झाड कवेत घेणारा माणूस
प्रत्येक झाडाविषयी आणि फळाविषयी इतकी रंजक माहिती शिंदे पेरत जातात की, हे पुस्तक वाचल्यानंतर त्या त्या झाडांची फळं खाताना, त्यांची चव चाखताना आता ती आणखीच रसदार होणार आहेत. आधी आपण नुसतीच फळं खात असू. आता आपण आणखी रसिकतेने त्यांचा आस्वाद घ्यायला लागू. एक एक फळ खाताना त्याचा सगळा इतिहास, भूगोल, कथा, काव्य, म्हणी, वाक्प्रचार आठवत जातील आणि आपण खात असलेलं ते फळ आणखीच आपल्या अंगी लागेल. म्हणूनच शिंदे यांना मी ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असं म्हटलेलं आहे. ते अनेक अर्थाने खरं आहे.
इंद्रजीत भालेराव, ज्येष्ठ कवी, लेखक
डॉ. विलास तथा व्ही. एन. शिंदे हा माणूस जन्मजात वृक्षवेडा आहे. याचं बालपण झाडांच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेलेलं आहे. पुढं हा पोटापाण्यासाठी शहरात गेला, तर यानं मागे सुटलेली झाडंही सोबत आणली. जिथं गेला, तिथं झाडं लावत गेला. आतापर्यंत त्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या तीन विद्यापीठांना हिरवा साज चढवलेला आहे. झाडं लावणं, झाडं जोपासणं याचा या माणसाला छंदच आहे. नोकरीच्या ठिकाणी, नोकरीबाहेरचा वेळही तो झाडं जोपासण्यातच घालवतो. त्यासाठी जागा उपलब्ध करणे, पाणी उपलब्ध करणे या सगळ्या गोष्टी तो चिकाटीनं आणि धडपडीनं करत राहतो.
बारा वर्षांपूर्वी या माणसाला वसंत आबाजी डहाके यांची एक कविता भेटते. ती त्याला झाडं वाचायला शिकवते. बारा वर्षे हा माणूस झाडं वाचत राहतो. या वाचनातून त्याच्याजवळ खूप काही साचत जातं. ते व्यक्त करण्याच्या अपरिहार्यतेतून हा माणूस हातात लेखणी घेतो आणि त्यातूनच हा ‘वृक्षवेद’ साकारत जातो. ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक आकाराला येतं.
डॉ. विलास शिंदे यांचं हे सातवं पुस्तक. याआधी ‘एककांचे मानकरी’ (२०१५), ‘असे घडले भारतीय शास्त्रज्ञ’ (२०१८), ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ (२०१८) आणि ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ (२०१९), ‘एककांचे इतर मानकरी’ (२०२३) व ‘कृषी क्रांतीचे शिलेदार’ (२०२४) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आता ‘बांधावरची झाडे’ प्रकाशित झाले आहे. या सगळ्या पुस्तकांच्या नावावरूनच लक्षात आलेलं असेल की, त्यांचं सगळं लेखन विज्ञानविषयक आहे; पण ही विज्ञानाच्या अभ्यासक्रमांची पुस्तकं नव्हेत. ती विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत. विज्ञानाची गोडी लावायला ती आणखीच उपयुक्त आहेत; पण ती अभ्यासक्रमाला धरून लिहिलेली नाहीत. तशी पुस्तकं त्यांनी गरज म्हणून सुरुवातीला लिहिलेली आहेतही; पण ती पुस्तकं आता ते स्वतःदेखील गणतीत धरत नाहीत. अशी पुस्तकं लिहिण्यात आणि आयुष्य उभं करण्यात त्यांचा बराच काळ गेला म्हणून त्यांना त्यांचं या स्वरूपाचं लेखन करायला त्यामानाने उशीर झाला; पण एकदा सुरुवात झाल्यावर मात्र त्यांनी अगदी झपाटल्यासारखं हे लेखन केलेलं आहे. अवघ्या पाच वर्षांत त्यांनी ही पाच पुस्तकं लिहिली आहेत आणि पृष्ठसंख्येच्या दृष्टीनेही तसा तो ऐवज मोठा आहे. ही पुस्तकं विज्ञानाचे प्राध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक यांना तर उपयुक्त आहेतच; पण ती तुमच्या, माझ्यासारख्या वाङ्मयाच्या वाचकांनाही खूपच रंजक आणि माहितीपूर्णतेमुळं वाचनीय वाटावीत, अशी झालेली आहेत. त्यांचं हे सगळं लेखन म्हणजे वैज्ञानिक सत्याचा हात न सोडता मांडलेली जागरणाची रंजक आख्यानेच आहेत.
या पुस्तकात त्यांनी केवळ दहाच झाडांवर लिहिलेलं आहे; पण अशी दहा पुस्तकं ते लिहू शकतील, इतका ऐवज त्यांच्याजवळ जमा आहे. प्रकाशकांनी आणि वाचकांनी जर उत्तम प्रतिसाद दिला, तर हा ‘वृक्षवेद’ नक्कीच दहा खंडांचा होऊ शकेल. त्यांची सुरुवातीची तीन पुस्तकं प्रामुख्याने वैज्ञानिक संज्ञा, संकल्पना, शोध यावर आधारित होती. चौथ्या ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ या पुस्तकात ते ललित साहित्याच्या जवळ आलेले आहेत आणि या पाचव्या पुस्तकात बरेचसे लालित्यानं न्हाऊन निघालेले आहेत. त्यांच्या या पुस्तकातल्या लेखनानं ते तर्क आणि लालित्याच्या मधोमध साहित्यशास्त्रानं आखलेली कठोर भेदरेषा शिंदे यांनी बरीचशी पुसट करत आणलेली आहे.
शिंदे यांची सगळी पुस्तकं वाचताना आपल्या लक्षात येतं की, क्रमानं त्यांना त्यांची आत्मसाक्ष पटत गेलेली आहे आणि प्रस्तुत पुस्तकात तर त्यांना तिचा साक्षात्कारच झालेला आहे. त्यामुळे हे लेखन अधिक उत्कट, सघन आणि संपृक्त झालेलं आहे. जणू त्यांनी निर्माण केलेली ही एक ललितकृतीच आहे. ‘झाड कवेत घेणारा माणूस’ हीच आता इथून पुढं शिंदे यांची ओळख राहणार आहे.
या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेपासूनच या गोष्टीची सुरुवात होते. वसंत आबाजी डहाके यांच्या ज्या ‘झाड’ कवितेनं त्यांना झाडं वाचायला शिकवलं, त्याच कवितेला त्यांनी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. एखाद्याजवळ कविमन आहे, याची साक्ष पटवणारीच ही गोष्ट आहे. झाडाच्या फांदीवर बसून रात्री पारावरच्या पोथीत ऐकलेल्या कथेवर ओव्या रचून आपण म्हणायचो, असा संदर्भ एका लेखात आलेला आहे. म्हणजे शिंदे यांच्यामध्ये एक कवी दडलेला होताच; पण पुढे पोटापाण्याच्या मागं लागून आयुष्याचं विषयांतर झालं आणि आता पोटापाण्याचा प्रश्न मिटल्यावर आयुष्य पुन्हा एकदा पूर्वपदावर आलेलं दिसतंय. या लेखनातलं लालित्य, कवितांचे संदर्भ हेच सिद्ध करतात. अगदी अलीकडं समाजमाध्यमावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक दीर्घ कविता लिहिलेली वाचनात आली. म्हणजे आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं.
हे सगळे लेख मी समाजमाध्यमावर याआधीही वाचलेले होतेच. त्यावर टिपण्याही लिहिल्या होत्या. आता इथं ते लेख पुन्हा वाचताना धावतं वाचन करावं लागेल, असं मला वाटलं होतं; पण प्रत्येक ओळीनं आणि प्रत्येक लेखानं मला पहिल्या वाचनाइतकंच गुंतवून ठेवलं. त्याचं कारण हे आहे की, या लेखनाची भाषा ओघवती झालेली आहे आणि या ओघात वाचक आपोआप पुढे सरकत राहतो. लेख दीर्घ असूनही कधी वाचून झाला, ते आपल्या लक्षातही येत नाही.
या आधीच्या चारही पुस्तकांना विज्ञान विषयाचे कुलगुरू आणि शास्त्रज्ञ अशा लोकांच्या प्रस्तावना आहेत; पण या पुस्तकासाठी त्यांनी माझ्यासारख्या कवीची निवड केली, याचं कारणही लेखकातला कवी हेच आहे. माझी समग्र कविता त्यांनी वाचलेली आहे. माझ्या कवितेतला झाडझाडोरा त्यांना भावला म्हणून ओळखदेखील नसताना त्यांना प्रस्तावनेसाठी माझी निवड करावीशी वाटली, हे त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं.
शिंदे यांनी या लेखांचा एक आकृतिबंध ठरवलेला आहे. सुरुवातीला त्या झाडाचं थोडक्यात महत्त्व, मग त्याचे मूळ, जगातले आजचे अस्तित्व, त्याची विविध भाषांतील नावं, त्यानंतर त्याचं स्वयंपाकातलं आणि औषधातलं महत्त्व; झाडांचे, फांद्यांचे, पानांचे, शिरांचे, रंगांचे, गंधांचे सूक्ष्म वर्णन, समज, अपसमज, गैरसमज अशा क्रमाने त्या झाडाचा इतिहास, भूगोल, विज्ञान शिंदे मांडत जातात. त्यानंतर पुराणकथा, श्लोक, जातक कथा, लोककथा, ऐतिहासिक कथा, लोकगीतं, म्हणी, वाक्प्रचार, नाटक, चित्रपट, कथा, कादंबरी, कविता, गाणं या सगळ्यांत दिसणारं झाड, अशा क्रमानं ते त्या झाडाचा शोध घेत जातात. हा शोध मोठा रंजक आणि मजेशीर असतो. यातल्या काही गोष्टी आपणाला माहीत असतात. काही अर्धवट माहीत असतात, तर काही कधी तरी केवळ कानावर पडलेल्या असतात. त्या इथं समग्र आणि मुळासहित वाचायला मिळतात. लोककथा आणि लोकगीतं सगळीकडं सारखी नसतात. त्यामुळं इथल्या लोककथा आणि लोकगीतं वाचताना त्याचं आपल्याकडचं पर्यायी रूप आपल्या डोळ्यासमोर येत राहतं.
या लेखाचा पुढचा टप्पा आहे, तो या झाडांविषयी लेखकाच्या मनात साठवलेल्या वैयक्तिक आठवणींचा. हा भाग पूर्णपणे ललित म्हणावा, असा आहे. प्रत्येकाच्या एखाद्या दुसऱ्या झाडाविषयीच्या आठवणी असतातच; पण शिंदे यांना सर्वच वृक्ष आवडत असल्यामुळं प्रत्येक झाडाची त्यांची काही तरी उत्कट आठवण आहेच. असा हा एकूण त्यांच्या लेखांचा आकृतिबंध आहे. वरीलपैकी काही माहिती त्यांना संकलित स्वरूपात मिळत असेलही; पण बरीच माहिती त्यांच्या चौकस बुद्धीने शोधलेली आहे.
प्रत्येक झाड, बीज अंकुरल्यापासून फळधारणा होईपर्यंत कसं कणाकणानं वाढतं, त्याचे रंग आणि आकार कसे बदलत जातात, त्याचे खोड, फांद्या, पानं, फुलं, फळं या तपशिलासह आणि फळाच्या सालीपासून आतल्या बियांपर्यंत रंग, आकार, चव कशी बदलत जाते, याचंही ते बारकाईने वर्णन करतात. ते वाचताना जणू गालावर मुटका ठेवून शिंदे रात्रंदिवस त्या झाडाकडं पहात बसलेले आहेत, असं दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलं.
प्रत्येक झाडाविषयी आणि फळाविषयी इतकी रंजक माहिती शिंदे पेरत जातात की, हे पुस्तक वाचल्यानंतर त्या त्या झाडांची फळं खाताना, त्यांची चव चाखताना आता ती आणखीच रसदार होणार आहेत. आधी आपण नुसतीच फळं खात असू. आता आपण आणखी रसिकतेने त्यांचा आस्वाद घ्यायला लागू. एक एक फळ खाताना त्याचा सगळा इतिहास, भूगोल, कथा, काव्य, म्हणी, वाक्प्रचार आठवत जातील आणि आपण खात असलेलं ते फळ आणखीच आपल्या अंगी लागेल.
म्हणूनच शिंदे यांना मी ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असं म्हटलेलं आहे. ते अनेक अर्थाने खरं आहे. कव ही माया देते, सुरक्षा देते, अभय देते आणि कव ही आवाकाही सिद्ध करते. या सगळ्या अर्थानं शिंदे हा ‘झाड कवेत घेणारा माणूस’ आहे, हे या लेखनातून सिद्ध झालेलं आहे.
त्यांचा आंब्यावरचा लेख सगळ्यात मोठा झालेला आहे. त्यात आंब्याच्या वीस कथा येतात. महाभारतापासून तेनाली रामापर्यंत, बिरबलापासून लालबहादूर शास्त्री, झिया उल हकपर्यंत ऐतिहासिक, पौराणिक, लोककथा आणि वर्तमान कथाही येतात. आंब्याच्या कविता आणि गाणी तर इतकी येतात की, आपण वाचतच राहतो. बालपणीचं ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात’ हे गाणं ते विसरलेले नाहीत. माझ्या आंब्यावरच्या दीर्घ कवितेचाही ते सविस्तर उल्लेख करतात. आंब्यावर संशोधन करणाऱ्या चार अवलियांच्या नवलकथा ते सांगतात. त्या लोककथांच्या वळणाच्या वाटतात. त्याचं कारण शिंदे यांच्या लेखनातलं लालित्य. इतर झाडांच्या संदर्भात त्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकाच्या अशा कथा आलेल्या नाहीत. या देशावर राज्य करणाऱ्या प्रत्येक राजवटीच्या मनावर मात्र भारतीय आंब्यानं राज्य केलेलं आहे, हे आपल्या लक्षात येतं, ते इथल्या अनेक ऐतिहासिक संदर्भामुळं. अमीर खुसरो, गालिब, टागोरांपासून, माझ्यापर्यंत आंब्यावर अगाध प्रेम करणाऱ्या कवींच्या अनेक कथा इथे येतात. आंब्यावर मराठीत इतक्या लावण्या आहेत, पण शिंदे त्या चक्क ‘ विसरलेले’ आहेत. केवळ एका लावणीचा उल्लेख आला आहे. जात्यावरील ओव्या मात्र इथे पुष्कळ आलेल्या आहेत.
शिंदे जेव्हा कवितेचे संदर्भ देतात, तेव्हा त्यांच्या वाचनाचा आवाका आपल्या लक्षात यायला लागतो. त्यांची अभिरुची आणि रसिकताही किती उच्च दर्जाची आहे, तेही कळतं. खरं तर, हा विज्ञानाचा माणूस, करतो प्रशासनात काम; पण त्याच्या डोक्यात असते ती सतत कविता. संस्कृत, हिंदी, मराठी कवितेच्या त्यांनी उद्धृत केलेल्या ओळी पाहिल्या की, या माणसाचं वाचन किती प्रकारचं आणि नजर कशी शोधक आहे, ते आपल्या लक्षात येतं. कवितेच्या एवढ्या अवाढव्य पसाऱ्यातून आपणाला हव्या त्या झाडाचा संदर्भ असलेल्या ओळी शोधणं, मोठी अवघड गोष्ट असते. त्यासाठी न कंटाळता वाचत राहावं लागतं, ऐकत राहावं लागतं, चौकस राहावं लागतं. हे येरागबाळ्याचं काम नाही. अगदी मर्ढेकर, पु. शि. रेगे, सदानंद रेगे यांच्यापासून ते प्रशांत मोरे, देवा झिंजाड यांच्यापर्यंत. त्यांनी वाचलेला कवितेचा पसारा पाहिला की, आपण मराठीचे प्राध्यापक आठवून पाहावेत. कवी बी आणि बी. रघुनाथ यांच्यातला फरक माहीत नसलेले आणि मराठीत दोन बहिणाबाई आहेत, हेही माहीत नसलेले अनेक प्राध्यापक मला भेटलेले आहेत; मी पाहिलेले आणि अनुभवलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा विज्ञानाचा माणूस कवितेचे जे संदर्भ देतो, ते सगळं विस्मयकारी आहे.
चित्रपट गाण्याचंही तसंच आहे. ते चित्रपटातल्या गाण्यांचा नुसता संदर्भ देत नाहीत, तर ते गाणं कथानकाच्या कोणत्या टप्प्यावर आहे आणि त्यामुळे कथानकाचा कसा परिपोष होतो, तेही ते सांगतात. म्हणजे एका गाण्याचा संदर्भ देण्यासाठी त्यांनी अख्खा चित्रपट मन लावून पाहिलेला असतो. त्या गाण्याचे गीतकार, संगीतकार, त्या गाण्यावर कुणी नृत्य किंवा अभिनय केलाय त्या सगळ्यांविषयी ते एक-दोन वाक्यांत भाष्य करतात. त्यांना नुसता संदर्भ देऊन मोकळं होता आलं असतं; पण शिंदे तसं करत नाहीत. ते हा सगळा तपशील पेरत जातात आणि लेखाचं लालित्य आणखी वाढत जातं. चिंचेच्या झाडाविषयी लिहिताना ‘ हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ या गाण्याचा संदर्भ वाचताना हे सगळं आपल्या लक्षात येतं.
ललित वाङ्मय लिहिणारे लेखक शास्त्रीय माहिती नेहमी टाळतात आणि विज्ञानविषयक लेखन करणारे नेहमीच लालित्य टाळतात. शिंदे दोन्हींचा समन्वय साधत आपलं लेखन करतात. ते विज्ञानाला लालित्याच्या जवळ नेतात आणि लालित्याला विज्ञानाच्या जवळ नेतात. प्रत्येक लेखाचा शेवट वैयक्तिक आठवणींचा भाग हा नितांत सुंदर असा ललित लेखच आहे. शोधायला गेलं, तर त्यातून लेखकाचं आत्मचरित्रही सापडत जाईल. बोरांच्या वैयक्तिक आठवणी वाचताना मला बोरासारखेच खट्टे, मीठे, खोडकर असं शिंदे यांचं बाळरूप डोळ्यासमोर दिसू लागलं. असं प्रत्येक लेखाविषयी म्हणता येईल.
प्रत्येक झाडाभोवती निर्माण झालेली एक अख्खी संस्कृती शिंदे यांच्या लेखनातून आपल्या समोर उभी राहते. आपल्या संस्कृतीत झाडाला आपला सहकारी माणूसच समजून आपण त्याच्याशी वागत असतो. त्यामुळेच झाडालाही एक व्यक्तिमत्त्व लाभतं. झाडं माणसासारखीच राजस, तामस, सात्त्विक असतात. माय आणि सासू एकाच बाईत असावी, तसं फूल, फळ आणि काटे एकाच झाडाच्या अंगावर असतात. झाडांचं असं व्यक्तिमत्त्व सर्वांग वैशिष्ट्यासह या लेखनातून शिंदे उभं करतात. काही झाडं आपण जास्त जवळ केली, तर काही वाळीतही टाकली. अर्थात, ती त्यांच्या अंगच्या गुणामुळेच. काही झाडं आग्याबोंडासारखी जहाल असतात, तर काही झाडं करंजासारखी मवाळ असतात. काही झाडं तीनताड ताडमाड वाढलेली असतात, तर काही झाडं मोसंबीसारखी तुमच्या हाताशी असतात.
तसा शिंदे यांचा विषय हा भौतिकशास्त्र आहे; पण त्यांनी लिहिलेली सगळी पुस्तकं काही त्याच विषयाची नाहीत. त्यात रसायनशास्त्रावरची आणि वनस्पतीशास्त्रावरचीही पुस्तकं आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला मर्यादित करून घेतलेलं नाही, हेच सिद्ध होतं. नाही तर, बरेचसे प्राध्यापक स्वतःला मर्यादित करून घेण्यात धन्यता मानतात. शिंदे यांचं तसं होत नाही. त्यांनी स्वतःच्या मेंदूची दारं सगळ्याच विषयांसाठी खुली ठेवलेली आहेत.
दहा दिशांतून सृष्टीवरती जे सुंदर येते,
स्वागत करू या, त्या सगळ्यांचे सारून सर्व मते
अशी उपनिषदीय दृष्टी घेऊन शिंदे सगळ्याच अनुभवांना, सगळ्याच ज्ञानांना खुल्या मनानं सामोरे जातात. त्यामुळं आंतरविद्याशाखीय ही संकल्पनादेखील आणखी विशाल होत जाते. कला, वाणिज्य, विज्ञानाचा संगम होताना दिसतो. तो आपल्यासारख्या वाचकांना वरदानच ठरतो. माझ्यासारख्या शेती संस्कृतीचा शोध घेणाऱ्या कवीला तर ‘बांधावरची झाडे’ आणि ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ ही पुस्तकं म्हणजे एक वरदानच आहेत. आमच्या कवितांच्या ओळींनी त्यांच्या लेखांचा एक भाग त्यांनी सजवलेला असला, तरी त्यांचा उर्वरित लेख वाचून आम्हाला आणखी काही कविता लिहिण्याची प्रेरणा नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो.
पुस्तकाचे नाव – बांधावरची झाडे
लेखक – डॉ. व्ही. एन. शिंदे
प्रकाशन – मनोविकास प्रकाशन
मूल्य : ₹२६०
www.manovikasprakashan.com
मराठी संस्कृतीत उमटलेले झाडांचे बिलोरी रंगछायादर्शन
बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ, साग या झाडांविषयीच्या ज्ञानललित माहितीचा लेखसंग्रह म्हणजे 'बांधावरची झाडे' हे पुस्तक. डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी जाणीवपूर्वक घडविलेला हा विज्ञानललित बंध आहे. झाडांच्या शास्त्रीय माहितीबरोबर त्यांचा व्याप्ती-पसारा, भूगोल, भाषिक संज्ञेचा वर्णपट त्यामध्ये निवेदिला आहे. त्यामुळे त्यास वस्तुनिष्ठ वैज्ञानिक माहितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यासाठी त्यांनी विविध ज्ञानशाखांमधील माहितीचा भरगच्च आधार घेतला आहे. झाडांचा अधिवास व परिसर विज्ञानाविषयीचे हे कथन आहे. त्यात शेतीज्ञानाबरोबर वनस्पतिविज्ञान आहे. त्या त्या झाडांची व्यावहारिक उपयोगिता सांगितली आहे. शिंदे यांच्या लेखनाचा महत्त्वपूर्ण विशेष म्हणजे झाडसृष्टीच्या मानवनिर्मित बांधकामाचे कथन. माणूस आपल्या कल्पनानिरीक्षणाने सृष्टिवाचन करत त्यास मानवी रंगरूप देत आला आहे. डॉ. शिंदे यांच्या लेखनात मानवाने आदिकाळापासून झाडांविषयीचे रचलेले विहंगदर्शन आहे. लोककथा, गाणी, दंतकथा, मिथके व आधुनिक साहित्यातील ही झाडदर्शने आहेत. लोक व लिखित परंपरेच्या झाडवाचनाचा त्यात धांडोळा आहे. एका अर्थाने मराठी संस्कृतीत उमटलेले झाडांचे हे बिलोरी रंगछायादर्शन आहे. डॉ. शिंदे यांच्या या झाडवाचनाला लेखकाच्या आत्मपरतेचे गहिरे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बांधावरील हे झाडमायादर्शन मनोहारी ठरेल.
डॉ. रणधीर शिंदे
माहितीच्याच झाडांची, माहीत नसलेली माहिती
आगळ्यावेगळ्या 'बांधावरची झाडे' पुस्तकाविषयी लिहिणे विशेष आनंददायी आहे. यात शेताच्या बांधावर आढळणाऱ्या दहा जातींच्या वृक्षांची विविधांगी माहिती मनोरंजक पद्धतीने दिली आहे. झाडे बांधावरची असली, तरी शहरी माणसांच्याही परिचयाची आहेत. एक हादगा सोडला (जो बांधावरही दुर्मिळच ) तर बाकीची झाडे शहरातही आढळतात. माहितीच्याच झाडांची, माहीत नसलेली माहिती डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी साध्या, सरळ, ओघवत्या भाषेत करून दिली आहे. त्यांनी ललित लेखनाच्या नादात शास्त्रीय ज्ञानाविषयी चूक होऊ दिलेली नाही. शास्त्रीय ज्ञान, प्राचीन व अर्वाचीन वाङ्मय, लोककथा, बोधकथा, दंतकथा, कविता, गाणी यांचा साक्षेपी धांडोळा पुस्तकात आहे.
अर्पणपत्रिकेत वसंत आबाजी डहाके यांची कविता देऊन म्हटलंय, 'झाड वाचायला शिकवणाऱ्या कवितेस.' कवीचे 'सरळ झाडंच वाचावे' सांगणे खूपच अर्थगर्भ व महत्त्वाचे आहे. पण कवितेत विचारलेला 'खटाटोप ' ही आपल्या पूर्वसुरींच्या आणि समकालीन 'झाडप्रेमी' अभ्यासकांच्या झाडलिखाणाचे ज्ञान मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहे ! लेखकाचे झाडांविषयीचे विपुल वाचन या लिखाणातून दिसून येते.
श्री. द. महाजन, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ
बांधावरची झाडेतून संवर्धनाचा लाखमोलाचा सल्ला
डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे 'बांधावरची झाडे' हे फार महत्त्वाचे पुस्तक आहे. निसर्गाने निव्वळ वरदान म्हणून अनेक झाडे आपल्याला प्रदान केली आहेत. त्यापैकी चिंच, आंबा, आवळा, शेवगा, हादगा, बोर, जांभूळ, साग, बाभूळ आणि कडुनिंब या दहा झाडांचा साद्यंत वेध या पुस्तकामध्ये घेतला आहे. वैज्ञानिक किंवा पर्यावरणीय माहिती ही निरस आणि रटाळ वाटते. पण हे लेखन याला अपवाद आहे, कारण आपल्या जीवनातील झाडांचे स्थान अधोरेखित करत लेखकाने, झाडांची माहिती रंजक भाषेत ओघवत्या पद्धतीने दिली आहे. यामुळे वाचक लेखनात गुंतत जातो. हेच पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक झाडाची माहिती देताना, त्याचे आपल्या जीवनातील आणि पर्यावरणातील स्थानही ते अधोरेखित करतात. वाचकांना, बांधावरची झाडे जपण्याचा, लावण्याचा व संवर्धन करण्याचा लाखमोलाचा सल्लाही पुस्तक देते. व्यक्तिगत पातळीवर निसर्ग संवर्धनाचे सातत्याने काम करणारे डॉ. शिंदे, कृतीशील लेखक आहेत, म्हणूनच हे लेखन अंतर्मनातून झालेले आहे आणि यामुळेच ते नितांतसुंदर झाले आहे.
डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.