February 5, 2023
difference between bird and human psychology article by rajendra ghorpade
Home » फळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…
विश्वाचे आर्त

फळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…

फळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…

वाढत्या लोकसंख्येबरोबर विचारही आता बदलत चालले आहेत. अहिंसेचा विचार मागे पडत आहे. अहिंसेच्या विचारावर आधारित नियोजनच केले जात नाही. हा विचार कालबाह्य मानला जात आहे. पण जीवनचक्रच खंडित केले जात असल्याने भावी काळात अनेक समस्या उत्पन्न होणार आहेत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

देखे उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगे नरू केवीं तैसा । पावे वेगां ।।41।। ज्ञानेश्वरी अध्याय 3 रा

ओवीचा अर्थ – हे पाहा, ज्याप्रमाणें पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणें मनुष्याला त्या वेगानें ते फळ कसे प्राप्त करून घेतां येईल ? सांग बरें.

पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्टीची बारीक निरीक्षणे केली जात होती. पक्ष्यांचे गुण काय आहेत? तो कसा वागतो? तो कसा बोलतो? तो कसा चालतो? तो कसा विचार करतो? तो कोठे राहतो? तो कसा राहतो? स्वतःचे स्वतः कसे उपचार करतो? समूहाने राहतो की एकटा राहतो? त्याचे स्थलांतर? आदी सर्व गोष्टींचा अभ्यास केला जात होता. अशा या निरीक्षणातूनच पक्ष्यांचे संरक्षण व पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण यावर उपाय निश्चित केले होते. जगा व जगू द्या हा विचार जोपासला जात होता. आता हा विचार मागे पडला आहे.

पिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण करताना गोफण वापरली जायची. शेतात बुजगावणे उभे केले जायचे. हे उपाय हे निरीक्षणातूनच शोधले गेले होते. यामध्ये पक्ष्याला कोठेही इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेलेली आढळते. गोफणीने फक्त पक्षी हुसकावून लावले जायचे. पक्षी पिकांकडे येणार नाहीत यासाठी बुजगावणे उभारले जायचे. काही ठिकाणी गोंगाट केला जायचा. आवाजामुळे पक्षी पळून जावेत हा त्यामागचा उद्देश होता. ढोल, टिमकी वाजवली जायची. यामध्ये पक्षी ठार मारण्याचा कोणताही उपाय नव्हता. फळे खातात, पिकातील दाणे खातात म्हणून थेट त्यांना ठार मारा, असा कोणताही उपाय येथे नव्हता. पण सध्याच्या युगात असा विचार मांडला जात नाही. उपाय योजताना हा विचार केलाच जात नाही.

नुकसान होते ना? मग रोखण्यासाठी त्यांना ठार मारणे ही गरज आहे असाच विचार केला जातो. पक्षी असो कीटक असो याचा समूळ नायनाटच केला जात आहे. रसायनांच्या फवारण्यामुळे फक्त कीटकच मरतात. असा दावा केला जातो. पण त्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर विचारही आता बदलत चालले आहेत. अहिंसेचा विचार मागे पडत आहे. अहिंसेच्या विचारावर आधारित नियोजनच केले जात नाही. हा विचार कालबाह्य मानला जात आहे. पण जीवनचक्रच खंडित केले जात असल्याने भावी काळात अनेक समस्या उत्पन्न होणार आहेत.

झटपट जीवनशैलीमध्ये दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. आताची गरजच विचारात घेतली जाते. पुढील काळात त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत याचा विचारच केला जात नाही. पक्ष्याला फळ दिसले, तर तो लगेचच फळाकडे धाव घेत नाही. एका फाद्यावरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतो. सर्व बाजूंनी फळाचे निरीक्षण करतो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. हळूहळू फळाकडे धाव घेतो. पण माणूस मात्र झटपट फळाची अपेक्षा करतो. पक्ष्याला विचार आहे, पण मानवाला हा विचार जोपासता येत नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. प्रयत्न करत राहिले तर यश मिळते. झटपट यशाची अपेक्षा ठेवू नये.

Related posts

जैविक नियंत्रणामध्ये गुळाचा वापर

विषय विकारावर सकारात्मक विचारानेच करता येते मात

संत ज्ञानेश्वर वाङ्मय दर्शन

Leave a Comment