काही माणसांचे स्वभावही असेच असतात. विशेषता राजकारणी मंडळींचे. ते असेच वादळी वाऱ्यासारखे गर्जना करत येतात. अन् वादळ संपल्यावर लुप्त होतात. काही कालावधीपूरतेच त्यांचे अस्तित्व असते. अशा मंडळींचा समाजाला फायदा कमी तोटात अधिक होतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
एऱ्हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी ।
तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ।। २५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा
ओवीचा अर्थ – सहज विचार करून पाहिलें तर, जो अकाली आलेला मेघ आपल्या दाट फळीने सर्व आकाश भरून टाकतो व जो मेघ आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोडतो, तो अकाली मेघ घटकाभर तरी टिकतो काय ?
पावसाळ्या व्यतिरिक्त अन्य कालावधीत पडणारा पाऊस हा अवेळी किंवा अकाली आलेला पाऊस असे म्हटले जाते. हा पाऊस ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या लखलखाटासह कोसळतो. आकाश निरभ्र असते. पाऊस येईल असे वातावरणही नसते, पण अचानक आकाशात ढग जमा होतात. सोसाट्याच्या वाऱ्यासह गर्जना करत हा पाऊस पडतो. काही क्षणात सर्वत्र पाणीच पाणी करतो, अन् काही वेळातच तो निघूनही जातो. काहीवेळातच तुंडूब भरलेले नाले रिकामे होतात. विशेष म्हणजे हा पाऊस कोठे पडतो. कोठे पडतही नाही. नुसतीच आकाशात गर्जनाकरीत वाऱ्याच्या वेगाने निघूनही जातो.
अशा वादळी, गरजणाऱ्या पावसाचा फायदा कमी नुकसानच अधिक असते. झाडाची, फळांची पडझड होते. वीजेचे खांब, घरांची पडझड होते. उभ्या पिकाचे नुकसान होते. काही कालावधीतच प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबते अन् नुकसान होते. म्हणजेच या पावसाचा फायदा आपणास कमी अन् नुकसानच अधिक होते. शेतात पाणीच पाणी होते. पण काही क्षणातच ते निघूनही जाते. या पाण्याचा पिकाला फारसा फायदाही होत नाही. ओलावा वरवरचा असल्याने पिकाच्या मुळाशी पाणी पोहोचतच नाही. पोहोचले तरी ते मुबलक प्रमाणात नसते.
काही माणसांचे स्वभावही असेच असतात. विशेषता राजकारणी मंडळींचे. ते असेच वादळी वाऱ्यासारखे गर्जना करत येतात. अन् वादळ संपल्यावर लुप्त होतात. काही कालावधीपूरतेच त्यांचे अस्तित्व असते. अशा मंडळींचा समाजाला फायदा कमी तोटात अधिक होतो. एकतर ते वादळाच्या लाटेवर स्वार झालेले असतात. त्यामुळे लाटेबरोबर आलेले लाटेबरोबरच व्हावून जातात. त्यांचे अस्तित्व अस्थिर असते. लाटेवर स्वार होऊन लोकप्रतिनिधी झालेले अनेक नेते लाटेबरोबरच व्हावून गेलेले पाहायला मिळतात. ते पुन्हा कधी दिसतही नाहीत. यासाठी आपले अस्तित्व कायम राहावे, यासाठी पावसाळ्यातील पावसासारखे बरसायला हवे. हा पाऊस चारच महिने असतो. त्यातील दोन-तीन महिनेच जोरात बरसतो, पण बाराही महिने तो आपणास लाभ देत राहातो. त्याचे पाणी उन्हाळ्यापर्यंत आपली तहान भागवत राहाते. पावसाळ्यातील पावसाची प्रतिक्षा यासाठीच केली जाते. वादळी वाऱ्याबरोबर बरसणाऱ्या पावसाची कोणी वाट पाहात नाही. कारण तो थोडाच वेळ दिलासा देतो अन् पुन्हा उकाड्याने हैराण करून सोडतो. यासाठी आपले कर्म हे पावसाळ्यातील पावसासारखे असावे. ते कर्म उन्हाळ्यातही उपयोगी ठरते.
साधना कशासाठी अन् कशा प्रकारे करायची हे यातून समजून घ्यायला हवे. लोकांनी सत्कार करावा, मान द्यावा यासाठी हे तप करायचे का ? साधनेचे नाटक करून असे सत्कार, मान मिळवताही येतात. राजकारणीमंडळी अशी नाटके करून मतेही मिळवतात. पण हा सत्कार, हा मान काही कालावधीपूरताच असतो. धर्माचा भावनिक मुद्दा करून आपल्या विचारांची लाट निर्माण करता येऊ शकते. पण ही लाट संपल्यानंतर आपणही संपतो हे लक्षात घ्यायला हवे. यासाठी साधनेचे खरे महत्त्व जाणून घेऊन त्याचे भावनिक भांडवल न करता स्वतःच्या विकासासाठी साधना करायला हवी. ही साधना काही कालावधीपूरती जरी योग्यप्रकारे केली तरी त्याचे फळ हे चिरकाळ टिकणारे, शाश्वत असे असते. ते समाधान देणारे असते. जीवन सुखी करणारे असते. पावसाळ्यातील पाण्यासारखे ते दुष्काळातही, दुःखातही आपणास सुख देणार असते. यासाठी साधनेचे, तपाचे महत्त्व जाणून घेऊन योग्य तपाचा, साधनेचा स्वीकार हा करायला हवा.