वन्यजीव सप्ताहनिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने प्रबोधनाचा उपक्रम राबविला. सुमारे २००० लोकांचे प्रबोधन या संस्थेने या सप्ताहात केले.
सन २०२४ या वर्षातील ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा वन्यजीव सप्ताह म्हणून सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. खरेतर निसर्गाचे संवर्धन व वन्यजीवांचे जतन ही आज काळाची गरज बनलेली आहे. आपण निसर्गाला व वन्यजीवांना जपले तर निसर्ग अबाधित राहून आपल्याला जपेल. याच मुख्य उद्देशाने “वर्ल्ड फॉर नेचर” ही संस्था प्रामुख्याने वन्यजीव संरक्षण व समाजात निसर्ग संवर्धनासाठी, वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत आहे. शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग, वन्यजीव व जैवविविधतेची ओळख व्हावी व त्यांच्या मनात निसर्गाविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी वन्यजीव सप्ताह काळात जवळपास २००० लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वर्ल्ड फॉर संस्थेने यशस्वी कार्यशाळा घेतल्या.
यामध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा, जिल्हा कोल्हापूर या शाळेमधील २०० विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. मेघोलीपैकी वरचा धनगरवाडा ( तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर ) आणि मेघोलीपैकी खालचा धनगरवाडा ( तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) दोन्ही धनगरवाडे मिळून ४० कुटुंबे होती. या ठिकाणी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. रोझरी इंग्लिश हायस्कूल आजरा व स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा या दोन शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. विद्या मंदिर पोळगाव, आदर्श हायस्कूल शिरसंगी व केंद्रीय प्राथमिक विद्यामंदिर शिरसंगी या तीन शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. धनंजय विद्यालय व ज्युनियर कॉलेज नागणवाडी तालुका चंदगड या शाळेत ३०० विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. पद्मभूषण वसंतदादा विद्यालय जगंमहट्टी व मराठी विद्या मंदिर जगंमहट्टी तालुका चंदगड या दोन्ही शाळेत मिळून ३०० विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाटाला लागून असलेल्या आजरा, चंदगड, भुदरगड या तालुक्यातील खेड्यापाड्यातल्या, वाड्यावस्त्यावरील, डोंगराळ भागात जाऊन याठिकाणी सर्पजनजागृती, वन्यजीव संरक्षण व वन्यजीवांची निसर्गातील भूमिका या विषयावर कार्यशाळा घेण्यात आल्या.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.