जिथे बालसाहित्य आहे तिथे बालशिक्षण गृहीतच आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकरूप आणि एकजीव आहेत, हा विचार शिरोधार्य मानून लेखकाने बालशिक्षणाची मूल्ये रुजविण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रात काम करणार्या लेखकांना, समीक्षकांना तसेच तमाम गुरूजन वर्गाला हा ग्रंथ निश्चित आवडेल, अशी खात्री वाटते.
डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूर
मोबाईल – ९८३४३४२१२४
‘बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध’ हा डॉ. सुरेश सावंत यांचा संशोधनात्मक समीक्षाग्रंथ आहे. बालसाहित्य आणि बालशिक्षण हे दोन्ही विषय लेखकाच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, कारण ह्या क्षेत्रांत लेखकाचा दीर्घकाळ कृतियुक्त वावर राहिला आहे. डॉ. सुरेश सावंत यांनी बालकविता, बालकथा, किशोर कादंबरी, प्रेरणादायी चरित्रांचे लेखन, बालगीते, अनुवाद असे चौफेर लेखन करून साहित्यक्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवली आहे. उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून चौफेर कार्य करून भारत सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत.
बालसाहित्य आणि बालशिक्षणात सतत कार्यरत राहून बालकुमारांना आणि त्यांच्यासाठी कार्य करणार्या व्यक्ती आणि संस्थांना प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केलेले आहे. कुंटूर येथे २००९ मध्ये झालेल्या मैत्रमिलन बालकुमार साहित्य संमेलनाचे आणि जळगाव येथे २०१९ मध्ये झालेल्या सूर्योदय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ह्या दोन्ही संमेलनांतील अध्यक्षीय भाषणांमधून त्यांच्या अभ्यासाची, चिंतनाची, लेखनाची, बालसाहित्यविषयक दृष्टिकोनाची अभ्यासपूर्ण मांडणी प्रस्तुत ग्रंथाच्या सुरुवातीच्या दोन प्रकरणांतून करण्यात आली आहे.
कुंटूरच्या साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून बालसाहित्याची परंपरा, वारसा, भारतीय बालसाहित्याच्या परंपरेतील मराठी बालसाहित्याचे स्थान अधोरेखित केले आहे. महाराष्ट्रातील बालसाहित्याच्या चळवळीबरोबरच मराठवाड्यातील बालसाहित्य चळवळीचाही आढावा घेतला आहे. बालसाहित्य, त्यातून होणारे संस्कार, बालकांचे विश्व, प्रकाशकांची जबाबदारी अशा विविध मुद्यांच्या अनुषंगाने आपली परखड मते त्यांनी या भाषणांतून मांडली आहेत.
बालसाहित्य आणि बालशिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून ह्या दोन्हींच्या परस्परपूरकतेचा चिकित्सक विचार आपणास त्यांच्या जळगाव येथील संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामधून वाचावयास मिळतो. बालसाहित्य हा एक उपेक्षित प्रांत असल्याची खंत व्यक्त करून बालकांच्या अनुषंगाने त्यांनी सामाजिक स्थितिगतीचा आढावा, सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण इ. मुद्यांच्या अनुषंगाने आपले विचार मांडलेले आहेत.
मूल्यशिक्षण आणि मूल्यसंस्कारांचे महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी कथांचा आधार घेतला असून मूल्यरुजवणुकीवर भर देण्याचे आवाहन केलेले आहे. ज्ञान आणि रंजन देणार्या बालसाहित्यिकांची एक परिपूर्ण यादीच ते आपल्या भाषणात उद्धृत करतात. मोठ्यांनी छोट्यांसाठी लिहिलेले आणि बालकुमारांनी लिहिलेले बालसाहित्य असे दोन प्रकार सांगून बालकुमारांना लेखनप्रेरणा देणार्या प्रभृतींचा उल्लेखही यामध्ये आलेला आहे. दीडशे वर्षांतील बालसाहित्याला वाहिलेल्या नियतकालिकांचा उल्लेखही ते आपल्या भाषणात आवर्जून करतात. एकंदरीत बालशिक्षण, बालसाहित्य चळवळ, नियतकालिके आणि ही चळवळ समृद्ध करणार्या साहित्यिकांची दखल घेणारे अतिशय अभ्यासपूर्ण आणि सर्वांगसुंदर असे हे भाषण आहे.
एखाद्या विषयाच्या अनुषंगाने वाचन, चिंतन आणि मनन आणि मग स्पष्ट आणि सडेतोड लेखन अशी डॉ.सावंत यांची लेखनपद्धती ‘शिक्षणाच्या नावानं’, ‘अवांतर वाचन ः एक संस्कार’, ‘माझी शाळा : आनंदशाळा’, ‘प्रतिभेची नवी क्षितिजे’, ‘प्रतिभाकळ्यांच्या विकासासाठी’, ‘समृद्धीचे निसर्गसमृद्ध शिक्षण’, ‘नंदीबैल ः सांस्कृतिक संचिताचा साक्षीदार’ इ. प्रकरणांमधून लक्षात येते. आपल्या सेवाकाळात पाहिलेले, साहिलेले, जोखलेले संचित त्यांनी सडेतोड भूमिकेतून या लेखांतून मांडलेले आहे. ‘शिक्षणाच्या नावानं’ ह्या लेखात नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची स्थितिगती सांगून उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला आहे. मध्यान्ह भोजन योजनेमुळे आचार्यांचे आचारी बनल्याची खंत ते व्यक्त करतात. पटपडताळणी, कॉपीमुक्ती, पोषण आहारातील खाबूगिरी, प्रशिक्षणांचे कर्मकांड यावर त्यांनी अक्षरशः कोरडे ओढले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे वाचन हीसुद्धा चौथी मूलभूत गरज असून ‘अवांतर वाचन हा एक संस्कार’ असल्याचे मत त्यांनी नानाविध उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले आहे.
‘आधी केले मग सांगितले’ ह्या उक्तीस अनुसरून आपल्या कार्यकाळात शाळेत राबविलेल्या सहशालेय, शालाबाह्य व अभ्यासपूरक उपक्रमांची माहिती त्यांनी ‘माझी शाळा – आनंदशाळा’ ह्या लेखात दिली आहे. वर्गवाचनालय, लेखक आपल्या भेटीला, वाचकांचा आणि पुस्तकांचा शतकोत्सव, मागेल त्याला मागेल ते पुस्तक, नव्या पुस्तकांचे जाहीर स्वागत, वाढदिवसाची पुस्तकभेट, वाचनकट्टा, शोध प्रतिभाकळ्यांचा, नोबेल प्रतिभा भित्तिपत्रक, वाचनप्रेरणा पुरवणी, रोजनिशीः माझी सखी, लेखनकार्यशाळा, माझा शिक्षक चरित्रनायक, बालसाहित्याची समीक्षाः बालसमीक्षकांकडून असे वाचनासाठी आणि लेखनासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवून औपचारिक शाळेचे आनंदशाळेत परिवर्तन करता येते, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.
‘प्रतिभेची नवी क्षितिजे’ आणि ‘प्रतिभाकळ्यांच्या विकासासाठी’ ह्या दोन लेखांमध्ये प्रतिकूलतेतही अंतःप्रेरणेने कार्य करणार्या गुरूजनांची दखल ते घेतात. शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, साहित्यसंस्थांचे पदाधिकारी, अंतःप्रेरणेने मुलांना लेखनप्रवण बनवू शकतात. मुलांचे साहित्य वाचून त्यावर संस्कार करून संपादन करू शकतात. याबाबत सविस्तर आणि साधार विवेचन केलेले आहे. ‘समृद्धीचे निसर्गसमृद्ध शिक्षण’ हा लेख शिक्षणाला जात, धर्म, पंथाचे बंधन नसून मुळातली शिक्षणप्रेरणाच महत्त्वाची असल्याचे दाखवून देतो. समृद्धीने पारंपरिक शाळेत न जाता निसर्गाच्या आणि जीवनाच्या शाळेत प्रवेश घेतला. कुतूहलापोटी मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पठणाची पद्धत समजावून घेतली. चर्चमध्ये जाऊन प्रार्थना समजावून घेतल्या. तिची जातिभेदातीत वाटचाल कौतुकास्पद असल्याचे ते नमूद करतात. समृद्धी ही एक उत्तम लेखिका आणि कवयित्री असून तिच्या चार साहित्यकृतींचा थोडक्यात परामर्षही त्यांनी घेतला आहे.
पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींना शिक्षकांकडून, अधिकार्यांकडून मिळालेली प्रशस्ती ही लाखमोलाची असते. ‘नंदीबैल’ ह्या कवितेविषयी शिक्षणक्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकार्याकडून मिळालेली पोहोच लेखकाला भारावून टाकते. ‘नंदीबैल’ ह्या कवितेने कवीला गावखेड्याबरोबरच वाड्या-वस्त्यांवर पोहोचविलेे. आपले सृजनसंचित अध्यापक समरसून शिकविताहेत ह्या अभिप्रायाने कवी आनंदून जातो.
मराठी साहित्य व्यवहारात अतिशय स्वागतशील दृष्टिकोनातून डॉ.सुरेश सावंत त्यांनी ज्येष्ठांच्या बालसाहित्याचे आणि मुलांनी लिहिलेल्या बालसाहित्याच्या परीक्षणाचे, समीक्षालेखनाचे काम कमालीच्या आत्मीयतेने केलेले आहे. प्रस्तावना लिहून आणि पाठराखण करून अनेक नवोदितांना प्रेरणा आणि बळ द्यायचे काम केलेले आहे. या पुस्तकातील जवळपास सतरा पुस्तक परीक्षणे हे त्याचे उत्तम दाखले आहेत. पुस्तकाचा परिचय करून देणे, त्यातील आशय सौंदर्याबरोबर, त्याचा विषय, शैली, सुलभता, कल्पनात्मकता, बोधात्मकता इ. वाङ्मयीन वैशिष्ट्यांचा वाचकांना आस्थेवाईकपणे परिचय करून दिला आहे.
डॉ. सुरेश सावंत यांनी या ग्रंथामध्ये रा. रं. बोराडे, एकनाथ आव्हाड, समाधान शिकेतोड, नामदेव माळी या बालसाहित्यिकांच्या साहित्याचा परिचय तर करून दिलाच आहे; पण याचबरोबर रवींद्र जवादे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका डॉ. संगीता बर्वे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, सदानंद पुंडपाळ, प्रा. नारायण शिंदे, संजीवनी बोकील ह्याही प्रथितयश साहित्यिकांच्या ग्रंथलेखनाची साक्षेपी चिकित्सा केली आहे.
याशिवाय मुलांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये इयत्ता चौथीत शिकणारा मल्हार जाधव, रतन संकपाळ, श्रावणी पाटील, श्रीवर्धन पाटोळे या बालकुमारांच्या लेखनाचेही मुक्तकंठाने कौतुक केलेे आहे. बालकादंबरी, बालकथा, बालकविता, चरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारांचा आत्मा शोधून त्याच्यातील आशयसौंदर्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे डॉ.सावंत सरांचे हे कार्य नवोदितांसाठी निश्चितपणे खूपच मोलाचे आहे.
ज्येष्ठ बालसाहित्यकार आपल्या पूर्वायुष्याचा आधार घेऊन, बालविश्वात रममाण होऊन आपले लेखनकार्य सिद्धीस नेत असतात. मुलांचे रंजन करणे, त्यांना बोध देणे, मूल्यसंस्कारांची रुजवणूक करण्याचे कार्य प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बालसाहित्यातून घडत असते, म्हणजेच बालसाहित्य हे एक प्रकारे अनौपचारिक आणि सहजशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून कार्य करीत असते. हाच धागा पकडून डॉ.सावंत यांनी ‘बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध’ या ग्रंथातून सप्रमाण आणि चिकित्सकतेने उद्बोधक विचार मांडले आहेत. ह्या ग्रंथाच्या वाचनानंतर बालसाहित्य आणि बालशिक्षणासंदर्भात अनेक बाबी वाचकांना निश्चितपणे विचारप्रवृत्त करतील.
जिथे बालसाहित्य आहे तिथे बालशिक्षण गृहीतच आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकरूप आणि एकजीव आहेत, हा विचार शिरोधार्य मानून लेखकाने बालशिक्षणाची मूल्ये रुजविण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रात काम करणार्या लेखकांना, समीक्षकांना तसेच तमाम गुरूजन वर्गाला हा ग्रंथ निश्चित आवडेल, अशी खात्री वाटते. शोधक आणि चिकित्सक दृष्टिकोनातून ‘बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध’ हा अप्रतिम ग्रंथ लिहिल्याबद्दल डॉ.सुरेश सावंतसरांना मी मनापासून धन्यवाद देतो.
पुस्तकाचे नाव – ‘बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध’ (शिक्षणचिंतन)
लेखक – डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक – संगत प्रकाशन, नांदेड
मुखपृष्ठ – संतोष घोंगडे, पुणे
पृष्ठे – १७६, किंमत – रू.२५०/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.