कवयित्री अपर्णा पाटील यांच्या सार्या कविता या प्रत्येक ओळीत तीन ते चार शब्दांत आशय व्यक्त करताहेत. विषयाचा आशय इतक्या कमी शब्दात व्यक्त करण्याची त्यांची शैली उल्लेखनीय आहे
इंद्रजीत देशमुख
“मनातला गारवा “हा काव्यसंग्रह कवयित्री सौ. अपर्णा पाटील यांच्या लेखणीतून उतरला आहे.
प्रेम काव्यात नात्यांची वीण, त्यातील ताण, विरह ,आठवणी ,यांचं सुरेख मिश्रण कवितांमधून टिपले आहे.
” मिळालं ते सगळं
अगदी भरभरून होतं
विसरण्यासाठी माझ्याकडे मात्र
यातलं काहीच नव्हतं “
ही कृतज्ञता आणि नात्यातील पूर्तता छान रेखाटली आहे .नात्यात गारवा असावा, जरी उलथापालथ झाली तरी ते कोरडे होऊ नये .नात्यातील ओलावा थंड करणारा आणि आयुष्य चिंब करणारा असावा अशी इच्छा कवयित्री करते.
देव, भक्ती, माणसातला देव या विषयांनाही या संग्रहात समावेश केला आहे. मंदिरातल्या देवाला प्रसन्न करण्या अगोदर माणसातला देव शोधला की देव पदाकडे वाटचाल सुखकर होते. माणसाच्या दुःखाची जाणीव ठेवून जो त्यांची दुःखे हलकी करतो तो माणसातला देव जाणतो आणि स्वतःही देवपणाला पोहोचतो.
निसर्गाविषयी लिहिताना श्रावणासोबत येणाऱ्या माहेरच्या आठवणी गावकुसातले ग्रामीण जीवनात पावसाचे असणारे अप्रूप या गोष्टी आणि निसर्गातील वारा पक्षी यांच्या आवाजाचे वर्णन ग्रामीण जीवनाची आठवण करून देते .समुद्र त्याचा असिम पसारा आणि त्यातील सांज सौंदर्य कवयित्रीला काव्य लिहायला प्रेरणा देते .धबधबा, पाऊस या निसर्गाच्या अविष्काराचे यथोचित वर्णन नेमक्या शब्दांमध्ये करून कविता निसर्गाचा स्पर्श मनाला करून देतात .निसर्गामध्ये मनातील मळभ शोषून घेण्याची ताकद आहे. या कविता वाचताना त्याची जाणीव होते.
कवयित्रीच्या सार्या कविता या प्रत्येक ओळीत तीन ते चार शब्दांत आशय व्यक्त करताहेत. विषयाचा आशय इतक्या कमी शब्दात व्यक्त करण्याची त्यांची शैली उल्लेखनीय आहे. साऱ्या काव्यसंग्रहात अनेक विषयाला स्पर्श करून कवयित्रीने आपले विषय सामर्थ्य आणि लेखन सामर्थ्य प्रकट केले आहे.
पुस्तकाचे नाव – मनातील गारवा (कवितासंग्रह)
कवी – अपर्णा पाटील
प्रकाशक – सचिन पाटील,
किंमत – ७० रुपये