November 21, 2024
वेगळ्या आकांक्षा बाळगणाऱ्या या उपेक्षित मुलीचा संघर्ष
Home » नवदुर्गाःदुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून वाटचाल करणाऱ्या डॉ. उषा रामवाणी – गायकवाड
मुक्त संवाद

नवदुर्गाःदुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून वाटचाल करणाऱ्या डॉ. उषा रामवाणी – गायकवाड

नवरात्रौत्सव
ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

कुटुंबाशी प्रचंड संघर्ष करून प्रसंगी उपोषणाचा मार्ग स्वीकारून शिक्षणाची कास धरली. पैसा, पद यांसाठी शिक्षण न घेता विशुद्ध ज्ञान मिळविण्यासाठी चाललेली तिची धडपड खरोखरीच आश्चर्यकारक आहे. ज्ञानाची आसक्ती, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, जबरदस्त स्मरणशक्ती, शिक्षणासाठी अपार कष्ट आणि त्याबरोबरच प्रचंड मन:स्ताप उषा रामवाणी यांनी सोसलेला आहे.

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता.
अध्यक्ष – शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय, पुणे
मो. 9823627244

दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून वाटचाल करणाऱ्या डॉ. उषा रामवाणी – गायकवाड यांची मातृभाषा सिंधी असली तरी मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय २००६ साली ‘एकोणिसाव्या शतकातील निबंध वाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’ या विषयावर त्यांनी पीएचडी केलं आहे. प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंधाचा प्रा. अ. का. प्रियोळकर हा पुरस्कार प्राप्त झाला. या यशाची दखल मराठीतील सर्व वर्तमानपत्रांनी तसेच ‘ई’ मराठी (कलर्स) आणि सह्याद्री वाहिनीने घेतली. सोलापूर येथील विठाबाई पसारकर स्मृत्यर्थ दिला जाणारा संशोधनासाठीचा पुरस्कार ऑगस्ट २०१८ मध्ये मिळाला. मृण्मयी या दिवाळी अंकाचे सलग ६ वर्षे संपादन – प्रकाशन. काही पुस्तकांचे संपादन व प्रकाशन. अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांत पुस्तक परीक्षणे, लेख, कविता, नामवंतांच्या मुलाखती आणि पत्रे प्रसिद्ध. अनेक शाळा – कॉलेजेसमध्ये शुद्धलेखनविषयक कार्यशाळांचं आयोजन, तसेच अनेक प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांत मुद्रितशोधन आणि संपादन साहाय्य. राज्यस्तरीय अनेक निबंधस्पर्धांत पारितोषिके. ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ग्रंथ पुरस्कार समितीत समावेश. त्यांच्या या ‘ओळखी’च्या मागे अभूतपूर्व अशा प्रदीर्घ संघर्षाची आणि तपश्चर्येची जोड आहे. अत्यंत दुर्मिळ असे दुर्दैवी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले हे हा लेख वाचून आपल्याला समजेल.

लहानपणी मी ‘निर्वासित’ हा शब्द माझ्या आजीच्या तोंडून ऐकला होता. पण त्याचा नीट अर्थ तेव्हा समजला नव्हता. सिंधी लोक महाराष्ट्रातील गावागावांतून व्यापारी म्हणून भारतात स्थिरावले. सिंधी समाजातील वेगळ्या आकांक्षा बाळगणाऱ्या या उपेक्षित मुलीचा संघर्ष किती तीव्र असेल? याची कल्पनाच न केलेली बरी..! असे त्यांचे प्रकाशित झालेले ‘निर्वासित’ हे आत्मकथन वाचून मला वाटले. ‘मी आत्मकथन लिहिण्याचं शाळेत असतानाच ठरवलं होतं. मूलभूत गरजांसाठी मी संघर्ष केला आहे. नवनवीन प्रश्नांचा ढीग उपसण्यातच सर्व शक्ती खर्च झाली. जगावंसं वाटत नव्हतं. मी आयुष्याला कंटाळलेले. माझा आवाज कायमच दबलेला होता’ अशा शब्दांत त्या व्यक्त होतात. उषा रामवाणी यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड, मायेचा ओलावा मिळण्यासाठी आसुसलेले हळवे मन, अर्थार्जनासाठीची खडतर वाटचाल यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची अखंड लढाई चालू होती.

देशाच्या फाळणीनंतर घरदार, जमीनजुमला सोडून, भारतातील गावागावांतून स्थिरावलेले सिंधी लोक, व्यापारी, दुकानदार, सतत शिवणकाम करणाऱ्या, कमी पैसे घेऊन कपडे शिवणार्‍या ह्या बाया आपल्या सभोवती दिसतात. अशा समाजातील एका स्वतंत्र विचारांच्या स्त्रीची ही कहाणी..!

घरात शिक्षणाचे महत्त्व कोणालाच नसताना उषाताईंना मात्र खूप शिकावेसे वाटले. तिच्या इच्छा-आकांक्षा, तिच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या पठडीत न बसणाऱ्या असल्याने कुटुंबात आणि समाजातही ती ‘निर्वासित’ ठरली. तिने कुटुंबाशी प्रचंड संघर्ष करून प्रसंगी उपोषणाचा मार्ग स्वीकारून शिक्षणाची कास धरली. पैसा, पद यांसाठी शिक्षण न घेता विशुद्ध ज्ञान मिळविण्यासाठी चाललेली तिची धडपड खरोखरीच आश्चर्यकारक आहे. ज्ञानाची आसक्ती, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, जबरदस्त स्मरणशक्ती, शिक्षणासाठी अपार कष्ट आणि त्याबरोबरच प्रचंड मन:स्ताप उषा रामवाणी यांनी सोसलेला आहे.

कौटुंबिक व सामाजिक जीवनात सगळ्या प्रथा, परंपरा मान्य करीत त्या जगल्या असत्या तर त्यांचे जीवन सुकर झाले असते. पण वेगळी वाट निवडताना स्वतंत्र विचारांच्या प्रामाणिक स्त्रीला किती अडचणी येतात हे त्यांना जाणून घेताना आपल्याला समजते.

सिंधी समाजातील ‘लासी’ या तळागाळातील व संख्येने मूठभर असलेल्या जमातीत उषा रामवाणी यांचा जन्म झाला. ‘सुखवस्तू आदिवासी’ असलेली ही अप्रगत व अविकसित जमात. वैचारिक मागासलेपण, रूढीप्रियता अशी वैशिष्ट्ये सांगून त्यांच्या जमातीची नेमकी स्थिती त्या डोळ्यांपुढे उभी करतात. या जमातीत हुंडापद्धत नसूनही मुलीचे लग्न ठरलेल्या रिवाजाप्रमाणे करताना आईवडिलांना फार कष्ट सोसावे लागतात. शिक्षणाचा अभाव असलेला, कापडविक्री हा पारंपारिक व्यवसाय करणारा हा समाज. त्या समाजात एखादाच डॉक्टर किंवा वकील असतो. सर्वांचा दृष्टिकोन पक्का व्यापारी. गृहिणी असणे हेच स्त्रीचे अंतिम ध्येय. कुटुंबात मुलगा हवाच हा आग्रह. त्यांच्या समाजातील अनेक मुलींची उदाहरणे देऊन शिक्षणाला तेथे आजिबात महत्व नाही हे त्या सांगतात. अशा समाजातील ‘काकणभर पुरोगामी’ घरात त्यांचा जन्म झाला. ‘आशा’ या त्यांच्या बहिणीने सामाजिक संघर्षाला तोंड देऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला. ताईंना दहावीनंतर शिकायचे होते, पण वडिलांचा तीव्र विरोध होता.

पाच-सहा दिवस त्या जेवल्या नाहीत पण वडिलांनी ऐकले नाही. दोन वर्षे त्यांना शिकता आले नाही. त्यानंतर वडिलांचे मन त्यांच्या गुरूंच्या सूचनेमुळे पालटले. आजीकडे राहून, स्वयंपाक करून अभ्यास सुरू झाला. या उत्साही, हुशार मुलीचे कॉलेजमध्ये कौतुक झाले. निबंध स्पर्धांमध्ये आणि इतर स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसे मिळवली. राष्ट्रीय युवा व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात त्यांनी आठ दिवस सहभाग घेतला. मराठी विषय त्यांच्या आवडीचा. कॉलेजच्या ग्रंथालयातून त्यांनी भरपूर पुस्तके वाचली. वडिलांना शिक्षणासाठी खर्च करणे व्यर्थ वाटत होते. त्यामुळे उषा यांनी नोकरी शोधली. वर्किंग वुमन होस्टेलमध्ये त्या राहू लागल्या. भावाची वृत्ती कर्ज काढून मौज करण्याची होती. त्याला वडिलांनी पैसा दिला. परंतु ताईंना शिक्षणासाठी खर्च करण्याची वडिलांची तयारी नव्हती. बारावीनंतर पुन्हा वडिलांनी तिच्या लग्नाचा आग्रह धरला. जाड भिंगाचा चष्मा असल्याने त्यांना मुलगा सांगून आला नाही. मुलीला चष्मा असला तर समाज हसेल म्हणून आई-वडिलांनी आरंभी डोळ्यांकडे दुर्लक्ष केले. जातवाल्यांसमोर त्यांना चष्मा लावता येत नसे. यावरूनच त्यांच्या कुटुंबातील विचारांची आणि त्यांच्या समाजाची पूर्ण कल्पना येते.

घरात संत मंडळींचा सतत राबता असे. घरातील सत्संगामुळे येणारे नातेवाईक तिच्या लग्नाचा आग्रह धरीत. सारे नातेवाईक तिला स्वार्थी, लबाड, ढोंगी, कणाहीन, मिंधे वाटत. ‘ज्योती’ या बहिणीकडेच त्यांना मायेचा ओलावा मिळाला. आईला सतत भजने ऐकणं व लिहिणं, ध्यानधारणा करणं आवडत असे. सांसारिक जबाबदारीकडे तिचे लक्ष नव्हते. सर्व बहिणींनी कामे करून आईचा संसार सांभाळला. पेपर, पुस्तक वाचलेले त्यांच्या घरात आवडत नसे. छंद, आवडीनिवडी, हौसमौज यांना स्थान नव्हते. त्यामुळे वेगळा, स्वतंत्र विचार करणाऱ्या उषाची घरात घुसमट होत असे. पण आई-वडिलांनी दिलेल्या थोड्याफार स्वातंत्र्याबद्दलदेखीलही त्या कृतज्ञ आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी सक्तीने तिचे लग्न केले नाही ही देखील मोठी गोष्ट असल्याचे त्या सांगतात.

सिंधी घरांमध्ये चौरस आहार नसणे, सतत तळणीचे पदार्थ करणे, सुती कपडे न वापरणे अशा अनेक चालीरिती असताना ताईंना मात्र योग्य पोषणमूल्ये असणारा चौरस आहार आवडायचा. एकूणच कुटुंबातील सगळ्याच चालीरीतींचा त्यांनी मुळातून चिकित्सक वृत्तीने विचार केल्याशिवाय कुठलीही गोष्ट त्या स्वीकारत नाहीत. स्वतंत्र मते जपण्याच्या या वृत्तीची किंमत मात्र त्यांना चुकवावी लागली. घरात धार्मिक गोष्टींचे अवडंबर फार, पण ताई सत्संगाला कधी गेल्या नाहीत. त्यासाठी आईवडिलांचा विरोधही पत्करला.

मराठी साहित्यात एम. ए. करण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत त्यांनी स्वतःच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. कॅम्पसमधील राजकारणाचे अनुभव सांगत प्राध्यापकांनी केलेल्या मानसिक छळाबद्दल त्या कुलगुरूंकडे तक्रारअर्ज करतात. सुशिक्षित सुसंस्कृत प्राध्यापकांचे वागणे, नामवंत विद्येच्या पीठातील त्यांचे अनुभव वाचून मन उद्विग्न होते. हाॅस्टेलचे निकृष्ट अन्न, मानसिक ताणतणाव यामुळे त्या निराश झाल्याने मृत्यूला कवटाळण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. रूढ परीक्षापद्धत, तेथील चाकोरी त्यांना पटत नव्हती. एम. ए. करणे सोडण्याचेही त्यांनी ठरवले. प्राध्यापकीमध्ये त्यांना रस नव्हता. पण संशोधनाची जाण, आवड असल्याने पीएचडी करण्याची इच्छा होती. स्वतःला काय हवे ते उषाताईंनी ओळखले होते. एमए उत्तीर्ण नसताना आणि गाईडशिवाय पीएचडी करणे हे एक आगळेवेगळे आव्हान होते. त्यामुळे त्यांना असंख्य अडचणी आल्या. अत्यंत जिद्दीने त्यांनी कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय संशोधन केले. पीएचडी पदवी प्राप्त केली.

त्यात मूलभूत संशोधन त्यांनी केले आहे. १८३२ पासूनची वृत्तपत्रे, मासिके हाताळत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी प्रबंध पूर्ण केला. त्यासाठी अपार कष्ट केले. परंतु आलेल्या अनेक विपरीत अनुभवांनी त्या उमेद हरवून बसल्या. डॉ. छाया दातार, शर्मिला रेगे यांनी त्यांच्या प्रबंधाची प्रशंसा केली. त्यांचा प्रबंध निश्चितच महत्त्वाचा आहे. मात्र त्याचा योग्य तो उपयोग झाला नाही. सिंधी नामवंतांनी पीएचडीच्या वाटचालीत मदत केल्याचेही त्या सांगतात. त्यांचे सत्कार, मुलाखती अनेक ठिकाणी झाल्या. त्यांच्या पीएचडीवरही पीएचडी होऊ शकते असा त्यांचा संघर्ष मोठा आहे. त्यांचा पूर्णत्वाचा ध्यास, विशुद्ध समाधान मिळवण्याची आस खरोखरच दाद देण्यासारखी आहे.

जगरहाटीपेक्षा निराळी अशी त्यांची मनोभूमिका, वाटचाल सारेच आजच्या काळात दुर्मिळ आहे. “शिक्षण, नोकरी व लग्न या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर नातेवाईक, मित्रमंडळी नि एकूणच समाजाचं खरं रूप उघडं पडतं” असं त्या म्हणतात. स्वतंत्र जगण्याचा प्रयत्न करताना त्या तावूनसुलाखून निघाल्याचे सांगतात. शैक्षणिक व्यवस्थेने त्यांचे खच्चीकरण केले. कुटुंबातील संघर्ष सतत सुरूच राहिला. साहित्यक्षेत्रातील नामवंत संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याकडून आलेले अनुभव फार वाईट आहेत. ते वाचून अखेर ‘सगळ्यांचे पाय मातीचे’ असे सतत मनात येते. मराठी भाषेबद्दलदेखील खंत वाटते. या क्षेत्रात उत्कृष्ट काम करूनही पुरेसे अर्थार्जन करता येत नाही, सतत खच्चीकरण होत राहते. असे असेल तर तरुण मंडळी मराठी भाषेकडे कशी वळणार? याची चिंता त्या व्यक्त करतात.

योग्य जीवनसाथी मिळताना देखील ताईंना फार अडचणी आल्या. त्यांच्या समाजात तो मिळणार नाही हे त्या जाणून होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनादेखील हे पटले होते. उषा यांनी स्वतः आपला सहचर निवडण्यासाठी प्रयत्न केले. त्या कुणावर अवलंबून राहिल्या नाहीत. वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्यांना योग्य असा जोडीदार मिळाला आणि चांगले सहजीवन, कुटुंबजीवन लाभले. अखेरीस त्यांची जीवननौका स्थिरावली. सतत संघर्ष, प्रचंड त्रास त्यांनी सोसला. आज एक निवांत आयुष्य त्यांना लाभले.

उषा रामवाणी या प्रांजळपणे, धीटपणे अनेक प्रसंग सांगतात. स्वतःचे दोष, केलेल्या चुकाही त्या कबूल करतात. परंतु ‘भूतकाळाला विसरण्याचं आणि भविष्यकाळाची चिंता नसण्याचं विलक्षण सामर्थ्य आपल्यात संचारतं तेव्हा ती अनुभूती खूप सुखद असते. आनंद मनातून झिरपू लागतो. मन शांत, स्थिर आणि सकारात्मक बनतं. स्वतःला शोधण्याचा प्रवास अव्याहतपणे सुरूच असतो.’ त्यांचं हे वाक्य मानवी जीवनाचं जगण्याचं सार सांगून जातं. आपल्याला आयुष्यात कितीही भोगावं लागलं तरी ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्मे सर्वेश्वर पूजनाचे॥’ याप्रमाणे कटुता न ठेवता स्थितप्रज्ञपणे जगणे ही असामान्य गोष्ट आहे.

मागास समाजात जन्माला येऊन अत्यंत संघर्षातून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपताना, एकटीने दिलेला लढा व त्याची प्रामाणिक अभिव्यक्ती केलेल्या डॅा. उषाताई या आधुनिक नवदुर्गेला मानाचा मुजरा..!!

संपर्क- डॅा. उषा रामवाणी-74983 80403


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading