December 4, 2024
Vivekacha Awaj Devdatta Parulekar Ajay Kandar article
Home » विवेकाचा आवाज
विशेष संपादकीय

विवेकाचा आवाज

समाजाच्या विरोधात जाऊन एखादं काम करणं ही सोपी गोष्ट नसते. पण हे काम करताना पुन्हा समाजच आपल्याबरोबर हवा ही धारणा मनात बाळगणे ही त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते. यासाठी असं काम करणाऱ्या व्यक्तीकडे दूरदृष्टी लागते. लोकांची मानसिकता ओळखावी लागते, लोकांबरोबर जाण्याची इच्छा लागते आणि लोकांमधलंच एक व्हावं लागतं.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. मोबाईल – ९४०४३९५१५५

आज सर्वत्र प्रत्येक गोष्टीत अस्मितेचे टोक गाठले जात आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस कोण जाती, कोण धर्मात, कोण विशिष्ट विचारात विभागला गेला आहे. अशा काळी निखळ माणूस म्हणून जगणारा माणूस अडचणीत आला आहे. तो एकटा पडला आहे. अशा वेळी विवेकाचा आवाज बनणाऱ्या व्यक्तीची समाजाला अधिक गरज असते. समाजाची स्थिती समजून घेऊन सर्व भेद ओलांडून फक्त माणसासाठी जो कार्यरत राहतो तो आपला समजायला हवा. नाहीतर विवेकाचा आवाज क्षीण होत जाईल. आजच्या विवेकाच्या आवाजापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते, समाजप्रबोधनकार ॲड. देवदत्त परुळेकर ! खऱ्या अर्थाने सम्यक दृष्टी ठेवून काम करणाऱ्या ॲड. देवदत्त परुळेकर ( मोबाईल – 94220 55221 ) यांची आजची भूमिका ही समन्वयवादी आहे आणि ती महत्त्वाची आहे!

ॲड. परुळेकर हे सुमारे पन्नास वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. विशेषत: समाज प्रबोधन हे त्यांचे क्षेत्र आहे. त्यांनी नव्वदच्या दशकात अंधश्रद्धा निर्मूलनाचे केलेले काम महत्त्वाचे आहे. समाजाच्या विरोधात जाऊन एखादं काम करणं ही सोपी गोष्ट नसते. पण हे काम करताना पुन्हा समाजच आपल्याबरोबर हवा ही धारणा मनात बाळगणे ही त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते. यासाठी असं काम करणाऱ्या व्यक्तीकडे दूरदृष्टी लागते. लोकांची मानसिकता ओळखावी लागते, लोकांबरोबर जाण्याची इच्छा लागते आणि लोकांमधलंच एक व्हावं लागतं. ॲड. परुळेकर हे असंच सहृदयी व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये काम करताना असाच विचार केला. त्यांनी लोकांची मानसिकता समजून घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करायला पाहिजे हा विचार महत्त्वाचा मानला. बऱ्याच वेळा समाजात काम करताना लोकांना आपलं काय चांगलं… काय वाईट हे कळत नाही. अशावेळी त्यांना त्यांच्या सगळ्याच गोष्टीला थेट विरोध न करता त्यांच्यातलाच एक होऊन आपल्याला काम करावं लागतं. त्यांच्या श्रद्धांना एकाएकी धक्का देऊन ते काम होत नसतं. हा विचार ॲड. परूळेकर यांचा यामागे होता. आज अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम याच पद्धतीने चालू आहे लोकांना समजून घेत.

ॲड परुळेकर संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संत विचार ते समष्टीशी जोडताना संतांचा मानवतावादी विचार महत्त्वाचा मानतात. त्यामुळेच संत साहित्याचे निरूपण ते करताना आपण ऐकतच राहतो. रसाळ वाणी आणि उपस्थित प्रेक्षकांना ताब्यात घेण्याची त्यांची निरूपणाची पकड कौतुक करावी अशीच आहे. विविध नियतकालिके, वृत्तपत्रे, मासिके आदींमध्ये सातत्याने ॲड. परुळेकर संत साहित्याबद्दल लिहित असतात किंवा सोशल मीडियाच्या चॅनेल मधून ते संत विचार घेऊन सामाजिक प्रबोधनही करत असतात. संत विचारातून समाजाचे प्रबोधन करणे हा त्यांचा ध्यास आहे. हे एवढ्यासाठीच इथे नमूद करायचे आहे की आजवर त्यांनी विविध प्रिंट मीडिया माध्यमातून सुमारे सात हजार लेख संत साहित्याच्या विचारदर्शन संदर्भात लिहिले आहेत. समाजाप्रती मनात तळमळ असल्याशिवाय एवढं काम होऊ शकत नाही. हे आपण समजून घ्यायला हवं. त्यांचे आजवर संत साहित्यावरील अनेक ग्रंथ प्रकाशित झाले असून यात प्रामुख्याने ‘एक तरी ओवी अनुभवावी (प्रस्तावना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक), तुका म्हणे (प्रस्तावना डॉ. सदानंद मोरे) नामा म्हणे (प्रस्तावना डॉ. अशोक कामत), एका जनार्दनी (प्रस्तावना डॉ. मुकुंद दातार), विठूची लेकरे, भक्तीचा मळा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ आदी ग्रंथांचा समावेश आहे. या सर्व ग्रंथांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून अनेक मान्यवरांनी या लेखनाविषयी ॲड.परुळेकर यांचे जाहीरपणे कौतुक केलेले आहे.

साने गुरुजींचे विचार आणि साहित्य व जीवनकार्य या संदर्भातील ते अभ्यासपूर्ण बोलतात. या संदर्भातल त्यांचे बोलणे ऐकताना वेळ कधी निघून जातो हे कळत नाही आणि साने गुरुजींच्या एकूणच कार्यासंदर्भातली नवीन माहिती लोकांना मिळते आणि त्यातून नवं भानही ते लोकांना देतात.

अनेक व्याख्याने, प्रवचने, वारकरी कीर्तन आदी अव्याहतपणे ते करत असतात. बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणचे विद्यमान अध्यक्ष, मुक्तांगण वेंगुर्लाचे अध्यक्ष, संत विचार अभ्यास मंडळ, वेंगुर्ला उपाध्यक्ष, वेंगुर्ला नगर वाचनालय माजी कार्याध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस या संदर्भात त्यांनी निष्ठेने काम केले आहे आणि अजूनही ते कार्यरत आहेत. या त्यांच्या कामासाठी आणि लेखनासाठी त्यांना डॉ. प्र. न. जोशी संतसाहित्य पुरस्कार, कोंकण मराठी साहित्य परिषदेचा नेरुरकर पुरस्कार, कोल्हापूर येथील संत गाडगेबाबा अध्यासनाचा विशेष पुरस्कार, वेंगुर्ला नगरपरिषदेकडून वेंगुर्ला रत्न पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे. बेळगावहून १९६८ पासून गेली ५६ वर्षे अव्याहतपणे आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या मामा दांडेकर दिंडीचे २००५ पासून नेतृत्त्व करणाऱ्या ॲड. परुळेकर यांनी नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष म्हणून केलेले काम विचाराच्या पातळीवर आहे. अलीकडे अनेक संस्थांमध्ये हौशी लोक कार्यरत असतात. त्यामुळे नेमके विचाराच्या पातळीवर आता संस्थांचे काम होत नाही. परंतु ॲड.परुळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने सेवांगणचे अनेक उत्तम उपक्रम राबविले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दोन दिवसाचा गांधी जागर कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरला होता. हीच दृष्टी त्यांची सेवांगणचे सगळे कार्यक्रम आयोजित करण्यामागे असते. हा त्यांचा विवेकाचा आवाज आजच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अध:पतनाच्या काळात अधिक वाढत जावो याच त्यांना शुभेच्छा !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading