December 7, 2023
All deeds should be done keeping the mind in God place
Home » प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून करावीत सकळ कर्मे 
विश्वाचे आर्त

प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून करावीत सकळ कर्मे 

कर्म संन्यास आणि त्याग हा विषय समजण्यासाठी तसा खूप कठीण आहे. यात भक्ताला अनेक प्रश्नही पडतात. यासाठी हा विषय तज्ज्ञांकडूनच, आत्मज्ञानी संताकडूनच समजून घेणे कधीही फायदेशीर ठरते. कारण आत्मज्ञानी संत त्यांना आलेल्या अनुभुतीतून हे सर्व सांगत असतात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जें निपटूनि कर्म सांडिजे । तें सांडणें संन्यासु म्हणिजे ।
आणि फलमात्र का त्यजिजें । तो त्यागु गा ।। ९२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, मुळी कर्मच करावयाचे नाही अशा कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावें आणि कर्म करून त्या कर्माचे जे केवळ फळ टाकणे, त्याला त्याग म्हणावे.

संन्यासवृत्ती धारण करायची म्हणजे नेमके काय करायचे ? बाबा महाराज आर्वीकर यांनी याचा अर्थ सुंदरपणे सांगितला आहे. ते म्हणतात, संन्यासवृत्ती धारण करून म्हणजे कर्मफलप्राप्तीच्या संकल्पाचा त्याग करून परमेश्वराच्या ठायी रममाण होणारे भक्त सर्व प्रकारची कर्मे करूनही कांहीच करत नाहीत. म्हणजेच तो भक्त फलेच्छने कर्मच करीत नाही. तर देवार्थच सेवा, पूजा, गौरव, महिमा असे समजून तो राबत असतो. याचा अर्थ तो कर्म जरी करत असला तरी ते कर्म सद्गुरुच अथवा भगवंत करत असतात असा त्याचा भाव असतो. कर्म भगवंतानी केले मग येणारे फळ हे भगवंतानीच दिले. म्हणजेच कर्मातून निर्माण झालेली फळे ही भगवंतांनीच भक्तासाठी प्रसाद म्हणून दिलेली असतात. कर्मफळ हे आता फळ राहीले नाही तर तो भगवंताचा प्रसाद झाला आहे. प्रसाद म्हणूनच त्याचा स्वीकार भक्ताने करायचा आहे. यातून भक्तामध्ये प्रेमसुख, निरहंकारता, निष्कामता उत्पन्न होते.

कर्म संन्यास आणि त्याग हा विषय समजण्यासाठी तसा खूप कठीण आहे. यात भक्ताला अनेक शंका अन् प्रश्नही पडतात. यासाठी हा विषय तज्ज्ञांकडूनच, आत्मज्ञानी संताकडूनच समजून घेणे कधीही फायदेशीर ठरते. कारण आत्मज्ञानी संत त्यांना आलेल्या अनुभुतीतून हे सर्व सांगत असतात. हे सर्व समजावून सांगतात बाबा महाराज आर्वीकर यांनी एक उत्तम उदाहरण दिले आहे. आपण ईश्वराला नैवेद्य अर्पण करतो आणि त्याचे ग्रहण स्वतःच करतो. बऱ्याचदा हे सर्व दिखावा म्हणूनच केले जाते. नैवेद्य दाखवयाची पद्धत आहे म्हणून नैवेद्य दाखवला जातो किंवा अर्पण केला जातो. काहीजण देवाला नैवेद्य दाखवतात अन् तो नैवेद्य परत कसा घ्यायचा. म्हणून तो सोडून देतात. साहजिकच ते या प्रसादाला मुकतात. हे दोन्ही प्रसंग केवळ रुढी, परंपरा म्हणून पाळल्या जातात. याला खरी भक्ती म्हणायचे का ? सरसकट सर्वच देवळात हा प्रकार पाहायला मिळतो. यात भक्ताला अन् देवळात नैवेद्य अपर्ण करणारा पुजारी या दोघांनाही ईश्वराविषयी श्रद्धा, प्रेम असते असे आपणास वाटते का ? हा प्रश्न आता आपण स्वतःच स्वतःला विचारलेले उत्तम आणि त्यानुसार आचरणात बदल केलेले उत्तम ठरेल.

सांगण्याचा उद्देश इतकाच की, अशा या नैवेद्याचा भगवंत कधीही स्वीकार करत नाहीत. यासाठी सर्व कर्मे ही भगवंताच्या ठायी चित्त ठेवून करायला हवीत, तरच त्या कर्मफळाचा आस्वाद घेऊन देव त्यांना कर्मबंधमुक्त करतो. फळाच्या आशेने घडलेल्या कर्माचा फलत्याग करणे हाही नाममात्र त्याग असतो, असे बाबा महाराज आर्वीकर सांगतात. त्याचाही स्वीकार भगवंत करत नाहीत. यासाठी प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून सकळ कर्मे आचरणात आणायला हवीत.

Related posts

Saloni Art : छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी…

शतावरी ( ओळख औषधी वनस्पतींची )

जुईच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More