September 9, 2024
Paradise of the neglected Tapovan
Home » उपेक्षितांचे नंदनवन तपोवन
मुक्त संवाद

उपेक्षितांचे नंदनवन तपोवन

शिवाजीराव पटवर्धनांचे कार्य म्हणजे एक सोनेरी पान. प्रज्ञाशील, करुणा या गौतम बुद्धाच्या तत्त्व त्रयीप्रमाणे संपन्न असलेल्या या तपस्यांचे जीवन म्हणजे एक अग्नि पर्वच
चणे खावे लोखंडाचे ! तेव्हा ब्रह्म पदी नाचे !
एवढी महान तपश्चर्या त्याग, आत्मसमर्पण सेवाभाव. कर्तव्य तत्परता अभावानेच पाहायला मिळतो.

राखावी बहुतांची अंतरे !
भाग्य येते तदनंतर्ये !

या सुभाषिता नुसार एक रोमांचकारी अनुभव आला. तपोवनचा परिसर पाहिल्यानंतर माणूस व्यापक बनतो: आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून आपल्या उर्वरित आयुष्यात एक खारुताईचा वाटा म्हणून आपण या दीन; उपेक्षित, दुःखी, असाह्य बांधवांना मदत करावी हा संकल्प घेऊन आम्ही अमरावतीपासून सात किलोमीटर अंतर असलेल्या तपोवनला भेट दिली. पूर्वी अगदी शाळेत शिकत असताना या कुष्ठरोगी बांधवांची भेट घेतली. त्यावेळी त्यांची वसाहत पाहण्याचा योग आला. परंतु त्याबद्दल कुठल्याच प्रकारची माहिती स्मृती पटलावर कायम राहिली नाही, पण आज त्याचा भव्य दिव्य पसारा पाहून मनामध्ये खजील झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या मर्यादित जीवनाच्या बाहेर आल्यानंतर जगात असेही त्यागी निस्पृह लोक असतात हे पाहून अवाक झाल्याशिवाय राहणार नाही.

पोटच्या मुलाला जन्म देऊन बाप होणारे सगळीकडेच आहेत, परंतु अनाथांचा, उपेक्षितांचा, नाकारलेल्या दुःखितांचा बाप होण्याची किमया आणि कर्तृत्व बोटावर मोजण्याची त्यांच्याच कर्तृत्वात असते. तो अनाथांचा मायबाप म्हणजे डॉ. शिवाजीराव पटवर्धन. त्यांनी एक जुलै 1950 रोजी कुष्ठरोग्यांसाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळाअंतर्गत तपोवनची स्थापना केली. कुष्ठ महर्षी डॉ. पटवर्धन उर्फ दाजी साहेब तसे कर्नाटक मधले पण अमरावती आपली कर्मभूमी करणाऱ्या या महापुरुषाने सर्वस्वाचा होम कुंड पेटवून मानवी मूल्याच्या स्थापनेसाठी आपला देह झिजविला: आपल्या अफाट इच्छाशक्तीने व दुर्दम्य आशावाद समोर ठेवून असामान्य त्यागाने या देशात जे कर्तव्य करून दाखविले त्याबद्दल अभिमान वाटावा असेच हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य उत्तुंग हिमालयाप्रमाणे व त्यांची दूरदृष्टी पाहता माणूस दिगमुढ होतो व खालील ओळी आठवतात
जगी ज्यास कोणी नाही ! त्यास देव आहे !

समाजात कुष्ठरोग उपेक्षित घटक म्हणून ओळखला जात होता. पूर्वी त्यांना रस्त्यावर, घराच्या पडवी मध्ये ठेवले जाई. पण हा मसीहा अवतरीत झाला. अन् हजारो उपेक्षितांच्या जीवनातील अंधार, मरगळ दूर करून त्यांना नवसंजीवन मिळाले. राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहून महात्मा गांधीच्या अपूर्ण राहिलेल्या कुष्ठ कार्याला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तपोवन विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या स्थापनेतून त्यांनी समाजाने नाकारलेल्या बहिष्कृत केलेल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला. स्वाभिमान आणि स्वावलंबन हे देखील त्यांना शिकविण्यात आले. नाकारलेल्या या माणसांमध्ये दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण करण्याचे तपोवन येथे प्रयोग झाले.

अमरावतीपासून सात किलोमीटर अंतरावरील एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काटेरी वनात एक आदर्श ग्राम निर्माण करण्याचे स्वप्न दाजी साहेब पटवर्धनांनी बघितले: कुष्ठरोगावर उपचार करता करता त्यांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी नवनवीन प्रयोग तपोवनात करायला सुरुवात केली. दाजी साहेबांची सेवा आणि नाकारलेल्या कुष्ठ बांधवांना माणूस म्हणून मिळणारी वागणूक यामुळे महाराष्ट्रभरातून नाकारलेला कुष्ठ बांधव तपोवनात येऊ लागला.

शिवाजीराव पटवर्धनांचे कार्य म्हणजे एक सोनेरी पान. प्रज्ञाशील, करुणा या गौतम बुद्धाच्या तत्त्व त्रयीप्रमाणे संपन्न असलेल्या या तपस्यांचे जीवन म्हणजे एक अग्नि पर्वच
चणे खावे लोखंडाचे ! तेव्हा ब्रह्म पदी नाचे !
एवढी महान तपश्चर्या त्याग, आत्मसमर्पण सेवाभाव. कर्तव्य तत्परता अभावानेच पाहायला मिळतो.

जे का रंजले गांजले !
त्यासी म्हणे जो आपले
तोचि साधू ओळखावा ! देव तेथेचि जाणवा असे व्यक्तिमत्त्व असलेल्या या महात्म्याने कुष्ठ बांधवांना आत्मनिर्भर करण्याकरता विविध उद्योगधंदे सुरू केले आहेत. सुतार काम, लोहार काम, बँडेज, प्रिंटिंग प्रेस, सतरंजी विणणे इत्यादी कामाचे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविले. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठे मुद्रणालय सुभाष मुद्रणालय या नावाने प्रसिद्ध आहे. येथे सरस्वती वाचनालय, बालगुन्हेगार केंद्र, कुमारी माता व त्यांच्या शिशुविहाराची स्थापना त्यांनी केली. तपोवन वासियांमध्ये भक्ती निर्माण व्हावी म्हणून एक भजन विभाग ही आहे, महर्षी शल्य भवन नावाचे मोठे रुग्णालय आहे.

कुष्ठरोग्यांचे विवाहही येथे लावून देण्यात येतात. कुष्ठरोगांच्या मुलांसाठी महामना मालवीय नावाची शाळाही येथे उघडण्यात आली आहे. तेथील रस्त्यांनाही शिस्त आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ असून ठीक ठिकाणी संताचे पुतळे व सुविचार असे संस्काराचे मंदिर म्हणजे तपोवन.

जो स्वतःसाठी जगला तो मेला !
व जो दुसऱ्यासाठी जगला तो जगला !
माणसाच्या शरीराची वाढ म्हणजे विकास नसून बुद्धीचा विकास होणे गरजेचे आहे. सुमारे 400 पेक्षा जास्त लोक तपोवन परिसरात राहतात. सुमारे दोनशे रुग्ण पुनर्वसित झालेले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग व समाज कल्याण कोर्ट कमिटेड मुले मिळून जवळपास 1600 रुग्ण तपोवनाच्या आश्रयास आहेत.

पुष्पा सुनीलराव वरखेडकर,
माजी पर्यवेक्षिका, पी डी कन्या शाळा, वरूड


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

केळी लागवडीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे देखील आर्थिक सहाय्य

होय, निसर्गच आपला खरा गुरु, यासाठी करा त्याची सेवा  

ओळख आणि व्यवस्थापन काटेरी अळी (घोणस अळी) चे….!

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading