April 26, 2024
Humility to remove ego article by Rajendra Ghorpade
Home » अहंकारावर नम्रता हाच उतारा
विश्वाचे आर्त

अहंकारावर नम्रता हाच उतारा

अहंकारावर नम्रतेचा उतारा आहे. अहंकार बळावू नये यासाठी अंगात नम्रता वाढवायला हवी. जितकी नम्रता वाढेल तितकी अहंकाराची तीव्रता कमी होत जाते. नम्रता मनात वाढण्यासाठी मनाची मानसिक तयारी करायला हवी. कितीही यश मिळाले तरी त्या यशाने हुरळून जायचे नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठीं ।
सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी ।। 82 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – अंहकाराची गोष्ट काही विलक्षण आहे. ती अशी की, अहंकार हा अज्ञानी पुरुषाच्या मागें विशेषेकरून लागत नाही. परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो. आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो.

अहंकार कसा आहे? तो प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. फक्त तो सुप्तावस्थेत आहे. अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण तो आपणास दिसत नाही. त्याचे अस्तित्व गुप्त असते. तसे अहंकाराचे अस्तित्व सुद्धा गुप्त असते. लहान मुलांमध्ये तारुण्य हे गुप्त असते. न उमललेल्या कळीमध्ये सुवास हा गुप्त असतो. लाकडामध्ये अग्नी गुप्त असतो. तसा प्रकृतीच्या पोटात हा अहंकार गुप्त असतो. अंगात ज्वर असतो पण कुपथ्य झाले की मगच प्रकट होतो. तसेच अहंकाराचे आहे. फक्त त्याला योग्य वातावरण मिळाले की तो जागृत होतो.

बीजसुद्धा योग्य वातावरणातच अंकुरतं. मग अहंकार कोणत्या वातावरणात बळावतो याचा विचार करायला हवा. मनुष्य गरीब असतो तेव्हा तो इतरांसमोर नम्रपणे व्यवहार करत असतो. पण त्याला प्रमाणापेक्षा जास्त पैसा मिळाला की मग मात्र त्याच्यात नम्रपणा राहत नाही. म्हणजे नेमके काय होते? त्या व्यक्तीतील हा गुप्त अहंकार जागा होतो. यासाठी यश, धन, कीर्ती मिळाल्यानंतरही माणसाने त्याचे मन स्थिर ठेवायला हवे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये.

या अहंकाराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तो विशेषकरून अज्ञानी पुरुषांच्या मागे लागत नाही. परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे तो धरतो. ज्ञान आले की माणसाच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात बदल होतो. त्याचे व्यक्तिमत्त्व सुधारते. पण या सुधारणेला अहंकारामुळे गालबोट लागू नये याची काळजी घ्यायला हवी. ज्ञानाचा गर्व अंगात चढता कामा नये. माझ्या सारखा ज्ञानी कोणी नाही. हा अहंकार चढण्याची शक्यता असते. यशाचे शिखर गाठल्यानंतर ते यश पचविण्याची ताकद त्याच्यात असायला हवी. त्याच्यात तो नम्रपणा कायम असायला हवा. जसे यश मिळत जाईल तसा तो अधिक नम्र व्हायला हवा. जितका तो नम्र राहील तितकी त्याच्या यशाची उंची वाढत राहते. तितका काळ तो त्या यशाच्या शिखरावर टिकून राहू शकतो.

अहंकारावर नम्रतेचा उतारा आहे. अहंकार बळावू नये यासाठी अंगात नम्रता वाढवायला हवी. जितकी नम्रता वाढेल तितकी अहंकाराची तीव्रता कमी होत जाते. नम्रता मनात वाढण्यासाठी मनाची मानसिक तयारी करायला हवी. कितीही यश मिळाले तरी त्या यशाने हुरळून जायचे नाही. यशाचा अभिमान जरूर असावा. पण ते यश जमिनीवर कायम स्थिर असायला हवे. यशाने अहंकार बळावणार नाही याची काळजी सातत्याने घ्यायला हवी. तरच हाती लागलेले यश कायम टिकून राहते.

Related posts

नैसर्गिक प्रेमातून अमरत्वाची प्राप्ती

वाटाड्या अन् रक्षक सदगुरु…

मार्कलिस्ट

Leave a Comment