January 29, 2023
Special Public Liberary in America article by Arati Mandlik
Home » अमेरिकेत आहेत अशा सार्वजनिक लायब्ररी…
काय चाललयं अवतीभवती

अमेरिकेत आहेत अशा सार्वजनिक लायब्ररी…

मॅडिसन येथील सायकलीच्या मार्गावर पहिली लिटिल लायब्ररी अधिकृतरीत्या बसविण्यात आली. काही महिन्यात हजारो लोकांनी बघितली. त्यानंतर अनेक लोकांना अशी लायब्ररी आपल्या इथे असावी असे वाटू लागली. ते लोकही मग यांच्या या मोहिमेत सहभागी झाले.

आरती आर्दाळकर -मंडलिक
मायामी (फ्लोरिडा), अमेरिका

सार्वजनिक लायब्ररी म्हंटले कि आपल्या डोळयासमोर छोट्या-मोठ्या खोल्यामध्ये , हॉलमध्ये पुस्तकांनी भरलेले शेल्फ, पुस्तके वाचत बसण्यासाठी टेबल-खुर्च्या, पुस्तके चेक आऊट व जमा करण्यासाठी असलेले काउंटर अशा अनेक गोष्टी येतात. पण एक छोट्याशा लाकडी बॉक्सटाईप कपाटाएवढी सार्वजनिक लायब्ररी असू शकते असे सांगितले तर ते पटेल काय? नाहीच ना पटणार …. पण अशी छोटीशी इटुकली पिटुकली लायब्ररी आहे आणि ती एकच नसून तिची संख्या लाखाच्यावर आहे. या लायब्ररीचे नाव’ लिटिल फ्री लायब्ररी’ आहे . नावाप्रमाणेच हि लायब्ररी छोटीशी असून पूर्णपणे मोफत आहे.

अमेरिकेसोबत इतर अनेक देशातल्या कम्युनिटीमध्ये वा कॉलनीमध्ये काही घरांच्या बाहेर एका छोट्याशा लाकडी कपाटात पुस्तके ठेवलेली असतात. ज्याला हवे तो सरळ त्या कपाटाचे दार उघडून पुस्तके घेऊ शकतो. त्यासाठी कुठलेही मूल्य आकारले जात नाही वा कोणी किती, कुठली पुस्तके घेतली हे बघायला ही तिथे कोणी असत नाही. अट एकच आहे कि घेतलेली पुस्तके वाचून झाली कि परत आणून ठेवायची. तसेच आपली स्वतःची पुस्तके ही तिथे शेअर करायची. अर्थात ते करण्याचे बंधन नाही पण केले तर पुस्तकांची कमतरता पडणार नाही. छोट्यांची व मोठ्यांची ही पुस्तके तिथे असतात. शक्यतो त्या कॉलनीमध्ये राहणारे लोकच त्याचा वापर करतात.

तर ही अशी भन्नाट कल्पना सुचली ती अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील हडसन शहरात राहणाऱ्या टॉड बोल या अवलियाला. शिक्षिका असलेल्या त्याच्या आईला वाचनाची खूप आवड होती. २००९ मध्ये त्याने तिच्या स्मरणार्थ एक शाळेच्या आकारासारखे एक कपाट तयार केले व त्यात पुस्तके भरून ते आपल्या घरासमोर ठेवले. शेजारी व मित्रांना त्याची ही कल्पना खूप आवडली . मग त्याने आणखी अशी कपाटे तयार करून त्यांना दिलीत .

मॅडिसन येथे राहणारा रिक ब्रुक्स हा टॉडच्या संकल्पेनेने प्रभावित झाला व त्याने त्याच्यासोबत काम सुरु केले. २०१० मध्ये त्यांनी या आपल्या मोहिमेला ‘लिटिल फ्री लायब्ररी’ नाव देऊन संस्था स्थापन केली . चांगली पुस्तके समाजासोबत शेअर करून समाजाला एकत्रित आणायचे उद्दिष्ट्य त्यावेळेस स्पष्ट केले. ‘Take a book ,share a book ‘असे या लिटिल लायब्ररीचे ब्रीद वाक्य आहे.

मॅडिसन येथील सायकलीच्या मार्गावर पहिली लिटिल लायब्ररी अधिकृतरीत्या बसविण्यात आली. काही महिन्यात हजारो लोकांनी बघितली. त्यानंतर अनेक लोकांना अशी लायब्ररी आपल्या इथे असावी असे वाटू लागली. ते लोकही मग यांच्या या मोहिमेत सहभागी झाले. त्यांना ‘स्टिव्हर्ड म्हणतात. या दोघांनी अशा अनेक लायब्ररी स्वतःच्या संस्थेचा लोगो, नाव व सिरीअल नंबर टाकून बनवून देण्यास सुरुवात केली. हळूहळू या छोट्याशा लायब्ररीचा आवाका वाढू लागला, ती आकाराने नव्हे तर संख्येने मोठी होऊ लागली. २०११ मध्ये राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष याकडे वेधले गेले. त्यावेळीस ४०० लायब्ररी झाल्या होत्या. अँड्रयू कार्नीज याने विसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्लिश बोलणाऱ्या ठिकाणी मोफत २५०८ सार्वजनिक लायब्ररी करण्याचे उद्धिष्ट ठेवले होते. टॉड व ब्रूक्सने त्याच्याकडून प्रेरणा घेऊन २०१३ पर्यंत २५०८ लिटील लायब्ररी सुरु करण्याचे ठरविले, जे त्यांनी ऑगस्ट २०१२ मध्येच पूर्ण केले.

२०१३ मध्ये वाचनसंस्कृतीत नवीन संकल्पनेबद्दल National Book Foundation तर्फे लिटील लायब्ररीला पुरस्कार देण्यात आला तर American Library Associationने टॉड व ब्रुक्स यांना मूव्हर्स अँड शेकर्स कडून ‘Thought Leaders “म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. महत्वाचे म्हणजे २०१५ मध्ये ‘ Library of Congress Literacy Award ‘ हा अमेरिकन सरकारचे पुरस्कार मिळाला. २०१८ मध्ये या संस्थेचा जनक टॉड याचे कॅन्सरने निधन झाले. मरण्यापूर्वी त्याने ,’ प्रत्येक कॅम्युनिटी मध्ये एक,प्रत्येक कॉर्नरला व प्रत्येक व्यक्तीच्या हातात पुस्तक असायला पाहिजे, लोकांनी, समाजाने या अशा वाचन चळवळीतून एकत्र आले पाहिजे.

समाज एकसंध झाला पाहिजे ’, अशी शेवटची इच्छा व्यक्त केली. त्याच्या या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज जगातल्या ११० देशांत मिळून जवळपास दीड लाख लिटिल फ्री लायब्ररी आहेत. टॉडच्या प्रयत्नामुळे जगातील सर्वात मोठी पुस्तक आदान -प्रदान ( book sharing) मोहीम उदयास आली,ज्याचा फायदा वाचन संस्कृती वाढण्यास झाला. ज्ञान दिल्याने वाढते म्हणतात ,खरच आपल्याकडे असलेले पुस्तकरूपी ज्ञान जर आपण समाजासोबत शेअर केले तर नक्कीच एका चांगला, सुसंस्कृत समाज निर्माण होईल.

Related posts

महागाईचा भस्मासुर

पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका

कृषी क्षेत्रात ड्रोन वापरास प्रोत्साहन…

Leave a Comment