November 8, 2025
दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरच्या संवेदनशील घटनेवर केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली. उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
Home » दसरा मेळाव्यात रामदास कदम असे का बोलले ?
सत्ता संघर्ष

दसरा मेळाव्यात रामदास कदम असे का बोलले ?

मुंबई कॉलिंग –

उद्धव यांचे निकटवर्तीय माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनी कदम यांना आपण कोर्टात खेचणार असल्याची धमकी दिली आहे. ते म्हणतात- बाळासाहेबांच्या अंतिम क्षणाला आपण २४ तास मातोश्रीवर हजर होतो. मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. शेवटच्या काळात मातोश्रीवर बाळासाहेबांच्या शेजारी चोवीस तास डॉक्टर होते. २०१२ मधे बाळासाहेब गेले, कदम यांना पक्षाने २०१४ मधे मंत्री केले, नंतर त्यांच्या मुलाला पक्षाने आमदार केले, तेव्हा उद्धवसाहेब चांगले होते, जर ते वाईट होते, तर तेव्हाच कदम पक्षातून का बाहेर पडले नाहीत ?

डॉ. सुकृत खांडेकर

मुंबईत दोन्ही शिवसेनेच्या झालेल्या स्वतंत्र दसरा मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे विरूध्द उद्धव ठाकरे हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे नाहीत हे स्पष्ट झाले. शिंदेंच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणातून शिवसेनाप्रमुखांच्या मृत्युनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत तसाच ठेवल्याचा गंभीर आरोप केल्यावरून राजकारणात एक नवे वादळ निर्माण झाले. त्यांनी मंचावरून बोलताना म्हटले- बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता, याची माहिती काढा, मी जबाबदारीने मोठं विधान करतोय. दोन दिवस मृतदेह मातोश्रीवर का ठेवला होता, मी आठ दिवस तिथं मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो… मी जे बोललो, ती माहिती मला बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून समजली. त्या काळात बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, मात्र ते का घेतले हे मला समजले नाही…

रामदास कदम यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उबाठासेनेकडून अनिल परब, भास्कर जाधव, सुषमा अंधारे हे तर कदम यांच्यावर तुटून पडले. स्वत: उद्धव यांनी गद्दार, नमकहराम, हरामखोरांना आपण उत्तर देणार नाही, सारा महाराष्ट्र त्यांना ओळखतो, अशा शब्दात संताप प्रकट केला. बाळासाहेब ठाकरे यांचे सतरा नोव्हेंबर, २०१२ रोजी निधन झाले. मग तेरा वर्षांनी शिवसेनाप्रमुखांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवला होता असे कदम आताच कसे काय बोलले ?

उद्धव यांचे निकटवर्तीय माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनी कदम यांना आपण कोर्टात खेचणार असल्याची धमकी दिली आहे. ते म्हणतात- बाळासाहेबांच्या अंतिम क्षणाला आपण २४ तास मातोश्रीवर हजर होतो. मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. शेवटच्या काळात मातोश्रीवर बाळासाहेबांच्या शेजारी चोवीस तास डॉक्टर होते. २०१२ मधे बाळासाहेब गेले, कदम यांना पक्षाने २०१४ मधे मंत्री केले, नंतर त्यांच्या मुलाला पक्षाने आमदार केले, तेव्हा उद्धवसाहेब चांगले होते, जर ते वाईट होते, तर तेव्हाच कदम पक्षातून का बाहेर पडले नाहीत ? कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले की त्यांना जाळले असा प्रश्न विचारून अनिल परब यांनी थेट कदम यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या गृहमंत्र्याच्या ( योगेश रामदास कदम ) आईने जाळून का घेतले याची चौकशी व्हावी याची मागणी परब यांनी केली आहे. खरे तर ही घटना बत्तीस वर्षापूर्वीची म्हणजे १९९३ मधील आहे. घरात स्टोव्हवर स्वयंपाक करताना कदम यांच्या पत्नीच्या अंगावरील साडीने पेट घेतला, कदम यांनी त्यांना वाचवले व त्यात तेही जबर भाजले होते , दोघे पतीपत्नी सहा महिने जसलोक इस्पितळात उपचार घेत होते. आम्ही दोघे आजही जीवाभावाने संसार करीत आहोत पण अनिल परब हे आमची बदनामी करीत आहेत म्हणून त्यांना आम्ही कोर्टात खेचणार आहोत असे कदम यांनी म्हटले आहे.

कोकणात उदय सामंत त्यांचे साम्राज्य वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे कदम यांना नैराश्य आले आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. बाळासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांची विटंबना केल्याची जबर किमत रामदास कदम यांना मोजावी लागेल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

रामदास कदम हे विधिमंडळात विरोधी नेते होते, गृहराज्यमंत्री व नंतर पर्यावरणमंत्री होते. विधान परिषेदवर दोन टर्म आमदार होते. त्यांचे पुत्र योगेश हे गृह व महसूल राज्यमंत्री आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या मृत्युनंतर त्यांचा मृतदेह मातोश्रीवर का ठेवला होता, याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रामदास कदम यांनी केली असून आहे. ये तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है.. असा इशारा कदम यांनी मातोश्रीला दिला आहे.

रामदास कदम हे ठाकरेंच्या शिवसेनेत पाच दशके सक्रीय होते. आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नेते आहेत. राजकारणात व पक्षात ते लढाऊ व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सामान्य शिवसैनिकांशी ते आपुलकीने वागतात आणि विरोधकांशी ते आक्रमक असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारातून ते मोठे झाले. पक्षाने त्यांना मंत्रीपद दिले आणि संघटनेतही चांगले स्थान दिले. शिवसेनाप्रमुखांविषयी शिवसैनिकांच्या मनात मोठा आदर असतो.

शिवसैनिकांमधे शिवसेनाप्रमुखांना सर्वो्च्च स्थान असते. शिवसेनाप्रमुखांविषयी कोणी वेडेवाकडे बोलले तर शिवसैनिक ते सहन करीत नाही. शिवसेनेत नसलेल्या सामान्य जनतेला आणि अन्य राजकीय पक्षातील लोकांच्या मनातही शिवसेनाप्रमुखांविषयी आदर असतो. मग शिवसेनाप्रमुखांच्या मृत्युनंतर त्यांचा मृतदेह घरातच मातोश्रीवर ठेवला होता असे सांगण्याचे धाडस रामदास कदम यांनी केले तरी कसे ? शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनच ही माहिती आपल्याला मिळाली असे ते सांगत आहेत. पण एवढी धक्कादायक व संवेदनशील माहिती असताना कदम गेली तेरा- चौदा वर्षे गप्प का बसले होते ? अर्थात कदम यांनी स्वत:च या सर्व प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सीबीआय म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशी करावी असे त्यांचे म्हणणे आहे. तसे करायचे असेल तर राज्य सरकारने तशी शिफारस केंद्राला करावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी तयार आहेत का, हे अजून समजलेले नाही. पण रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुखांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर तसाच ठेवला होता अशी शंका व्यक्त करून राजकारणात नवा वादंग मात्र निर्माण केला आहे. मृतदेह दोन दिवस घरात तसाच ठेवला जाऊ शकतो का, हाच कळीचा मुद्दा आहे.

गोरेगाव येथील नेस्कोमधे शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मोजकी चार जणांची भाषणे झाली. त्यात रामदास कदम यांचे एक भाषण झाले. पक्षाच्या बहुतेक सभा- मेळाव्यात कदम यांना भाषणाची संधी दिली जाते व त्यांचे महत्व अधोरेखीत केले जाते. कदम हे एकनाथ शिंदे यांच्या विश्वासु चौकडीतील नेते आहेत. म्हणूनच कदम काय बोलतात याकडे सर्व माध्यमांचे व राजकीय पक्षांचे लक्ष असते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवतीर्थावर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यात अन्य नेते भाषणे करीत असत. मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, सतीश प्रधान, गजानन कीर्तिकर, सुभाष देसाई अशा नेत्यांची दणदणीत खणखणीत भाषणे होत असत. दसरा मेळाव्यात भाषणातून काय बोलायचे याची शिवसेनाप्रमुखांशी अगोदर अनेकदा चर्चाही होत असे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नेत्यांशी असा संवाद असतो का ? रामदास कदम यांनी मातोश्रीवर संशय व्यक्त करीत भाषणातून मोठा स्फोट घडवला. पण त्यांनी दसरा मेळाव्याचे टायमिंग कसे साधले, ? बेसावध मातोश्रीला मोठा हादरा देण्याचे धाडस कसे केले ? त्यांनी केलेल्या बेधडक आरोपाचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो ? हे कालांतराने समजेल…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading