‘मुफासा’ !
मिलेले नावाची आपल्या मुलनिवासींची भूमी शोधायला निघालेला न्यायप्रिय, शूर आणि तितकाच संवेदनशील सिंह… तिथं पोहोचण्याचा त्याचा थरारक प्रवास सिनेमाभर आहे… भन्नाट सिनेमात रंगून गेलो.
अखेर मुफासाला ती भूमी सापडते. सिनेमा पहात असताना बरोबर याच ठिकाणी एक फ्रेम पाहून काळीज लक्कन हललं. काहीतरी खुप जवळचं दिसल्यासारखं वाटलं. खुर्चीत सरसाऊन बसलो… त्यानंतरचा सिनेमा पाहताना मला लै लै लै ओळखीचं कायतरी सापडायला लागलं !!!
मुफासाच्या मुलनिवासींच्या भूमीत एक विलक्षण बहरलेला पिंपळवृक्ष आहे. ट्री ऑफ लाइफ. त्याखाली त्यांचा महान पूर्वज बसत असे… ही त्या भुमीची खूण, असं रफिकी मुफासाला सांगतो ! त्या पिंपळाची मुळं खुप पसरली आहेत हे कॅमेरा नीट क्लोजअप घेऊन दाखवतो…
त्या भुमीत एकोप्याने, मिळून मिसळून राहणारे विविध जातींचे प्राणी असतात…
अतिशय समृद्ध अशी ती भुमी असते…
अचानक मुफासाचा माग काढत दुसऱ्या भूमीतून घुसखोरी करून वेगळ्याच जातीचे, थोडे वेगळे दिसणारे कारस्थानी, खूँखार सिंह येतात. ते घुसखोर सिंह या गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या प्राण्यांमध्ये फुट पाडण्याचं कपट करतात. मुफासाची खोटी बदनामी करतात. काही प्रमाणात यशस्वीही होतात. भोळ्या-भाबड्या प्राण्यांचा त्यावर विश्वास बसतो. हे घुसखोर लोक शातीर दिमाग असतात. फोडा आणि राज्य करा ही नीती चलाखीने वापरतात.
…पण मुफासा हुशारीनं घुसखोरांचा तो प्रयत्न हाणून पाडतो… प्रचंड रण होतं आणि तो आपल्या मुलनिवासींची भुमी वाचवतो ! मुफासा रक्ताने राजघराण्यातला नसूनही मुलनिवासी लोक त्याला आपला राजा बनवतात. मुफासा आपल्या भूमीतील एकता आणि समता जपण्यासाठी सज्ज होतो.
…पण घुसखोरांनी जाता-जाता मनात विष पेरलेला स्कार अजून धुसफुसतोय… वरवर त्यानं मुफासाशी हातमिळवणी केली आहे पण त्याच्या चेहऱ्यावरचा खुनशीपणा सांगतोय की हा घरचा भेदी घात करणार. स्कारच्या मदतीने ते वर्चस्ववादी घुसखोर या प्राण्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रतिक्रांतीची वाट पहात दबा धरून बसलेत…
‘प्रजेच्या मनावर सत्ता गाजवणारा खरा सत्ताधीश असतो, प्रजेमध्ये भेदाभेदाचं विष पेरून कारस्थानानं सत्ता मिळवायची नसते.’ हा संदेश मुफासाच्या पुढच्या पिढ्या घेतात. राजा हा भूमीचा मालक नसतो, तर ‘रक्षक’ असतो हे मनाशी बाळगून शत्रूशी मुकाबला करायला सज्ज होतात.
शेवटच्या पंधरा मिनिटात अचानक अनपेक्षितरित्या आपल्या मातीतलं, ओळखीचं वाटावं असं सरप्राईज या सिनेमानं दिलं !
आणखीही एक ‘आपला जीव’ यात आहे, तो म्हणजे मुफासाला असलेला शाहरुखचा आवाज… शारख्या, एक ही दिल है यार, कितनी बार जितोगे !
– किरण माने, अभिनेता
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.