारांची पेरणी करतात. अनुग्रह देतात म्हणजे काय? तर चांगल्या बीजाची ती पेरणीच असते.

नदी कोणी तयार केली? नदीची निर्मिती नैसर्गिक आहे. नदी, नाले, ओढे हे आपोआप तयार झाले आहेत. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने त्याची निर्मिती झाली आहे. नदीचा ओघ हा स्वाभाविक आहे, पण विहीर ही मुद्दाम खणून तयार करावी लागते. उन्हाळ्यात नदीचे पाणी आटते. पिण्यायोग्य राहत नाही. यासाठी विहीर खणून चांगल्या पाण्याचा शोध घ्यावा लागतो. चांगले विचार हे उत्पन्न करावे लागतात. गवत पेरावे लागत नाही ते आपोआप येते. पण चांगली बाग तयार करायची असेल तर तेथे गवताची पेरणी करावी लागते. चांगले कर्मासाठी चांगल्या विचारांची पेरणी ही गरजेची आहे. यासाठी मनाला चांगल्या विचारांची सवय ही लावायला हवी.

Related posts

प्रेमाचा अंकुर फुटण्यासाठीच झाका दान

अध्यात्माच्या प्रवेशाने मन हळूहळू प्रपंचातून बाहेर पडते

वसुबारस स्पेशलः श्रीकृष्णरुपी गाय

Leave a Comment