September 9, 2024
Sourabh Shukla Tu Si Grate ho Kiran Mane article
Home » सौरभ शुक्ला, तुस्सी ग्रेट हो…
मनोरंजन

सौरभ शुक्ला, तुस्सी ग्रेट हो…

अभिनेता म्हणून हे लै लै लैच मोठ्ठं चॅलेंज होतं. सव्वादोन तास पूर्णवेळ मी स्टेजवर – आठ वेगवेगळ्या भूमिका, वेगळी बेअरिंग्ज, भिन्न आवाज, एकही ‘ब्लॅकआऊट’ नाही… सगळा कस पणाला लावणारं नाटक. मध्येमध्ये चार-पाच पात्रंही पेरली होती.

किरण माने

“किरण्या, तिकीट का काढलंस? लै श्रीमंत झालास का?” असं म्हणत किशोर कदमनं माझ्या खिशात शंभर रूपये कोंबले… अठ्ठावीस वर्षांपूर्वी, ‘स्ट्रगल’च्या त्याकाळात, शंभर रूपये खूप मोठ्ठे होते माझ्यासाठी.. मला नाटकाची नाईट ऐंशी रूपये मिळत होती ! तरीही पृथ्वी थिएटरवर जाऊन एक हिंदी दीर्घांक पहाण्यासाठी मी तिकीट काढलंवतं…अचानक किशोर समोर आला. त्याच्या ‘रिॲक्शन’ या संस्थेचा हा प्रयोग होता.

सातार्‍यावरनं आल्यानंतर ‘पृथ्वी थिएटर’चं वातावरण पहिल्यांदाच अनुभवत होतो. तो एकपात्री प्रयोग सुरू झाला… आणि त्या अभिनेत्याचा भन्नाट परफाॅर्मन्स पाहून अक्षरश: खुर्चीला खिळून गेलो. तासाभराच्या त्या अद्भूत अभिनयाच्या आविष्कारानं मना-मेंदूवर कब्जा केला. त्या दीर्घांकाचं नांव होतं ‘पियानो बिकाऊ है’ आणि तो अभिनेता होता सौरभ शुक्ला !

नंतर माझा मित्र प्रसाद वनारसे यानं त्याच दीर्घांकाचं मराठीकरण केलं-‘हॅलो’. अस्सल मराठमोळं वाटावं इतकं भन्नाट लिहीलंवतं त्यानं. ते स्क्रीप्ट मी घरी एकटाच वाचत बसायचो. घरातल्या घरात परफाॅर्मन्सही सुरू केले.. त्यानंतर हळूहळू या गोष्टीला पंधरा सोळा वर्ष उलटून गेली.

तोपर्यन्त इकडं हळूहळू माझी व्यावसायिक नाटकातल्या करीयरची गाडी रूळावर आली होती. लता नार्वेकरांचं ‘मायलेकी’ नाटक करत होतो. एक दिवस गडकरी रंगायतनमधल्या व्हिआयपी रूममध्ये लताबाईंना मी ‘हॅलो’चा परफाॅर्मन्स करुन दाखवला. त्यांना ते लैच आवडलं. म्हणाल्या, “यावर तू दोन अंकी नाटक लिही. मी प्रोड्यूस करते.” एवढंच नाही, तर लगेच प्रसाद वनारसेला फोन लावून त्यांनी परवानगीही मिळवली !

सातारला माझा दोस्त झाकीरच्या घरी राजीव मुळ्ये आणि मी, दोघांनी अनेक चर्चा करुन पंधरा दिवसांत दोन अंकी नाटक लिहीले. बघता-बघता ‘श्रीचिंतामणी’तर्फे हे नाटक रंगभुमीवर आलं. नाटकाचं नांव होतं ‘ती गेली तेव्हा’ !

अभिनेता म्हणून हे लै लै लैच मोठ्ठं चॅलेंज होतं. सव्वादोन तास पूर्णवेळ मी स्टेजवर – आठ वेगवेगळ्या भूमिका, वेगळी बेअरिंग्ज, भिन्न आवाज, एकही ‘ब्लॅकआऊट’ नाही… सगळा कस पणाला लावणारं नाटक. मध्येमध्ये चार-पाच पात्रंही पेरली होती. नाटक थोडं आडवळणाचं असल्यामुळं मीच दिग्दर्शन करायचं ठरवलं. हिराॅईन योगिनी चौक होती, तर रोहीत चव्हाण, अजिंक्य ननावरे या सातार्‍यातल्या माझ्या ग्रुपमधल्या कलाकारांनाही मी संधी दिली.

या नाटकानं अभिनेता म्हणून माझं आत्मबळ एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं ! एकजात सगळ्या समीक्षकांनी या नाटकाचं आणि माझ्या भुमिकेचं भरभरुन कौतुक केलं. लोकसत्ताचे रविंद्र पाथरे यांनी अर्धा पान भरून लिहीलं. “किरण माने यांची आवाजावरची हुकुमत अलिकडच्या काळात कुठल्याच अभिनेत्यात आढळुन येत नाही.” असंही लिहीलं.. तर म.टा.च्या जयंत पवार यांनी ‘एक भक्कम नट’ अशी भली मोठी हेडलाईनच दिली ! ठाण्याचे मधुकर मुळुक यांनी ‘मराठी रंगभुमीला काशीनाथ घाणेकर मिळाले’ अशी हेडलाईन देऊन अफाट कौतुक केलं…

आज मागं वळून पहाताना जाणवतं.. एका अफलातून अभिनेत्याच्या परफाॅर्मन्सपासून मिळालेली प्रेरणा आपल्याला कुठून कुठपर्यन्त घेऊन जाते !

सौरभ शुक्ला, तुस्सी ग्रेट हो. लब्यू पाजी ❤️


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

चहाते…

साईप्रसाद अभिनयाकडे कसा वळला ?

यंदा उसाचे 465.05 दशलक्ष टन इतके विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading