बिघडलेला बाजार
टमाट्याचा झाला चिखल
वांग बसलं रुसुन.
दाळींबाला गेले तडे
खुदकन हसुन
फ्लावर आणि कोबीला
तोलत नाही काटा.
रुपायात कोथिंबीर
करु लागली टाटा
माॅलमध्ये दाळदाणा
घेतो आहे झोका.
फिरत आहे उघडीच
गोरीपान मका
गवार आणि चवळी
रडू रडून नांदली.
कवाळ लिंबु मिरची
दारावावर बांधली
मटार फिरे गर गर
काकडीच्या मागे
भोपळा आणि दोडका
झाले झोपेतून जागे
पुंगी वाजवी गाजर
मिरची झाली लाल.
शेडमधुन शिमला आली
केले बटाट्याचे हाल
संत्री झाले मंत्री
कांदा लागला रडु.
गोड गोड साखर
कारल्यावाणी कडु
मेथीचाही सुकला चेहरा
भोंड आली भेंडीला.
राहिली नाही किंमत
नारळाच्या शेंडीला
द्राक्षाला चढली झिंग
औषधाचे डोस घेवून.
वायनरीची उतरली
देशीची रांग पाहुन
चुका काढून लसणाच्या
पलक घाली घोळ.
दलालाने लुटली शेती
सरकार मागे टोळ
कॅशलेस मशिन पाहुन
रडु लागल्या नोटा.
ज्वारीच्या अंगावर
फुटु लागला काटा
रुपायाच्या मंदित
रुतुन बसलं घोडं.
चुकलेल्या हिशोबाचं
सोडवा तुम्ही कोडं
कवी – शिवाजी सातपुते, मंगळवेढा
९०७५७०२७८९ / ९८६०६२४७३२
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.