अध्यात्म हे तोंडपाठ करून समजत नाही. ओव्या पाठ असतात. श्लोक पाठ असतात. अभंग सुद्धा सुरात गाण्याची सवय असते. न पाहाता सुद्धा ते तोंडपाठ असतात. पण ते आपल्यात कधीच उतरत नाहीत. ओवी पाठ असून उपयोगाची नाही तर ती ओवी आपल्यात उतरायला हवी. तो अभंग आपणास अनुभवता यायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
तऱ्ही न जुंझे ऐसें । निष्टंकिसी जें मानसे ।
तें प्रकृति अनारिसे । करवीलचि ।। १२८५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – तरी मी लढणार नाही, असा जो तूं मनाने निश्चय करीत आहेस, तो निश्चय तुझा क्षात्रस्वभाव उलट करवीलच.
जीवनात आपण बऱ्याचदा अनेक गोष्टी जमणार नाहीत म्हणून सोडून देतो. पण ज्यावेळी आपण त्या सोडतो त्यानंतर त्या गोष्टी इतक्या सोप्या व सहज वाटू लागतात की आपले आपणासच त्याचे आश्चर्य वाटते. त्यामध्ये अगदी सहजरित्या यश प्राप्त होते. असे अनेकदा घडते. आपण मनाने ती गोष्ट पुन्हा न करण्याचा विचार करतो अन् ती गोष्टच आपणास प्रोत्साहित करते. आपल्यामध्ये अंगभूत काही गुण असतात. जे आपणाला कधीही सोडता येत नाहीत. ते गुण अशावेळी आपोआपच आपणास लढायला भाग पाडतात. अन् अवघड वाटणारी गोष्ट सुद्धा ती अगदी सहजरित्या सोडवितात.
ज्ञानेश्वरी वाचताना सुरुवातीला असे होत होते. ज्ञानेश्वरी वाचत होतो पण काहीच समजत नव्हते. ओव्यावरून फक्त नजर फिरवली जायची ओवी कधी मनात उतरायचीच नाही. त्या ओवीचा अर्थ सुद्धा समजत नव्हता. अशाने मग वाचनाचा कंटाळा वाटू लागला. ज्ञानेश्वरी वाचन सोडून द्यावे असे वाटू लागले पण आश्चर्य म्हणजे नंतर त्या ओव्याच आपणाशी बोलू लागल्या. संवाद साधू लागल्या. त्या ओव्या जणू आपल्या जीवनातील रहस्यच उलघडून सांगू लागल्या. इतकी जवळीक त्या ओव्यांची झाली. आपण जमत नाही म्हणून सोडतो अन् त्या गोष्टी आपोआपच होऊ लागतात. ज्ञानेश्वरी तोंडपाठ असणे वेगळे अन् ज्ञानेश्वरी बोधाने समजून घेणे वेगळे आहे. ज्ञानेश्वरी हे बोधामृत आहे. अनुभवावेच त्यातील शास्त्र आत्मसात होते.
दैनंदिन जीवनात आपण सध्या इतके व्यस्त असतो की आपणास अध्यात्मासाठी वेळ द्यायलाही सवड नसते. धार्मिक पर्यटनासाठी जातो अन् पर्यटन करून आल्यानंतर सर्व धर्म विसरतो. हे प्रत्येकाच्या जीवनात घडते. मानवाचा स्वभावच तसा आहे. इतकेच काय साधनेला बसतो पण मन मात्र इतरत्र भटकत असते. या गोष्टी नित्याच्या आहेत. म्हणून मग आपण साधना, देवधर्म सोडून देण्याचा विचार करतो. पण खरोखरच ते सुटते का ? जेंव्हा आपण सोडून देण्याचा विचार करतो तेव्हा दहा मिनिटे तरी शांत बसून साधना करावी असे मनोमन वाटतेच ना ? स्वभावाचा परिणाम आहे हा असे वाटत नाही का ?
अध्यात्म हे तोंडपाठ करून समजत नाही. ओव्या पाठ असतात. श्लोक पाठ असतात. अभंग सुद्धा सुरात गाण्याची सवय असते. न पाहाता सुद्धा ते तोंडपाठ असतात. पण ते आपल्यात कधीच उतरत नाहीत. ओवी पाठ असून उपयोगाची नाही तर ती ओवी आपल्यात उतरायला हवी. तो अभंग आपणास अनुभवता यायला हवा. श्लोकामुळे आपणास मानसिक शांती मिळायला हवी. सध्या पांडित्य गाजवून, अभ्यासाने अनेक आचार्य झाले आहेत. अशा व्यक्ती मठांच्या मठाधिपतीही आहेत. त्या ज्ञानी जरूर आहेत पण त्या व्यक्ती आत्मज्ञानी आहेत का हे सांगता येणे कठीण आहे. अध्यात्म हे आत्मज्ञानी होण्यासाठी अभ्यासायचे आहे. ही आत्मज्ञानाची लढाई आहे. पांडित्याची नाही हे समजून घ्यायला हवे.
स्वःची ओळख होते. पण स्वः ला अनुभवता येत नाही. साधनेने हा अनुभव घ्यायचा आहे. पण साधनेसाठी मनाची तयारीच होत नाही. मग कंटाळा येतो अन् साधना सोडून देण्याचा विचार येतो. हे युद्ध आहे हे स्वतःचे स्वतःशीच आहे हे लक्षात घेऊन ते लढायचे आहे. पण लढण्याची मानसिकता होत नाही. असे अनेकदा घडते. पण पुन्हा आपण आपोआपच साधनेकडे वळतो. पुन्हा याची गोडी लागते. कारण हे अनुभवशास्त्र आहे. याची अनुभुती येऊ लागली की पुन्हा आपणास लढावे असे वाटू लागते. यावेळी आपण लढत नसतो तर ते युद्ध आपणाकडून करवून घेत जात असल्याचा अनुभव येतो. हेच अध्यात्म आहे. जे अनुभवाने आत्मज्ञानी करते. ज्ञान होऊन चालत नाही तर आत्मज्ञानी व्हायला हवे तेंव्हाच हे युद्ध आपण जिंकतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.