सुपरकेन नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन
शिरोळः भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले.
शिरोळ येथे झालेल्या डॉ. बाळकृष्ण जमदग्नि यांच्या सुपरकेन नर्सरी टेक्निक् पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी संचालक मच्छिंद्र बोखारे होते. तर प्रमुख पाहुणे दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील होते.
डॉ. गवस म्हणाले, संशोधकांनी कितीही चांगले संशोधन केले तरी ते जोपर्यंत शेतकऱ्यांच्या रानात उतरत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही. चांगल्या संशोधनाचे मधल्या दलालांनी, शेतीच्या प्रश्नांची जाण नसणाऱ्या अपरिपक्व राजकीय नेतृत्त्वाने आणि भ्रष्ट यंत्रणेने पार वाटोळे केले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर शेतकऱ्यांना पोखरणारी बांडगुळे तयार झालेली आहेत. यामुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर उभा आहे. आज बियाणेवाले, किटकनाशकवाले, रासायनिक-सेंद्रिय खतवाले, रोपवाटिकावाले म्हणजे शेतकरी जगताला लागलेला कॅन्सर आहे. तो शेतकऱ्यांना खाऊन टाकतो आहे. त्यांनी सगळ्या बऱ्या-वाईटाचा बाजार मांडलाय. ते चोहोबाजूंनी शेतकऱ्याला ओरबडण्याचे काम करताहेत. शेतकऱ्याला उभा करण्यात कुणालाच स्वारस्य राहिलेले नाही. त्याचा मेंदू पैशाच्या लोभाने सडलाय. हे आपले आजचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.
यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, आजची ऊस शेती फायदेशीर करायची असेल तर सुपरकेन नर्सरी टेक्निक् सारखं पर्यायी उत्तम तंत्रज्ञान ऊस उत्पादकांच्या हाती दिले पाहिजे. बाळकृष्ण जमदग्नि यांनी सामान्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी अंगीकार केला पाहिजे. मी माझ्या शेतावर एकरी दीडशे टन उत्पादन घेताना हे आधी केले, आणि आता त्याचे अनुभवसिद्ध पुस्तक रूपाने डॉक्युमेंटस तयार झालेले आहे. ते प्रत्येक ऊस उत्पादकांनी स्वतःकडे बाळगले पाहिजे.
उद्याची ऊस शेती अधिक फायदेशीर करायची असेल तर बेणे बदलाला प्राधान्य दिले पाहिजे. अतिशय कमी पैशामध्ये आपण हे सहज, सोप्या सुपरकेन नर्सरी टेक्निकने करू शकतो. हे आम्ही करून दाखविले आहे. याचे जनक ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नि आहेत. त्यांनी राज्याच्या अनेक भागामध्ये सिद्ध करून दाखविलेले हे तंत्रज्ञान ग्रंथ रूपाने येते आहे. त्याचा ऊस उत्पादकांनी फायदा करून घेतला पाहिजे.
गणपतराव पाटील
प्रारंभी स्व. अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दत्त उद्योग समूह आणि कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्यावतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. लेखक डॉ. जमदग्नि यांनी निवृत्तीनंतरची प्रवृत्ती सांगताना त्यांनी केलेल्या सुपरकेन नर्सरी टेक्निकची सविस्तर माहिती दिली. त्याचा विस्तार कसा होत गेला हेही सांगितले.
यावेळी कृषि शास्त्रज्ञ प्रा. अरूण मराठे, विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, कृषिरत्न डॉ. संजीवदादा माने, प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण आणि मच्छिंद्र बोखारे यांची भाषणे झाली. ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, प्रसाद कुलकर्णी, रावसाहेब पुजारी, पुस्तकाचे सहलेखक प्रा. डॉ. बी. पी. पाटील, डॉ. केशव पुजारी, डॉ. दशरथ ठवाळ, डॉ. निळकंठ मोरे, सौ. डॉ. मृणालिनी जमदग्नि, रमेश पाटील, उत्तमराव जाधव, दिलीप जाधव, आदित्य घोरपडे-बेडगकर, संग्रामसिंह देसाई, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
