आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
ऑगस्टमधील पाऊस-पाणी व पिके
प्रश्न – संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती कशी राहील ?
माणिकराव खुळे – अ) सरासरीपेक्षा अधिक (१०६% व अधिक)पावसाच्या शक्यतेतील ९ जिल्हे असे – पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नागपूर
ब) सरासरीइतक्या (९६ ते १०४%) पावसाच्या शक्यतेतील ८ जिल्हे असे – नंदुरबार, जळगांव, जालना, बीड, नांदेड, परभणी, जालना, भंडारा
क) सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५%) पावसाच्या शक्यतेतील १९ जिल्हे असे – धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सांगली, तसेच संपूर्ण विदर्भ (भंडारा व नागपूर वगळता) आणि कोकणातील पालघर, मुंबईशहर, मुंबई उपनगर, रायगड
प्रश्न – ऑगस्टमधील धरणांची स्थिती कशी असेल ?
माणिकराव खुळे – ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा घाटमाथ्यावरच अधिक कोसळणार आहे. त्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमधील सह्याद्रीच्या कुशीतील सर्व धरणे भरून ओसंडतील. गोदावरी खोऱ्यातील ह्यापुढील सर्व जल स्रोतांचे प्रवाह (रन-ऑफ रेन वॉटर) हे आता जायकवाडीच्या उदरातच विसावतील त्यामुळे महाराष्ट्रातील जायकवाडीसह इतर सर्व मोठे जल-प्रकल्प लवकरच भरून नद्यांचे प्रवाह ही खळाळतील.
प्रश्न – येत्या दोन दिवसातील पावसाची स्थिती कशी राहील ?
माणिकराव खुळे – गेल्या तीन दिवसापासून मान्सूनच्या सक्रियते नंतर आज व उद्याही ( ४ व ५ ऑगस्ट) महाराष्ट्रात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आहेच. आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यच्छायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा करू या ! मंगळवार ( दि. ६ ऑगस्ट) पासून मात्र कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम टिकून राहण्याची आहे.
प्रश्न – सध्याच्या तीन दिवसातील पाऊस कश्यामुळे?
माणिकराव खुळे – सध्या अरबी समुद्रात विशेषतः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर सम हवेचा दाब जोडणाऱ्या प्रत्येक दोन सम-तल रेषा (आयसोबार्स) मधील कमी झालेल्या अंतरामुळे, हवेच्या दाबाचा ढाळ खोल झाला आहे. म्हणजेच प्रत्येक दोन आयसोबार मधील अंतर कमी होवून ‘ प्रेशर ग्रेडीएन्ट ‘ बळकट झाला आहे. परिणामी आपोआपच समुद्र सपाटीपासून दिड किमी. हवेच्या जाडीत सोमालिया जेटच्या पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांचा वेग ताशी ३५ ते ७५ किमी पर्यन्त वाढून कोकण किनारपट्टीवर आदळत आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेला बळकट प्रेशर ग्रेडीएन्टचा (उलटा) द्रोणीय आसही घाटमाथ्यावर पाऊस देत आहे.
प्रश्न – खरीप पिके अन पाऊस यावर कसा परिणाम राहील ?
माणिकराव खुळे – सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५ %) पावसाच्या शक्यतेतील महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात ऐन दाणा – भरणीत आलेल्या खरीप पिकांना ऑगस्टमध्ये पावसाची ओढ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ह्या १९ जिल्ह्यातील कमी पावसाच्या शक्यतेतही पावसाचे वितरण जर समान झाले, म्हणजे पावसाळी दिवसाची संख्या ऑगस्टमध्ये जर वाढली तर पिकांना दिलासा मिळू शकतो. विशेषतः नगर, नाशिक, व छत्रपती संभाजीनगर अश्या तीन जिल्ह्यात पावसाची परिस्थिती जैसे थे च राहण्याची शक्यता जाणवते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.