October 27, 2025
डॉ. सोमनाथ कदम संपादित ‘अण्णाभाऊंची कादंबरी : आशय आणि समाज चिंतन’ या ग्रंथातून अण्णाभाऊंच्या साहित्यविश्वाचा सखोल अभ्यास वाचकांना मिळतो.
Home » अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन
मुक्त संवाद

अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन

‘अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन’ हा ग्रंथ आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. मराठी साहित्याचे वाचक, विविध विद्यापीठातील अभ्यासक, विद्यार्थी आणि अण्णाभाऊ प्रेमींना या ग्रंथाच्यानिमित्ताने अण्णाभाऊंच्या कादंबरीवरील एकत्रित आशय समजून घेण्याची संधी या ग्रंथाच्या रूपाने प्राप्त होणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या कथा व कादंबऱ्या वाचणे हा विद्यार्थीदशेपासून आमच्या अभ्यासाचा, चिंतनाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. त्यातूनच अण्णाभाऊंच्या साहित्याचा फार मोठा प्रभाव आमच्याही जीवनावर पडला आणि आम्हीही लिहिते झालो.

डॉ. सोमनाथ कदम

२०२० हे अण्णाभाऊचे जन्म शताब्दी वर्ष होते त्यानिमित्ताने अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारी अनेक व्याख्याने महाराष्ट्रभर दिली. त्यातूनच अण्णाभाऊंना नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या पुन्हा वाचून काढल्या आणि या सर्व कादंबरीवर एक अजोड ग्रंथ संपादित करण्याचा संकल्प १ ऑगस्ट २०२० रोजी केला. तो आज साधारण चार वर्षानंतर का असेना पूर्ण होत आहे याचे समाधान वाटते.

२०२० या वर्षात लॉकडाऊन सुरू होते; पण कामाला लागलो. महाराष्ट्रातील नामवंत लेखकांची सूची तयार करून वेगवेगळ्या कादंबरीचे विषय दिले. एक तर लॉकडाऊनचा काळ; त्यामुळे ग्रंथालय बंद, महाविद्यालयेही बंद, अशा अनंत अडचणी होत्या. त्यामुळे अत्यंत मंद गतीने लेख येऊ लागले. लेख मागवताना खरंतर पूरती दमछाक झाली; पण काम थांबवले नाही. अनेकवेळा असे वाटून गेले की, आपणच सर्व कादंबरीवर लिहावे आणि मोकळे व्हावे; परंतु अण्णाभाऊंना न्याय देणारे समीक्षक आणि समाजशास्त्रज्ञ आम्हाला हवे होते. म्हणून चिकाटी, जिद्द न सोडता कार्यमग्न राहिलो. तीसही लेख यायला दीड-दोन वर्ष लागली त्यानंतर संपादकीय सोपस्कार पूर्ण करावे लागले. त्याच बरोबर लॉकडाऊनमुळे प्रकाशक मंडळीना पूर्वपदावर यायलाही बराच काळ लागला त्यामुळे सदर ग्रंथासाठी अधिक काळ लागला हे मान्य करावे लागेल.

अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र कादंबरीवरील समीक्षा आणि समाज चिंतन मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. मराठी साहित्यामध्ये किमान अण्णा भाऊ साठे यांच्या संपूर्ण कादंबरीच्या बाबतीत तरी हा अभिनव आण एकमेवादितीय प्रयोग आहे असे आम्हाला वाटते. यापूर्वीही अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर संपादने आली आहेत ती आम्हाला प्रेरणादायी आहेत पण काळ बदलला की, समीक्षक, लेखक, समाज शास्त्रज्ञ यांची दृष्टीसुद्धा बदलते.

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करणारी आता तिसरी पिढी पुढे आली आहे. वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे, शांता शेळके, नारायण सुर्वे, शरद पाटील, माधवराव बागल, केशव मेश्राम, वामन होवाळ, विठ्ठल उमप, चंद्रकुमार नलगे, प्र. श्री. नेरुरकर अशा अनेक अभ्यासक व त्या त्या क्षेत्रातील जाणकारांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य यावर भाष्य केले. त्यानंतर डॉ. एस. एस. भोसले, गोविंदराव पानसरे, डॉ. सुभास सावरकर, रामनाथ चव्हाण, डॉ.सदा कऱ्हाडे, डॉ. गंगाधर पानतावणे, बाबुराव गुरव, भगवान ठाकूर, डॉ. यशवंत मनोहर, नागनाथ कोत्तापले, डॉ. श्रीपाल सबनीस, अर्जुन डांगळे, रतनलाल सोनाग्रा, डॉ. बजरंग कोरडे, डॉ. रावसाहेब कसबे, र. बा. मंचरकर, डॉ. प्रल्हाद लुलेकर, दत्ता भगत, उत्तम कांबळे, मोतीराम कटारे, जी.के. ऐनापुरे, डॉ. शरणकुमार लिंबाळे, बा. ह. कल्याणकर, आत्माराम पाटील, डॉ. माधवराव गादेकर, डॉ. राजकुमार मस्के, डॉ. भगवान वाघमारे, डॉ. मच्छिंद्र सकटे, तारा रेड्डी, नानासाहेब कठाळे, प्रकाश विटेकर, विजयकुमार जोखे, डॉ. प्रमोद गारोडे, डॉ. बी. टी. अंभोरे, आशा धावडे, नरेंद्र मारवाडे, चंद्रकांत वानखेडे, डॉ. ज्योती लांजेवार, डॉ. दत्ता पाटील, डॉ. नंदा तायवाडे, दिनकर साठे, उत्तम बंडू तुपे, डॉ. आश्रुबा जाधव, आसाराम गायकवाड, अंबादास सगट, अजीज नदाफ, मा.धो. खिल्लारे, खुशाल खडसे, डॉ. राजेश्वर दुडुकनाळे, मनोहर सावळे, गंगाधर गीते, डॉ. माधव पोतदार, सुबोध मोरे इ. याशिवाय अजून खूप मान्यवर अभ्यासक अशा अनेक अभ्यासकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील चिंतन मांडले. आता अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर सखोल चिंतन करणारे नव्या पिढीतील अनेक अभ्यासक पुढे सरसावले आहेत. त्यातील काही अभ्यासकाचे लेख या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळतील.

अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या साहित्याच्या अनुषंगाने या आधीही पंधरा महत्त्वपूर्ण संशोधन लेख वेगवेगळ्या मासिकात आम्ही लिहिले आहेत. ‘अण्णा भाऊ साठे साहित्य आणि तत्वज्ञान हे पुस्तक सुगावा प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केले. त्याचबरोबर सर्वव्यापी अण्णाभाऊ, समतावादी अण्णाभाऊ, झुंजार लोकलेखक अण्णाभाऊ अशा काही ग्रंथाचे संपादनही आम्ही केले आहे. याशिवाय साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती या महाराष्ट्र शासनाच्या समितीच्या माध्यमातूनही अण्णाभाऊंच्या साहित्याचे संपादन करण्याचे कार्यही करीत आहोत. परंतु हे सर्व करत असताना अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र कादंबरीवरील समाजचिंतन मांडणारा हा मौलिक ग्रंथ हे आमच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आणि ‘मैलाचा दगड’ म्हणून मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक मौलिक आणि दखलपात्र लेखक आहेत. कथाकार, कादंबरीकार, नाटककार, शाहीर, कवी अशी त्यांच्या कार्याची फार मोठी व्याप्ती आहे. अण्णाभाऊ हे मराठी साहित्यातील असे एकमेव साहित्यिक असावेत, जे लेखक होते, कलावंत होते आणि कार्यकर्तेही होते. त्याच बरोबर अण्णाभाऊ हे आज महाराष्ट्रातील एकमेव असे लेखक ठरले आहेत की, ज्यांचे व्यक्तिमत्त्व, ज्यांचे साहित्य हे चळवळीचे प्रेरणास्थान मानले जाते. अण्णाभाऊंच्या नावाने आज मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन चळवळीही चालतात. अण्णाभाऊंच्या वाट्याला आलेले वेगळेपण नोंद घेण्यासारखी बाब म्हणावी लागेल.

अण्णा भाऊ साठे ज्या काळात लेखन करीत होते तो काळ मराठी साहित्य क्षेत्रात अंधानूकरनाचा होता. तत्कालीन लेखकावर पाश्चात्यांचा प्रभाव असल्याने वास्तवाकडे लेखक मंडळींचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले होते. बेगडी प्रेमाचा झोल, पौराणिक कथांचे संदर्भ, निसर्गसौंदर्य यात रममान झालेल्या लेखकांना तोंडी लावायला एखाद दुसरा सामाजिक घटनेचा प्रभाव पुरेशा ठरे. अशा वरवरच्या केवळ रंजनवादी साहित्याला त्या काळात ऊत आलेला होता. मात्र खऱ्या अर्थाने मराठीचा रांगडी बाज साहित्यात उतरविण्याचे धैर्य अण्णा भाऊ साठे यांनी कादंबरीच्या माध्यमातून दाखवले. म्हणूनच एका अर्थाने अण्णा भाऊ साठे हे इथल्या शोषित, अंकित, वंचित समुहाचे समाज चिंतन मांडणारे स्वातंत्र्योतर काळातील महत्त्वपूर्ण विचारवंत साहित्यिक ठरतात.

कोणताही लेखक हा तत्कालीन परिस्थितीचे अपत्य असतो. त्याचप्रमाणे तो ज्या समूहात वावरतो त्याचे प्रतिबिंबही त्याच्या साहित्यकृतीत उमटणे साहजिकच असते. अण्णा भाऊ साठे यांच्या बाबतीतही असेच घडले. मराठी साहित्यामध्ये असलेली अभिजन वर्गाची मक्तेदारी अण्णाभाऊ साठे यांनी मोडीत काढली. अण्णाभाऊ जे लिहीत होते ते त्यांच्या मनातील व्यवस्थेचा जो कोंडमारा होत होता त्याचे ठळक विवेचन ते कादंबरीच्या माध्यमातून करीत होते. अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्या म्हणजे सम्यक समाजाचे संघटीत आत्मचरित्रच म्हणता येते.

भारतीय साहित्य क्षेत्राचा विचार केला तर पारंपारिक पद्धतीचे यश, अर्थप्राप्ती, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण, कांती समित उपदेश आणि उच्च आनंद प्राप्ती हे साहित्याचे प्रयोजने सांगितली आहेत. यातील कोणतेही प्रयोजन अण्णा भाऊंच्या कादंबरी लेखनाला लागू पडत नाही. अण्णा भाऊ साठे यांना वैज्ञानिक विचार दृष्टी असल्याने इतर पारंपारिक प्रयोजनाचे निकष अण्णा भाऊ साठे यांच्या कोणत्याही साहित्य कृतीला तंतोतंत लागू होत नाहीत. मात्र आधुनिक काळात जेष्ठ समीक्षक स. रा. गाडगीळ यांनी आपल्या काव्यशास्त्र प्रदीप या ग्रंथात नमूद केलेल्या साहित्य प्रयोजनापैकी ‘समाज जीवनाला गती ‘देणे’ हे प्रयोजन अण्णाभाऊ साठे यांच्या सम्यक लेखणीला लागू पडते. म्हणून मराठीतील ठळक जीवनवादी लेखकांमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अर्थात् माणूसपणाची निर्मिती आणि माणुसकीची जपणूक करणे, जीवनाचे बहरणे आणि माणूसपण शोधणे हीच अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरी निर्मितीची व्यापक भूमिका होती.

अण्णा भाऊ साठे यांचे कादंबरी लेखन हे इतर मराठी साहित्यिकांच्या साहित्यापेक्षा वेगळे कसे होते याचा शोध घेताना असे दिसते की, उच्च वर्णीय साहित्यिकांचा जीवन अनुभव अतिशय तोकडा, मर्यादित आणि जातीबद्ध होता. यासंदर्भात ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे हे ‘लोकसाहित्यिक अण्णा भाऊ साठे समग्र वाङ्मय’ या संपादित ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतात, “एखादा लेखक, कलावंत जेव्हा काल्पनिक, अमूर्त जगात रमत असतो तेव्हा त्याला त्याला स्वतःची जीवनदृष्टी कमावता येत नसते आणि तिच्या अभावी वाङ्मय निर्मितीमागची भूमिका ही तो कमावण्यास अपात्र ठरतो.”

अण्णा भाऊ साठे यांच्या कोणत्याही साहित्यकृतीचा विचार केला तर असे लक्षात येते की, त्यांच्या समग्र साहित्यात त्यांनी जीवन संघर्षातून प्रचंड वाचन, चिंतन आणि स्वतःच्या प्रयत्नांनी कमावलेली स्वतंत्र अशी जीवनदृष्टी अभिव्यक्त झाली आहे. (संदर्भ : लोकसाहित्यिक अण्णा भाऊ साठे समग्र वाङ्मय खंड २, २०१९, पृष्ठ- १०, प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे) अण्णा भाऊ साठे यांनी कादंबरी लेखनामागची भूमिका वारणेच्या खोऱ्यात, वैर, फकिरा, आवडी, अग्निदिव्य अशा काही कादंबऱ्या व काही कथा संग्रहाच्या मनोगतामध्ये आणि ‘युगांतर’ या मासिकात ‘मी का लिहितो ?’ या सदरामध्ये स्पष्टपणे मांडलेली आहे. अण्णा भाऊ म्हणतात, ‘अनुभूतीला व प्रतिभेला सत्याचे जीवन दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत; कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की, प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोग ठरते. म्हणूनच लिहिताना मी सदैव सहानुभूतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्यांच्या विषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात. त्याची मुर्वत ठेवूनच मला लिहिणे भाग पडतं’ अर्थात आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कादंबरी लेखनाच्या माध्यमातून जी पात्र रंगवली आहेत त्या पात्रावर त्यांचे विशेष प्रेम होते. ती पात्र त्यांनी कधीतरी, कुठेतरी पाहिलेली, त्यांना भेटलेली तर काही त्यांच्या नात्यातील माणसं होती. म्हणून कल्पनेच्या भराऱ्या न मारता अण्णा भाऊ साठे यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं तेच त्यांनी मांडले. ..म्हणून अण्णा भाऊ साठे हे कट्टर वास्तववादी लेखक ठरतात. अण्णा भाऊ साठे यांच्यावर ज्यांचा सर्वाधिक प्रभाव होता तो विचारवंत म्हणजे मॅक्झिम गोर्की एके ठिकाणी म्हणतो की, चिरडून टाकणाऱ्या दु;खी जीवनाचा रेटाआणि अफाट अनुभवाचा साठा यामुळे न लिहिता रहाणं मला अशक्यच असते’ अण्णा भाऊ साठे यांचीही लेखनविषयक हीच भूमिका होती.

अण्णा भाऊ साठे यांच्या काळात वाङ्मयीन प्रांतामध्ये दोन प्रवाह होते. ते म्हणजे कला ही जीवनासाठी आणि कलाही कलेसाठी. या दोन प्रवाहापैकी अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आपली साहित्य कला ही दुर्बल व वंचित यांच्या जगण्याचे माध्यम म्हणून पुढे आणली. अण्णा भाऊ साठे यांनी १९६३ सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्याख्यान दिले होते. त्याचा अधिक तपशील मिळत नाही परंतु प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ या पुस्तकात ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी अण्णाभाऊंच्या त्या भाषणातील एक उतारा दिला आहे. त्यात अण्णा भाऊ साठे स्पष्टपणे प्रतिपादन करतात की, ‘ गाठी मारण्याचा आणि सोडण्याचा माझा काही परंपरागत धंदा नाही. माझ्याकडे वास्तव जीवन अनुभवाच्या कथा, व्यथा, वेदना, इर्षा, जिद्द आणि जीवनाच्या आघाडीवर अथक लढणाऱ्या दलित कष्टकऱ्यांच्या हर घडीच्या संघर्षाचा भरपूर साठा आहे. त्यामुळे संघर्षाने उतू जाणारे नाट्यमय गतिमान संविधानकाच्या आकर्षाने करकचून परस्परांना आवळलेल्या अशा कथांचे दोर मी वळत असतो.

एकूण तेरा कथा संग्रह, चौदा लोकनाट्य, बारा पोवाडे, एक नाटक, एक प्रवास वर्णन आणि तीस कादंबऱ्या इतकी अमाप साहित्य संपदा अण्णा भाऊ साठे यांच्या नावावर असून त्यांच्या कादंबरीची संख्याही समीक्षक वेगवेगळी सांगतात. आम्ही अधिक चिकित्सक शोध घेतला असता असे दिसून आले की, आजमीतिला एकूण ३० कादंबऱ्या उपलब्ध आहेत. वारणेच्या खोऱ्यात ही कादंबरी मंगला या नावाने तर मास्तर ही कादंबरी नंतरच्या काळात धुंद या नावाने पुनर्प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र मूळ कादंबऱ्या ३० च उपलब्ध आहेत. या सर्व कादंबरीतील लेख प्रस्तुत ग्रंथात घेतले आहेत.

अण्णा भाऊ साठे यांच्या २३ कादंबऱ्या नायिका प्रधान तर आठ कादंबऱ्या नायकप्रधान आहेत. अन्य कादंबऱ्यांमध्ये दोन प्रमुख पात्रे किंवा अधिक पात्रे अण्णा भाऊ साठे यांनी चित्रीत केली आहेत. फकीरा, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात, वैजयंता, चंदन, आवडी, अलगुज, अग्नीदिव्य, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, मास्तर या कादंबरीची चर्चा झाली मात्र उर्वरित कादंबरीची समीक्षकांनी विशेष दखल घेतली नाही. त्यामुळे त्या दुर्लक्षितच राहिल्या. अण्णा भाऊ साठे यांच्या जवळपास सर्वच कादंबऱ्या वास्तव समाज जीवनाचा वेध घेणाऱ्या आहेत. त्यांच्या वैजयंता १९६१, आवडी टीळा लावते मी रक्ताचा – १९६९, माकडीचा माळ, डोंगरची मैना – १९६९, चिखलातील कमळ – १९६१, वारणेचा वाघ – १९७०, अलगुज, अशी ही साताऱ्याची तऱ्हा – १९७४, फकिरा – १९६२, चित्रा – २०१३ आवडी-इभ्रत २०१९ या एकूण नऊ कादंबऱ्यावर चित्रपट निघाले.

समाजातील उपेक्षित, वंचित समूहाचे जगणे वेशीवर टांगताना अण्णा भाऊ साठे यांनी येथील वाचकांना खऱ्या अर्थाने भारतातील दुर्बल जाती, जमाती भुक, भय, शोषित समूहाचे प्रश्न प्रस्थापितांच्या अत्याचाराखाली दबलेला कामगार वर्ग, गावगाड्यातील श्रीमंत वर्गाची मक्तेदारी मोडीत करणारे नायक आणि स्वाभिमानी व करारी बाण्याच्या नायिका असे एक नवीन विश्व अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या सामाजिक चिंतनातून कादंबरीच्या माध्यमातून पुढे आणले आहे म्हणूनच समाजचिंतन हा या ग्रंथाचा गाभा निश्चित केला आहे.

मराठी वाङ्मयाचे पारंपारिक निकष बाजूला सारत आस्वाद, उपमा, अलंकार, प्रतिमा, भाषासौंदर्य शोधण्याला अधिक महत्त्व न देता सामाजिक शास्त्रीय अभ्यास पद्धतीनुसार कादंबरीतील समाजशास्त्रीय भूमिका पुढे यावी यावर अधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. अन्यायी प्रवृतीला तीव्र विरोध, समतावादी मूल्याचा स्वीकार, बंडखोर नायिका, ही त्यांच्या कादंबरीची काही समान परिमाणे दिसतात. विशेष म्हणजे अभिजनवादी धारणेची एकही कादंबरी अण्णाभाऊंनी लिहिली नाही. दलित आंबेडकरवादी, ग्रामीण, मार्क्सवादी जनवादी आणि स्त्रीवादी अभ्यास प्रवाह अण्णा भाऊ रुंद करीत पुढे जातात.

थोर विचारवंत अँटोनिओ असे म्हणाला होता की, “राजकीय सामाजिक, गुलामगिरीतून मुक्तता करण्याचे पहिले पाऊल म्हणजे मनाला स्वतंत्र करणे हे होय.” हीच धारण अण्णाभाऊंच्या कादंबरीच्या मध्यवर्ती संकल्पनेत दिसते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक गुलामगिरी नाकारून माणूस म्हणून माणूसपणाची मागणी अण्णा भाऊ साठे कादंबरीतून करतात.
अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवरील लेखांचा अनुक्रम आम्ही कालखंडानुसार पाडला आहे. ‘वारणेच्या च्या खोऱ्यात’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीतून परकीयांच्या गुलामगिरीच्या विरोधात दंड थोपटून बंड करणारा हिंदूराव व त्यास साथ देणारी मंगला हे ओजस्वी कथानक पुढे येते. दूषित समाज व्यवस्था बदलण्यासाठी हिंदुरावचा लढा आजही लागू असून तो प्रतिनिधिक मानावा लागतो. डॉ. महादेव कांबळे यांनी अत्यंत नेटकेपणाने या कादंबरीतील आशय उलगडून दाखविला आहे.

याच काळात पुढे आलेली ‘चित्रा’ ही अण्णा भाऊ साठे यांची एक विलक्षण कादंबरी आहे. खलाशांचा इंग्रजांच्या विरोधातील उठावाचा आशय असलेली ही कादंबरी कामगाराच्या लढ्यावर प्रकाश टाकताना काळ कोणताही असो, कामगाराची एकजूट राहिलीच पाहिजे, असा समर्पक संदेश देते. ‘चित्रा’ खरे तर सजगपणे जगण्याचे भान प्राप्त करून देते अशी चिकित्सा डॉ. शिरीष लांडगे करतात; तर ‘वैजयता’ ही तमाशातील अमानवीय जीवनाचा वेध घेणारी महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. पितृसत्ताक पद्धती नाकारणारी, तमाशातील दौलतजादा प्रवृत्तीचा विरोध करू पाहणारी आणि कलेवर प्रेम करा, शरीरावर नाही” असे ठणकावून सांगणारी वैजयंता न्याय, नीती, शील, चारित्र्य याचा नवा आदर्श आपल्यासमोर मांडते. अण्णा भाऊ साठे यांच्या कलाविषयक दृष्टिकोणावर आणि आजच्या कला आणि कलावंताच्या वर्तमान स्थितीवर मार्मिक चिंतन यावर लोककलेचे जाणकार अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे यांनी प्रकाश टाकला आहे.

‘चंदन’ ही मुंबईच्या उपनगरातील कामगारांचे जगणे साकारणारी कादंबरी आहे. कामगार विश्वातील दादागिरी, भ्रष्टाचार, अप्पलपोटेपणा, दलालाकडून होणारी स्त्रियांची फसवणूक, विनयभंग, खून, मारामाऱ्या, विधवा स्त्रिया विषयीचा पुरुषांचा दृष्टिकोन अशा प्रश्नांचा वेध घेते. ‘गरीब आहे, गरीब राहीन पण स्वाभिमानाने जगेन’ असा निर्धार करणाऱ्या चंदनचे यथोचित परीक्षण डॉ. गिरीश मोरे यांनी अभ्यासपूर्वक केले आहे.

‘आवडी’ ही १९६३ मध्ये प्रकाशित झालेली अण्णाभाऊंची नायिका प्रधान कादंबरी आहे. या कादंबरीत आधुनिक काळातील फ्लॅशबॅक तंत्राचा अवलंब अण्णा भाऊ साठे करतात. या कादंबरीचे विवेचन करताना डॉ. कैलास अंभुरे म्हणतात ‘नायिका आवडी ही सरंजामी प्रवृत्तीला विरोध करते. न्यायप्रिय व कल्याणकारी मूल्यवस्थेचा आग्रह धरते.’ अण्णाभाऊंनी हीच लेखन प्रक्रिया आम्हाला विशेष भावते कारण अण्णाभाऊंची पात्रे अन्याय अत्याचाराच्या बेड्या तोडण्यास सरसावतात. हेच खरे तर लेखकाचे महत्त्वाचे कार्य असते.

‘माकडीचा माळ’ ही अण्णाभाऊंची एक लोकप्रिय कादंबरी आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या जगण्याचा पर्दाफाश करणारी ही कादंबरी समाजातील एका समूहाचे उपेक्षित जगणे निदर्शनास आणते. भय, भूक, गरीबी, सामाजिक बंधने, भावकी आणि तिचे जातपंचायत अंतर्गत वाद विवाद अशा विविध अंगाने पुढे सरकणारी ही कादंबरी भटक्या विमुक्त समुदायाच्या तेरा उपजातीच्या जगण्यावर सर्वंकष भाष्य करते. या कादंबरीतील बारकावे अत्यंत चिकित्सक पद्धतीने सामाजिक शास्त्राचे अभ्यासक डॉ. नारायण भोसले यांनी स्पष्ट केले आहेत.

तर ‘वैर’ ह्या कादंबरीतील इनामदार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष अण्णाभाऊ ‘नाही रे’ वर्गाची बाजू कशी घेतात याचे वर्णन यात आले आहे. वैर या कादंबरीच्या कथानकाची मध्यवर्ती संकल्पना असलेले इनामदार हे नाटक अण्णा भाऊ साठे यांनी १९४८ साली लिहिले होते. पुढे हीच कथा अण्णाभाऊंनी कादंबरीच्या रूपाने मांडली. त्याच बरोबर ही कादंबरी कोणत्याही एका नायका शिवाय लिहिलेली साहित्य कृती असून या निमित्ताने एक नवीन प्रयोग अण्णाभाऊंनी कादंबरीच्या फार्मच्या रूपात केलेला आहे याची प्रा. प्रतिभा टेंबे विशेष नोद घेतात.

‘गुलाम’ही अण्णाभाऊंची एक प्रतिकात्मक कादंबरी. गुलामची नायिका मीनाक्षी ही दलित, शोषित पीडित व वेठबिगार व गुलाम वासुला माणुसकीच्या आदर्श घालून देते. त्याला आपलेसे करते. अभिजनासमोर बहुजनांचीही मूल्यव्यवस्था असते आणि बऱ्याच वेळेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, यांच्या कसोटीवर बहुजनांची मूल्य व्यवस्था वरचढ ठरते हे पुन्हा एकदा अण्णा भाऊ साठे यांनी जोरकसपणे मांडले आहे असे डॉ. सूर्यकांत कापशीकर यांचे विश्लेषण आहे.

‘रानगंगा’ ही १९६५ मध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेली एक महत्त्वाची कादंबरी आहे. रानगंगा नदी यातील कथानकाच्या पार्श्वभूमी सतत येत असते. समाजातील दबलेल्या, पिचलेल्या नाडलेल्या, बहिष्कृत समाजाचे जगणे आणि मागणे अण्णाभाऊंनी मोठ्या ताकदीने रानगंगामध्ये कसे मांडले आहे याची चिकित्सा करताना नाशिक येथील अभ्यासक डॉ. विवेक खरे यांनी यथार्थपणे मांडली आहे. सर्वहारा, पिचलेल्या, नाडलेल्या, अडाणी, समुदायाचे जगणे आणि मागणे अण्णाभाऊ आपल्या कलाकृतीतून जगासमोर आणतात.

माणसा माणसातील एकोपा, मनमिळाऊपणाचा पाझर व्यक्त करणारी कादंबरी म्हणजे पाझर. या कादंबरीचा सुखांत शेवट अण्णाभाऊ करतात. शेवटी विनयशील, सत्यवचनी माणसाचा विजय होतो; पण सत्यवादी माणसाला अग्निपरीक्षेतून जावे लागते हे वास्तव सामाजिक सत्य पुढे आणणारी अण्णाभाऊंची ‘पाझर’ ही एक दुर्लक्षित कादंबरी आहे. या कादंबरीची साधकबाधक चर्चा डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे करतात.

‘अलगुज’ ही अण्णाभाऊंची एक सफल प्रेम कहानी चित्रित करणारी लक्षवेधी कादंबरी म्हणावी लागेल. रूढीग्रस्त, धर्मग्रस्त, जातीनिष्ठ, अहंकारी आणि हुकूमशाही प्रवृत्तीला छेद देत शारीरिक, भावनिक, बौद्धिक, भावनिक आणि मानसिक दृष्ट्या खिळवून ठेवणाऱ्या अलगुज या वाद्याच्या माध्यमातून मांडलेली कथानकाची घट्ट वीण वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या कादंबरीतील भाषाशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि सामाजिक चिंतन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने ज्येष्ठ लेखक डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी मांडले आहे. यातून अण्णाभाऊंची क्रांतीनिष्ठ भाषानिष्ठ, प्रदेशनिष्ठ व्यक्तीनिष्ठ आणि मूल्यनिष्ठ भूमिका आपल्या समोर येते.

‘मास्तर’ ही अण्णाभाऊंची एक लोकप्रिय कादंबरी. १९४२ च्या चले जाव चळवळीचा आधार असलेली ही कादंबरी एका निस्वार्थी गुरुजींचीही संघर्ष कथा आहे. ‘अण्णाभाऊंच्या जीवनाच्या अखेरच्या काळातसुद्धा अण्णाभाऊ आपला वैचारिक निष्ठेचा साहित्य लेखनाचा वृत्तस्थ गुणधर्म सोडत नाहीत याचा आधार म्हणजे मास्तर ही कादंबरी होय’ या शब्दात डॉ. बबन इंगोले यांनी या कादंबरीचे महत्त्व विषद केले आहे. म्हणूनच पुढील काळात ही कादंबरी मंगला या नावाने पुनर्प्रकाशित करण्याचा मोह प्रकाशकाला आवरता आला नाही.

‘कुरूप’ या कादंबरीच्या माध्यमातून खल प्रवृत्तीचा अंत अण्णाभाऊंनी परिणामकारकरित्या दाखवला आहे. कादंबरीची नायिका ही तिची अब्रू लुटण्यासाठी आलेल्या बाबा पाटलाला बंदुकीच्या गोळीने कशी ठार करते ही क्रांतिकारकता अण्णाभाऊंना समाजामध्ये पेरायची होती असे डॉ. सतिश मस्के यांचे प्रतिपादन आहे. अर्थात, अन्याय सहन करू नका, प्रसंगी ‘अन्याय करणाऱ्याचा गळा घोटा, अन्याय मोडून काढा’ ही अण्णा भाऊ साठे यांची बंडखोरप्रवृत्ती या कादंबरीत पुन्हा पुन्हा दिसून येते.

‘तारा’ ही सुद्धा खलप्रवृत्तीचा बीमोड करणारी व वाचकांची उत्कंठा वाढवणारी एक उत्तम वाङ्मयीन कलाकृती आहे. वाईटाचा अंतही वाईटच होतो हे सांगताना ‘वाईटावर चांगल्या चा विजय’ ही कॅचलाईन अण्णाभाऊ या कादंबरीच्या माध्यमातून पुढे आणतात. कोणत्याही परिस्थितीत अण्णाभाऊ ताराची प्रतिष्ठा मलिन होऊ देत नाहीत; कारण अण्णाभाऊ स्त्री जगताचा आदर करून स्त्री पुरुष समानता हे बीज समाजामध्ये पेरण्यासाठी सरसावलेले दिसतात. ताराचे सांगोपांग समाजनिष्ठ विवेचन ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रमोद गारोडे यांनी उत्तम पद्धतीने कथन केले आहे.
‘वारणेचा वाघ’ ही अण्णा भाऊ साठे यांची एक बहुचर्चित कादंबरी आहे. ज्येष्ठ समीक्षक जी.के. ऐनापुरे यांनी ‘वारणेचा वाघ चा उल्लेख एक उत्तम सेक्युलर कादंबरी म्हणून उल्लेख केला आहे. समाजामध्ये असलेले जात वास्तव या कादंबरीत विस्ताराने आले आहे. या कादंबरीचा नायक सत्तू भोसले असून असा नायक मराठी कादंबरीच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही असे जी. के. म्हणतात. ते तंतोतंत खरे वाटते.

‘मूर्ती’ ही अण्णा भाऊ साठे यांची धाडसी कादंबरी आहे. सुंदर आचार, सुंदर विचार आणि चांगली राहणी म्हणजे सुंदरता असे अशा मौलिक विचारांना अण्णाभाऊ या निमित्ताने पुढे आणतात हे ज्येष्ठ लेखक डॉ. सतीश कामत यांचे सूचन इथे महत्त्वाचे ठरते. स्त्री सुंदरतेचा नवा पैलू त्यांनी या कादंबरीत हाताळला आहे. मूर्ती या नायिकेच्या रूपाने जातीची, धर्माची, प्रादेशिकतेची कुंपणे सोडून देऊन वैवाहिक स्वातंत्र्य जोपासून, समाजातील नव्या पिढीने, तरुणाईने पुरोगामी क्रांतिकारी विचार जपावेत हेच अण्णाभाऊ या निमित्ताने पुढे आणतात.

मराठ्यांच्या इतिहासातील प्रतापराव गुजर यांचे व्यक्तिमत्व अण्णा भाऊ साठे यांनी ‘अग्निदिव्य’ या कादंबरीच्या माध्यमातून रेखाटले आहे. अण्णा भाऊ साठे यांची ही एक महत्वपूर्ण ऐतिहासिक कादंबरी आहे. स्वराज्यासाठी प्रतापरावांनी कसे अग्निदिव्य झेलले. प्राणांची आहुती दिली. हा ऐतिहासिक दस्तऐवज अत्यंत परिणामकारक शब्दात अण्णा भाऊ साठे यांनी वाचकांसमोर इतिहास कथन केला आहे. मराठी कादंबरीच्या संदर्भात या कादंबरीच्या वेगळेपणाचा विचार होणे आवश्यक आहे असे नव्या पिढीतीला आघाडीचे समीक्षक डॉ. दत्ता घोलप म्हणतात.

‘मथुरा’ ही एक छोटेखानी परंतु परिणामकारक ठरलेली अण्णाभाऊंची कादंबरी आहे. एका उदात्त प्रेमाचे दर्शन यात घडते. विवाहासारखी नाते ही प्रेमाची, सुखाची असावीत. त्यात स्त्री-पुरुषांच्या इच्छा आकांक्षाचा विचार केला जावा हा सामाजिक संदेश अण्णा भाऊंच्या या मयुरा कादंबरीतून मिळतो हे सोदाहरणपणे डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी स्पष्ट केले आहे.

‘चिखलातील कमळ’ ही एक लोकप्रिय कादंबरी आहे. महाराष्ट्रात रूढ असलेल्या वाघ्या मुरळीच्या लोकरुढीवर बेतलेली सिताची ही कर्मकहाणी आहे. या कादंबरीत अण्णाभाऊंनी अत्यंत क्रांतिकारी विचार मांडले आहेत. जे जे वाईट आहे ते जाळून, पुरून टाकावेत. देवाच्या, धर्माच्या नावाने शूद्र स्वार्थासाठी काहींनी समाजात कुप्रथा निर्माण केल्या आहेत. त्या सोडून देऊन ‘जगा आणि जगू द्या’ हा विचार स्वीकारला पाहिजे हा मूलभूत विचार अण्णाभाऊंनी या कादंबरीच्या माध्यमातून मांडला आहे म्हणून डॉ. विठ्ठल भंडारे म्हणतात की, ‘चिखलातील कमळ ही कादंबरी म्हणजे सामाजिक प्रबोधन चळवळीचे होकायंत्रच आहे. ‘

सुष्टांनी दृष्टावर मिळवलेला विजय म्हणजे ‘कुरूप’ ही कादंबरी हे अत्यंत समर्पक शीर्षक देत साहित्याचे अभ्यासक डॉ. संजय शिंदे यांनी केवड्याचं कणीस’ या कादंबरीचे चिंतन मांडले आहे. कुटुंब नियोजनाचा संदेश, स्त्रीच्या सामाजिक हक्काचा संदेश आणि नैतिकतेचा संदेश देताना अण्णा भाऊंनी या साहित्यकृतीच्या माध्यमातून समाजाला सज्ञान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतो.

‘रुपा’ ही अण्णाभाऊंची आणखी एक मनोवेधक कादंबरी आहे. या कादंबरीला दीर्घकथा असेही म्हणता येईल. विकृत स्वभावाच्या तरुणांना नकार देत, नीतीसंपन्न असलेल्या दिनकरला रूपा स्वीकारते. ही व्यक्ती स्वातंत्र्याची आणि चारित्र्याची चाड असलेली आधुनिक विचार प्रणाली स्त्रीने स्वीकारावी अशा प्रकारचा आग्रह अण्णा भाऊ साठे रुपाच्या माध्यमातून पुढे आणतात असे प्रा. प्रकाश नाईक यांचे निरीक्षण खरे वाटते.

रूढी, परंपरा आणि रावसाहेबांच्या कावेबाजपणामुळे अनंत आणि शीला यांच्या जीवनाला कशी आग लागते याचा उलगडा करून दाखवणारी आग ही एक प्रतिकात्मक कादंबरी आहे. स्वातंत्र्योतर काळातील बदलत्या समाज जीवनाची,वर्ग भेदाची एक दुखरी किनार असलेल्या ‘आग’ या कादंबरीतील आस्वादपर आकलन आणि त्यातील सामाजिकता लेखक डॉ. मारोती कसाब यांनी समर्पकपणे रेखाटली आहे.

श्याम मानवी वर्तन व्यवहाराची मीमांसा करणारी ‘आघात’ ही अण्णाभाऊंची एक महत्त्वाची कादंबरी. डॉ. मनोहर सिरसाट यांनी नेमकेपणाने या कादंबरीचा आशय आणि त्याची चिकित्सा पुढे आणली आहे. नावाच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी चांगल्या माणसाची प्रवृत्ती रेखाटली आहे. शिवाय माणसातील माणूसपण, चांगुलपणा जपण्याचा विचार ‘आघात’ या कादंबरीतून लेखकाने पुढे आणला आहे.

लोककलेचे अभ्यासक सोपान खुडे यांनी ‘रत्ना’ या कादंबरीततील चिंतन मोजक्या शब्दात कथन केले आहे. रत्ना नावाच्या सैनिकाच्या पत्नीवर ओढवलेल्या दुर्दशेचे चित्र कादंबरीत आले आहे. ‘पुरुषी कामांधतेला बळी पडलेल्या उध्वस्त स्त्रीलाही समाजात सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. समाजानेही तशी सकारात्मक मानसिकता बाळगली पाहिजे.’ हा परिवर्तनवादी मूलभूत मानवतावादी विचार प्रथमच साहित्याच्या क्षेत्रात अण्णा भाऊ साठे यांनी ‘रत्ना’ या कादंबरीच्या माध्यमातून मांडलेला दिसतो.

स्त्रीचे शील, पुरुषांचा स्वाभिमान व राष्ट्राचे स्वातंत्र्य ही अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र लेखनाची त्रिसूत्री सांगताना डॉ. शरद गायकवाड यांनी ‘अहंकार’ या कादंबरीची सामाजिक व वाङ्मयीन चिकित्सा केली आहे. वरवर पाहता रंजनप्रधान व करमणूक प्रधान वाटणाऱ्या या कादंबरीचे अंतरंग महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनातील मराठी समाज संस्कृतीच्या मांडणीबरोबरच मुलगामी अशा मानवी जीवनमूल्या चा प्रबोधनात्मक संदेश देणारी ‘अहंकार’ ही कादंबरी असल्याचे शरद गायकवाड नमूद करतात.

ज्येष्ठ स्फुट लेखक डॉ. अनिल फराकटे यांनी ‘फुलपाखरू’ या कादंबरीच्या माध्यमातून शहरी जीवनाचे अंतरंग अण्णाभाऊंनी कसे उलगडून दाखवले आहे याचे चिंतन मांडले आहे. ‘महानगरीय कुरुपतेचे भयकारी चित्रण’ असे सार्थक वर्णन ते ‘फुलपाखरू’ या कादंबरीचे करतात. फुलपाखरू हे रूपक वापरताना फुलपाखरासारखे निरागस असलेल्या स्त्रीला उध्वस्त करणारा पुरुषी दुष्टपणा अण्णा भाऊंनी या कादंबरीच्या माध्यमातून दाखवून दिला आहे.

‘रानबोका’ ही अण्णाभाऊंची एक मौलिक परंतु दुर्लक्षित कादंबरी आहे. संभाजी आणि मोहना यांची प्रेम कथा हा या कादंबरीचा गाभा असून नांदेड येथील साहित्याचे अभ्यास डॉ. पी. विठ्ठल यांनी या कादंबरीचे अवलोकन करताना असे म्हटले आहे की, ‘आम्हीं बारा गाव फिरणारी गरीब माणसं असलो तरी आम्ही मोठ्या माणसांना कधीच विसरत नाही’ (पृष्ठ क्र. ५९२) यासारख्या विधानातून जो तत्व विचार अण्णाभाऊ मांडतात तो नजरेआड करता येत नाही शोकात्मक किनार असलेली ‘रानबोका’ ही कादंबरी अनेक प्रश्नांवर आणि मानवी स्वभावावर भाष्य करते.

‘डोळे मोडीत राधा चाले’ ही सुद्धा अण्णाभाऊंची एक स्त्रीप्रधान कादंबरी स्त्री शालिनता, चारित्र्यसंपन्नता, सहअस्तित्व या त्रिसूत्रीवर बेतलेली आहे. अण्णा भाऊ साठे यांनी कोणत्याही साहित्यकृतीत स्त्रीला कुठेही विद्रूप केलेले नाही तर स्त्रीमुक्तीचाच पुरस्कार ते करतात. प्राचीन काळापासून येथील गरिबांना वेठीस धरणारी, अध्यात्माचा बुरखा पांघरून बुवाबाजी करणारी, ढोंगी प्रवृत्ती आणि त्यांच्या वर्तनातील दांभिकता याचे चित्र या कादंबरीचे कथासूत्र आहे. कादंबरीतील राधा बुवाबाजीला दूर करीत कुटुंबाला, अब्रूला, घराण्याला आणि कर्तव्याला प्राधान्य देते हे राधाचे वर्तन नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून देते असे सूचन डॉ. सहदेव चव्हाण करून देतात.

‘संघर्ष’ ही अण्णा भाऊ साठे यांनी यांनी अखेरच्या टप्प्यात लिहिलेली कादंबरी. सुलभा, आनंद आणि बाळासाहेब यांच्या प्रेमाचा त्रिकोण यात चित्रित केला आहे. ‘चूल आणि मूल या चौकटीतच न अडकता सयंतपणे विद्रोह करीत समाज व्यवस्थेतील नाना प्रवृत्तीचा संघर्ष करीत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्रीला अण्णा भाऊ साठे यांनी या निमित्ताने पुढे आणले आहे. सुलभा सारख्या अनेक महिला आज समाजात आहेत, त्यांच्या तशा अवस्थेस जबाबदार कोण? याचाही विचार होणं अपेक्षित आहे हा डॉ. वैशाली बेटकर यांनी मांडलेला मुद्दा इथे तितकाच महत्त्वाचा आहे..

‘फकिरा’ ही अण्णा भाऊंची सर्वाधिक चर्चेत असलेली आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त गाजलेली कादंबरी. फकीरा कादंबरीवर ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉ. अनिल सपकाळ यांनी लिहिलेला ‘फकिरा – जात आणि वर्गाच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा टकराव’ हा सखोल आणि सूक्ष्म लेख या ग्रंथात समाविष्ट केला आहे. अन्याय अत्याचारावर आणि मुजोरीवर घाव घालणारा फकिरा आजही समाज समाजाला हवाहवासा वाटतो. डॉ. अनिल सपकाळ म्हणतात त्याप्रमाणे, आंबेडकरी इतिहास लेखन पद्धतीप्रमाणे प्राककथांचे आणि इतिहासाचे पुनर्लेखन फकिराच्या निमित्ताने अण्णा भाऊ साठे पुढे आणतात. ‘जग बदल घालुनी घाव ! सांगून गेले मला भीमराव’ असे ठामपणे म्हणणारे अण्णा भाऊ साठे ‘फकिरा’मध्ये फकिराच्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मुखर करतात.

या अनुषंगाने डॉ. अनिल सपकाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुडीगुडम औरंगाबाद येथील संवाद आणि जनता १५-८- १९५३ या नियतकालिकात छापलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधानही आधार म्हणून दिले आहे. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते, “वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही” हे ते विधान. या प्रमाणे फकिरातील फकिरा आणि अन्य पात्रे वंचित व नाकारलेल्या गटाचे समूह संवेदन म्हणजे ‘वाघासारखे बना’ हेच आहे.

‘फकिरा’ ही महत्वपूर्ण कादंबरी अण्णा भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंझार लेखणीस अर्पण केलली आहे. डॉ. अनिल सपपाळ म्हणतात त्याप्रमाणे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नायक रूप फकिराच्या व्यक्तिमत्त्वातून पुढे आले आहे. म्हणूनच या कादंबरीच्या अनुषंगाने ते पुढे स्पष्टीकरण करतात की, फकिरामध्ये आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे सृजन अभिव्यक्त झाले आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही समाजवादाचे विचार कादंबरीतून मुखर झाले आहेत.

अण्णाभाऊंनी ‘फकिरा’ ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली त्या विषयी वेगळीच मांडणी मोतीराम कटारे यांनी एका लेखात केली आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील वर्ग जाणीवा’ हा लेख मोतीराम कटारे यांनी लिहिला. तो लेख डॉ. मोहन लोंढे यांनी संपादित केलेल्या ग्रंथात समाविष्ट आहे. या ग्रंथात पान नंबर ९९ आणि १०० या दोन पानावर मोतीराम कटारे यांनी या अर्पण पत्रिके संदर्भात भाष्य केले आहे. त्यात भाऊसाहेब अडसूळ यांचा हवाला देत अण्णाभाऊंना फकिरा ही कादंबरी भाऊसाहेब अडसूळ यांनी अर्पण करायला लावली अशा प्रकारचा आशय त्यात मांडला आहे.

अण्णा भाऊ साठे हे जातिवंत प्रतिभावंत लेखक होते. कोणा इतरांच्या सांगण्यावरून अण्णाभाऊ बाबासाहेब यांना कादंबरी अर्पण करतील हे सदसदविवेक बुध्दीला पटत नाही म्हणून भाऊसाहेब अडसुळे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे कथन पुढे करीत अण्णाभाऊंच्या जातीवंत प्रतिभेवर शंका घेण्याचा अधिका कटारेंना कोणी दिला? असा प्रश्न पडतो.

याच लेखात अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी मोतीराम कटारे यांनी अजून दोन आरोप केले आहेत. १९५८ च्या दलित साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मोतीराम कटारे म्हणतात की, ‘अण्णा भाऊ साठे हे अपघाताने आंबेडकरी चळवळीशी जोडले गेले’ असे विधान त्यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतीवर साधारण १९४५ पासून जाणवतो.

फकिराच्या आधीही अण्णा भाऊ साठे यांनी जे लेखन केले आहे त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्पष्टपणे दिसतो. गण (१९४५) महाराष्ट्राची परंपरा (१९४६) विठू महार (१९५४) सोन्याचा मणी (१९५६) जग बदल घालुनी घाव (१९५३) त्याचबरोबर बुद्धाची शपथ, बरबादया कंजारी, उपकाराची फेड, सापळा अशा अनेक कथेतून व जग बदल घालुनी घाव या गीतातून आणि फकिरासारख्या अनेक कादंबऱ्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मूलभूत परिवर्तनवादी विचार अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य कृतीमध्ये ओतप्रोत भरलेला दिसतो..

‘उपकाराची फेड’ या कथेच्या अनुषंगाने असे म्हटले आहे की, महारानी ढोर ओढण्याचं काम कधीच नाकारले होते. कावडणं आणि आरुस हे महारानी जाळून टाकले होते. अण्णाभाऊ हे संदर्भ लक्षात घेत नाहीत असा धादांत खोटा आरोप अण्णा भाऊवर मोतीराम कटारे करतात. वास्तविक अण्णा भाऊंनी ही कथा १९५८ मध्ये लिहिली आहे. १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर शहरी भागातील महारांनी गुलामगिरीचे काम करण्याचे काम सोडून दिले होते हे खरे आहे; परंतु या विचाराचा अजून प्रचार झालेला नव्हता. १९५८ च काय इ.स. २००० पर्यंत महाराष्ट्रातील ठिकठिकाणी गावगाड्यातील अशी गुलामगिरीची काम करण्यात मांग- महार समाज अग्रणी होता हे व्यवहारिक वास्तव मोतीराम कटारे यांना दिसत नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या साहित्यकृतीवर अन्याय करण्याची री अन्य समीक्षकाप्रमाणे मोतीराम कटारेही ओढतात.

कादंबरीकार अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जसा गॉर्कीचा, लेनिनचा आणि मार्क्स चा जसा प्रभाव होता तसाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंझार व्यक्तिमत्त्वाचाही होता. विशेषतः अण्णाभाऊंच्या उत्तरार्धात १९५६ नंतर आंबेडकरी विचार प्रवाहात अण्णाभाऊ अग्रेषित झालेले दिसतात. याच कारणाने त्यांना अखेरच्या टप्प्यात मार्क्सवाद्यानेही स्वीकारले नव्हते. हे वास्तव सत्य आहे; परंतु जात्यांध समीक्षक आजही अण्णा भाऊंना जातीच्या चष्म्यातून पाहतात; त्यामुळे जशी जिवंतपणे अण्णा भाऊंना मानहानी, अवहेलना सहन करावी लागली ती मृत्यूनंतरसुद्धा थांबत नाही.
अर्थात, अण्णा भाऊ साठे यांचे विशेषत: कादंबरीच्या क्षेत्रात तर डोंगराएवढे काम आहे; परंतु त्यांच्या सर्वच कादंबऱ्याची विशेष चर्चा झाली नाही. समीक्षकांनी त्यांच्या साहित्यकृतीकडे दुर्लक्ष केले. कुसुमावती देशपांडे यांच्यापासून सुरू असलेली ही परंपरा अव्याहतपणे आजही चालू आहे. ती थांबलेली नाही आणि यात वर्गवादी, ब्राह्मण्यवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी सर्वच प्रकारचे समीक्षक आहेत.

कुसुमावती देशपांडे यांनी १९५३ साली मराठी कादंबरी (पहिले शतक) हा ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी अण्णाभाऊंची नोंद घेतली नाही. वास्तविक पाहता १९५३ पर्यंत अण्णा भाऊ साठे यांच्या वारणेच्या खोऱ्यात आणि चित्रा या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या होत्या. त्याकडे कुसुमावती देशपांडे यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली होती. आजही काही समीक्षकांना जशी अण्णा भाऊ साठे यांची जात दिसते तसे त्यानाही कदाचित दिसली असेल.

काही असो, अण्णा भाऊ साठे हे जातिवंत आणि अष्टपैलू कादंबरीकार होते. आपल्या कादंबरीतून त्यांनी समाज बदलाची अपेक्षा ठेवली. साहित्य हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे हे मानून त्यांनी लेखणीची ताकद समाजासमोर मांडली. लेखणीच्या माध्यमातून समाज बदलू शकतो यावर त्यांची श्रद्धा होती. या अनुषंगाने फ्रेंच विचारवंत व्होलटीयर चे विधान आठवते. तो असे म्हणाला होता की, ‘माय पेन इस माईटर देन दी स्पेकट्रो’ म्हणजे ‘माझ्या लेखणीचे सामर्थ्य हे तुझ्या राजदंडापेक्षा अधिक आहे’ असे तो तेथील राजाला उद्देशून म्हणाला होता. यामधून विचाराचे सामर्थ्य आपल्या लक्षात येते. अर्थात समाज सुधारण्याचा, समाज जागृतीचा आणि समाज प्रबोधनाचा विचार अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीच्या केंद्रस्थानी होता.

अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र कादंबऱ्यापैकी काही कादंबऱ्यांमध्ये निश्चितपणे विषयांचा तोचतोचपणा आलेला दिसतो. त्यामुळे दर्जाही सुमार वाटू लागतो; परंतु अण्णाभाऊंना आपल्या पात्रातून विशेषतः स्त्री पात्रातून त्यांच्यावर होणारा आणि अत्याचार मांडायचा होता. स्वार्थी पुरुषी मानसिकता, गावगाड्यातील सावकार आणि शहरी भागातील मुजोर भांडवलदार यांच्याकडून होणारा अन्याय, अत्याचार हा सार्वत्रिकच आहे. तो आजही थांबलेला नाही. त्यामुळे स्त्रीच्या वाट्याला आलेले दुःखही तेचतेच आहे; त्यामुळे काही वेळा आपल्याला अण्णाभाऊंच्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यात तोचतोचपणा वाटू लागतो परंतु अण्णा भाऊंनी विषयाचे गांभीर्य सांभाळले आहे. आणि त्यातूनच आपल्याला काहीं वेळा तसे वाटते परंतु मूलतः अण्णाभाऊंच्या सर्वच कादंबऱ्या वाचनीय आहेत.

आज आपण एकविसाव्या शतकात, विज्ञान तंत्रज्ञान, जागतिकी- करणाच्या कचाट्यात वावरत आहोत. काळ कितीही झपाट्याने पुढे जात असला तरी आजही अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवर वाचकाच्या उड्या पडतात.वाचकांची आवड-निवड, माध्यमे बदलली पण अण्णा भाऊ साठे यांची लोकप्रियता कमी झालेली नाही तर उलट अण्णा भाऊ साठे यांच्यावर संशोधन करणाऱ्या, लेखन करणाऱ्याची संख्या सतत वाढताना दिसते. आज सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात अण्णा भाऊ अभ्यासले जातात. अण्णाभाऊंच्या, अण्णाभाऊंवरील पुस्तकाचे ई-बुक येत आहेत. कारण अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडलेले विषय आजही तितकेच ताजे वाटतात.

अंधश्रद्धा, गरिबी, विषमता, दलाल शाही, गुंडगिरी, महिलावरील अन्याय, गावगाड्यातील जीवन, जाती जमातीचे प्रश्न, जातीवाद असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. हेच विषय अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीचा गाभा असल्याने आधुनिक काळातही अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य दर्जा टिकवून आहे म्हणूनच अण्णाभाऊ हे सार्वकालिक थोर साहित्यक ठरतात.

१९५१ ते १९६९ या काळात अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र कादंबरीचे वाङ्मयीन दृष्टिकोनातून समाजचिंतनपर अवलोकन आणि चिकित्सा मांडण्याचा धाडसी प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून आम्ही साकारला आहे. यापूर्वी अमरावती येथील डॉ. प्रमोद गारोडे यांनी ‘अण्णाभाऊंचे कादंबरी विश्व’ या ग्रंथाच्या माध्यमातून समग्र कादंबरीवरील संक्षिप्त विवेचन असलेला ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. परंतु सर्वच कादंबरीवर लेख घेऊन साकारलेला ग्रंथ आजपर्यंत उपलब्ध नाही. याचा विचार करून अण्णा भाऊ साठे यांच्या सर्व कादंबऱ्यांना न्याय देण्याचा आणि सम्यक असा ग्रंथ आपल्या समोर ठेवण्याचा आमचा संकल्प या निमित्ताने पूर्ण होत आहे.

अण्णा भाऊ साठे यांचे अभ्यासक, समाजचिंतक, कार्यकर्ते, विद्यार्थी सर्वांनाच हा ग्रंथ उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. प्रस्तुत ग्रंथासाठी मला महत्वपूर्ण मार्गदर्शन करणारे डॉ. गिरीश मोरे, डॉ. अनिल सपकाळ, डॉ. विवेक खरे, डॉ. सतीश कामत, डॉ. मिलिंद कसबे, डॉ. नारायण भोसले, डॉ. प्रमोद गारोडे, शिवा कांबळे नांदेड, डॉ. विजय कुमठेकर, ज्येष्ठ कादंबरीकार सुरेश पाटोळे, ज्येष्ठ अभ्यासक सोपान खुडे, तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवरील अभ्यासपूर्ण लेख देणारे सन्माननीय सर्व लेखक सन्मित्र या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

तसेच तन मन धनाने साथ देणारी पत्नी कवयित्री सुचिता गायकवाड (कदम) माझी मुले चि. सार्थक आणि सारंग, माझे आई-वडील, भाऊ-बहीण, पुतणे, भाचे या सर्वांच्या वेळेतीलच वेळ काढून या ग्रंथाचे संपादन करता आले. कळत नकळतपणे सर्वांचे यात योगदान आहे.

पुस्तकाचे नाव – ‘अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन’
संपादक – डॉ. सोमनाथ कदम
प्रकाशक – प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे
किंमत – ४५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 9764487272/7498509625


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading