December 11, 2024
meditation from heart is the true supreme service
Home » मनापासून साधना हीच खरी परमसेवा
विश्वाचे आर्त

मनापासून साधना हीच खरी परमसेवा

सेवेचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. अध्यात्माचा अभ्यास यासाठीच केला पाहिजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असणारी साधना केली पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. हीच खरी सेवा आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

तैसें स्वामीचिया मनोभाव । न चुकिजे हेचि परमसेवा ।
येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ।।९१३।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे स्वामींच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्यांची श्रेष्ठ सेवा होय. त्यावाचून दूसरे काही करणे, म्हणजे अर्जुना, तो केवळ व्यापार होय.

सद्गुरू मनकवडे असतात. ते भक्ताच्या मनातील भाव ओळखतात. आत्मज्ञानी संत त्यानुसार भक्ताला मार्गदर्शन करतात. आधार देतात. भक्ताची आध्यात्मिक प्रगती करतात, पण अशा आत्मज्ञानी सद्गुरूंचा मनोभाव ओळखणार कसा ? सद्गुरूंच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार त्यांची सेवा करणे, हीच खरी परमसेवा आहे. खरा शिष्य सद्गुरूंच्या मनातील भाव ओळखू शकतो. त्यानुसार त्यांची सेवा करतो. आत्मज्ञानी संतांना शिष्याकडून फक्त पान, फूल, फळ याचीच अपेक्षा असते. स्वच्छ अंतःकरणाने दिले तरच ते त्याचा स्वीकार करतात; पण हल्ली संतांना आणि देवस्थानांना देणग्या देण्याची चढाओढ प्रचंड सुरू आहे. काही समाजात तर पूजेचे मान मिळविण्यासाठी लिलावही आयोजित केले जातात. विशेष म्हणजे लाखो, कोटी रुपये खर्चून ही सेवा केली जाते.

देवाला जर फक्त पान, फूल, फळ हेच लागते तर ही जडजवाहिरे, धनसंपत्ती दान का केली जाते ? दान दिल्या जाणाऱ्या संपत्तीमध्ये काळ्या पैशाचे प्रमाण अधिक आहे. मुळात ही संपत्ती गैरमार्गाने कमविली जाते आणि ती पचनी पडण्यासाठी देवाला दान दिले जाते. हे कसले दान ? खरे दान, खरी सेवा ही यामध्ये नाहीच. अशा प्रकारामुळेच अध्यात्माची चौकट बदनाम होत आहे. या अपप्रचारामुळेच धर्मावर शिंतोडे ओढले जात आहेत. खरे तर धर्मामध्ये याला सेवा म्हटलेले नाही. हा तर व्यापार आहे. यासाठी सेवेचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. अध्यात्माचा अभ्यास यासाठीच केला पाहिजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असणारी साधना केली पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. हीच खरी सेवा आहे.

सद्गुरुंना फक्त भक्ताचे अवधान आवश्यक असते. भक्ताने मनापासून साधना करणे हेच त्यांना अपेक्षीत असते. खरे भक्त हेच असतात जे मनापासून साधना करतात. मन सद्गुरुंच्या गुरुमंत्रामध्ये गुंतवतात. गुरुमंत्रावर अवधान हीच सद्गुरुंची खरी सेवा आहे. याच सेवेतून आत्मज्ञानाचा लाभ होतो. ज्ञानेश्वर माऊली वारंवार हेच सांगते आहे. यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत. पण अंतिम सत्य हेच आहे. हेच माऊलीला सांगायचे आहे. खरी सेवा कोणती आहे त्यानुसार त्याचे आचरण करा अन् स्वतःच सर्वज्ञ व्हा हेच सद्गुरुंना अपेक्षीत असते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading