पुणे तिथे काय उणे, हतबल झाले जिणे
ऊसागत पिळली जनता सत्ता गाते गाणे
व्यापाराची विण उसवली
उद्योगाची रित नासवली
बेरोजगारांची पिचकी झुंड
देवदर्शनात बसवली…
गाजर गवत झाले नेते
तिथे बटिक सत्ता राणी
पर्वतीच्या डोळ्यात मग
खळकन आले पाणी
मुळा मुठेच्या पाण्यात गटाराचे वहाणे
पुणे तिथे काय उणे, हतबल झाले जिणे
ऊसागत पिळली जनता सत्ता गाते गाणे
भूमाफिया दरोडेखोर
कोयता गॅंगची थरथर
ड्रग्ज विळख्यात हॅंग
शिक्षणाचे माहेरघर…
गोल्डमॅन साखळी छाप
डिजिटल झाले दादा
भाषणापुरताच उरला
गॅरंटीचा वादा
जनता घेते उसासे अन वर्दी टिपते दाणे
पुणे तिथे काय उणे, हतबल झाले जिणे
ऊसागत पिळली जनता सत्ता गाते गाणे
विद्यार्थी शिकतो येथे
स्वप्न उराशी घेऊन
महागाईच्या तप्त झळा
जगतो प्राण मुठीत घेऊन
आईबापाच्या कष्टाचे मोल
अंत:करणात ठेऊन ओल
भूकभाकरी भागवण्या
आयुष्य फिरते गोल
हतबलतेला देऊ माती अखंड जोडू मने
पुणे तिथे काय उणे, हतबल झाले जिणे
ऊसागत पिळली जनता सत्ता गाते गाणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.