November 30, 2023
the-unfortunate-edge-of-a-short-lived-death-to-start-up-success
Home » “स्टार्ट अप”च्या यशाला ” अल्पायुष्याच्या” मृत्युची दुर्देवी किनार !!
संशोधन आणि तंत्रज्ञान

“स्टार्ट अप”च्या यशाला ” अल्पायुष्याच्या” मृत्युची दुर्देवी किनार !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये देशात “स्टार्टअप” उद्योग प्रकाराला मोठी चालना मिळाली. विविध नव्या कल्पना व नव-उद्योजकता यांना उभारी देणाऱ्या “स्टार्टअप” चे जग गेल्या काही वर्षात चांगलेच बहरले. मात्र या स्टार्टअपच्या बालमृत्यूचे किंवा अल्प आयुष्यात मृत्यु येण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. त्या विरोधात योग्य ती ठोस उपाययोजना करणे व स्टार्ट अप यशस्वी करण्यासाठी सकारात्मक पावले टाकणे अपरिहार्य आहे. त्याबाबत केलेले हे विचार मंथन.

प्रा नंदकुमार काकिर्डे,
पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार

अमेरिकेतील “सीबी इनसाईट्स” या संस्थेने भारतातील स्टार्टअप मोहीमेचा संशोधन पूर्ण अभ्यास नुकताच प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारतातील स्टार्टअप कंपन्यांचे अल्पायुष्यातील मृत्युंचे अपयश ठळकपणे उठून दिसणारे होते. या अहवालानुसार भारतात 10 नवीन स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या तर त्यातील केवळ एकच कंपनी सलग दहा वर्षे अस्तित्वात रहाते किंवा यशस्वीपणे काम करते. बाकी नऊ स्टार्टअप कंपन्यांचा बालमृत्यू म्हणजे अल्पायुष्यात मृत्यू झालेला असतो. गेल्या काही वर्षात भारतात मोठ्या प्रमाणावर या स्टार्टअप कंपन्यांचे पेव फुटलेले दिसले. त्यातील अनेक कंपन्या अचानकपणे अदृश्य झाल्या किंवा या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूक दारांना किंवा तेथे रोजगार लाभलेल्या कुशल कामगारांना मोठे फटके बसलेले आढळले. गेल्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये दोन हजार पेक्षा जास्त स्टार्टअप कंपन्या बंद पडल्या. 2021 या वर्षाच्या तुलनेत बंद पडलेल्या स्टार्टअपच्या संख्येत जवळजवळ वीस टक्के वाढ झालेली आहे. मोदी सरकारने स्टार्टअप इंडिया इनिशियेटिव्ह हाती घेतला. 2016 मध्ये केवळ 471 स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या होत्या. त्यात दरवर्षी वाढ होत होत 2020 मध्ये सुमारे 14 हजार 600 कंपन्यांना मान्यता मिळाली. 2021 मध्ये हा आकडा 20 हजारांच्या घरात पोचला तर 2022 मध्येही जवळपास तेवढ्याच नव्या स्टार्ट अप सुरु झाल्या. आजच्या घडीला त्यांची एकूण संख्या 84 हजारांच्या घरात गेली आहे. यातील सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात असून त्या खालोखाल कर्नाटक,तामिळनाडू, गुजराथ, दिल्ली, हरयाना व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये चांगली संख्या आहे. जागतिक पातळीवरचा विचार करायचा झाला तर अमेरिका व चीन पाठोपाठ या क्षेत्रात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय कंपन्या प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान सेवा,आरोग्य सेवा, शिक्षण क्षेत्र, कृषी क्षेत्र व खाद्य पेय क्षेत्र व जैव विज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.

भारतातील स्टार्टअप कंपन्यांच्या बालमृत्यूचे प्रमाण इतके जास्त का असावे याचा अभ्यास केला असता त्यात अनेक गोष्टी समोर येतात. काही कंपन्यांनी बाजारात आणलेली उत्पादने किंवा त्यांची विक्री पश्चात सेवा खुल्या बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये असफल राहील्या. याचे नेमके कारण म्हणजे या स्टार्टअप कंपन्यांनी बाजारपेठेचा अभ्यास किंवा त्याचे योग्य ते संशोधनच केलेले नव्हते. त्याचप्रमाणे बाजारामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांची या कंपन्यांना अजिबात कल्पना नव्हती. एवढेच नाही तर बाजारपेठेबाबतची त्यांची एकंदरीत समज अपुरी किंवा अल्पशा स्वरूपाची होती. अनेक कंपन्या ग्रामीण किंवा निम शहरी भागामध्ये सुरू करण्यात आल्या. या सर्व कंपन्यांचा भर हा प्रामुख्याने डिजिटल पायाभूत सुविधांवर होता मात्र त्यांनी ग्राहकांचा अपुरा अभ्यास केल्यामुळे किंवा त्यांना या सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे या कंपन्या सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरल्या.

अशा नव्या स्टार अप कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणे विशेष रस घेऊन गुंतवणूक करतात. जगभर स्टार्टअप कंपन्या सुरू करणारे नवउद्योजक योग्य ती काळजी घेऊन गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारतात. भारतात मात्र अशा प्रकारची काळजी हे नवउद्योजक घेताना दिसत नाहीत.अनेक वेळा अशा कंपन्यांमध्ये गुंतवला जाणारा पैसा हा नैतिक मार्गाने मिळवलेला आहे किंवा कसे हे पाहिले जात नाही. अनेक वेळा त्याबाबत मौन बाळगले जाते. त्यामुळे हे सामाजिक आणि सांस्कृतिक घडणारे बदल अडचणीचे ठरतात असे दिसते आहे.

अनेक वेळा असे आढळते की काही नाविन्यपूर्ण स्टार्ट अप कंपन्या प्रारंभीच्या काळात खूप वेगाने मोठी प्रगती करतात व चांगली उलाढाल ही करतात. मात्र नेमकी हीच गोष्ट या नवीन कंपनीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करते व त्यांचे हे झटपट यशच अपयशाला कारणीभूत ठरते. याचे प्रमुख कारण म्हणजे या कंपन्यातील तंत्रज्ञान प्रवीण असणारी प्रवर्तक मंडळी वास्तववादी अपेक्षा न ठेवता अवास्तव किंवा अव्यवहार्य उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना अपयश येते. प्रवर्तक मंडळी नेहमी नाविन्याचा शोध घेणाऱ्या बुद्धिमान व्यक्तींच्या शोधात असतात. त्यांच्याकडून व्यवसायाच्या विविध धोरणांची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते आणि स्पर्धात्मक पातळीवर या कंपन्या मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु एका बाजूला नवनव्या तंत्रज्ञानाचे आव्हान व दुसरीकडे व्यावहारिक नफा तोटा याचे गणित अनेक वेळा सोडवता येत नाही. त्यामुळे या स्टार्टअप कंपन्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. अनेकदा या कंपन्यांचा होणारा अनाठाई विस्तार किंवा बुद्धिमान तंत्रज्ञांना धरून ठेवण्यात येणारे अपयश हे कंपनीच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण ठरते असे लक्षात आले आहे. आपल्या देशामध्ये कौशल्यपूर्ण किंवा कुशल कामगार मिळणे हे खरोखरीच कठीण होत चाललेले आहे. अकुशल कामगारांची भरती करून या कंपन्यांना यश मिळणे अवघड असते. त्यामुळे भारतीय नवोद्योजकांना ज्या आव्हानाला तोंड द्यावे लागते त्यात योग्य व कुशल मनुष्यबळाचा अभाव ही सुद्धा गंभीर समस्या आहे.

आज भारतामध्ये विविध क्षेत्रांमधील स्टार्टअप कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झालेली आहे.अनेकांची उत्पादने किंवा त्यांच्यातील फरक अत्यंत अल्प किंवा फारसा आढळत नाही. त्यामुळे बाजारात वाजवी किमतीला अत्यंत दर्जेदार उत्पादन सादर करणे आणि बाजारपेठेत त्यातील मोठा वाटा मिळवणे हे अनेकांना जमत नाही. त्यामुळेच अशा प्रतिकूल बाजारपेठेमध्ये उतरून व्यवसाय करणे किंवा त्यातून वाजवी नफा न मिळाल्याने त्यांचा टिकाव लागत नाही व हेही त्यांच्या अपयशाचे प्रमुख कारण ठरते.

खरे तर स्पर्धात्मक जगामध्येच नाविन्यतेला खऱ्या अर्थाने चालना मिळते. ज्या कंपन्यांना बाजारात आपले नावीन्यपूर्ण उत्पादन वेगळ्या पद्धतीने सादर करणे व ग्राहकांना आकर्षक करणे जमते त्यांनाच व्यवसाय व्यवसायामध्ये तग धरणे शक्य असते. भारतात आज दररोज पाच दहा नव्या स्टार्टअप कंपन्यांचा उदय होत असतो. या नव्या कंपन्यांना सरकारी क्लिष्ट नियमनांचा त्रास होत असतो. हे नियम इतक्या गुंतागुंतीचे असतात की कोणत्याही तंत्रज्ञानी व्यक्तिला त्यातून मार्ग काढणे व सुलभपणे कंपनी सुरू करणे हेच मुळात खूप कठीण जाते. त्यातूनच स्टार्ट अपचे आजारपण सुरू होते. केंद्र किंवा राज्य पातळीवरील कोणत्याही प्रशासनाचे धोरण हे उद्योग स्नेही नसते ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर झारीतील “शुक्राचार्य “बसलेले आहेत आणि त्यांचा “भ्रष्टाचार ” हाच केवळ धर्म आहे. या वस्तुस्थितीमुळे नव्या स्टार्टअप चा प्रारंभीचा खर्च हिशोबाच्या बाहेर जातो व तो मृत्युपंथावर जाण्यासाठी कारणीभूत ठरतो.

गेल्या काही वर्षात भारतातील नवोद्योजकांनी अभूतपूर्व यश मिळवलेले आहे हे नाकारता येणार नाही परंतु त्याचवेळी अल्पवयात मृत्यू येणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांचे प्रमाण हे दुर्लक्ष करता येणारे नाही. केंद्र व राज्य शासनाने याबाबतीत अत्यंत प्रामाणिकपणे लक्ष घालून त्यातील चुका किंवा अडीअडचणी दुरुस्त केल्या किंवा दूर केल्या तर खऱ्या अर्थाने नवउद्योजकांनामदत होऊन देशात रोजगार निर्मिती आणि नाविन्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यासाठी हातभार लागू शकेल. या सर्व नवोद्योजकांना योग्य ते भांडवल वाजवी दराने वेळेवर पुरवणे, त्यांच्या मार्गातील प्रशासकीय काटे काढून टाकणे, वित्तीय व्यवस्थापनाचे योग्य धडे देऊन त्याची कुशलपणे अंमलबजावणी केली तर जास्तीत जास्त नवोदित तंत्रज्ञ याकडे आकर्षित केले गेले पाहिजेत. असे झाले तरच गेल्या काही काळात जाणवणारे स्टार्टअप चे अपयश निश्चित पुसून टाकता येईल. यासाठीच संबंधित सरकार व प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. खऱ्या अर्थाने या नवउद्योजकांना हात दिला तर त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निश्चित होईल यात शंका नाही. मात्र त्यासाठी केवळ बोलाची कढी नाही तर कार्यक्षम पद्धतीने सर्व पातळ्यांवर कामकाजात सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा हजारो नव्या स्टार्टअप चा अल्पवयातील मृत्यू पाहणे हेच आपल्या नशिबी राहील. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने नाविन्यतेचा शोध घेत सहकार्य आणि तज्ञांचे योग्य ते मार्गदर्शन केले गेले तरच जागतिक पातळीवर आपण स्टार्टअप च्या क्षेत्रात आणखी उत्तुंग भरारी मारणे शक्य आहे.

Related posts

कातळशिल्पांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक

औटघटकेची युगांतरंमध्ये अस्तित्वशोधाची नित्य नवी रूपे

एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद !

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More