March 30, 2023
The contribution of the Tatas to the self-reliance of the economy!
Home » अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान !
काय चाललयं अवतीभवती

अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान !

भारत आणि भारतीय कंपन्या जगातील कोणत्याही देशांमध्ये व्यापार किंवा व्यवहार करण्यासाठी खुल्या दिलाने तयार आहेत असाच संदेश टाटा समूहाने या ऐतिहासिक मागणी द्वारे दिला आहे. जागतिक व्यापार संबंधांच्या क्षेत्रात भारताने एक विश्वासार्ह व दमदार पाऊल निश्चित टाकलेले आहे.

प्रा. नंदकुमार काकिर्डे 
(लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)


टाटा उद्योग समूहाच्या एअर इंडिया या कंपनीने दोन आठवड्यापूर्वी जागतिक पातळीवर आर्थिक इतिहास नोंदवला. त्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर युरोपातही लाखो रोजगारांची निर्मिती होणार आहे. याबरोबरच भारताने तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याकडे एक मोठे पाउल टाकले आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक घडामोडीचा हा धांडोळा.

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये गेल्या सप्ताहात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दैदिप्यमान इतिहास नुकताच लिहिला गेला. टाटा उद्योग समूहाच्या एअर इंडिया या कंपनीने जागतिक पातळीवरील दोन मोठ्या बहुराष्ट्रीय विमान उत्पादक कंपन्यांकडे प्रवासी विमानांची विक्रमी मागणी नोंदवली. अमेरिकेतील बोईंग या कंपनीकडे त्यांनी 220 विमानांची तर युरोपातील एअरबस या अग्रगण्य विमान उत्पादक कंपनीकडे 250 विमानांची मागणी नोंदवली. आजवरच्या जागतिक पातळीवरील इतिहासात एकाच वेळी तब्बल 470 विमानांची मागणी नोंदवण्याची ही पहिली घटना आहे.

गेल्या अनेक वर्षात जगभरातील हवाई वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्यांनी मोठमोठ्या मागणीचा विक्रम केला होता. त्यात अमेरिकन एअरलाइन्सने 2011 मध्ये तब्बल 460 विमानांची मागणी नोंदवली होती. त्या खालोखाल भारतातील इंडिगो या विमान सेवा कंपनीने 430 विमानांची मागणी नोंदवली होती तर यापेक्षा कमी संख्येच्या अनेक मागण्या विविध देशांतर्फे नोंदवण्यात आल्या आहेत. ही मागणी साधारणपणे 70 किंवा 80 बिलियन डॉलरच्या घरात जाऊ शकते. मात्र जेव्हा एखाद्या उत्पादकाला अति भव्य मागणी नोंदवली जाते तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर आर्थिक सवलती म्हणजे ज्याला आपण डिस्काउंट म्हणतो तो दिला जातो. त्यामुळे टाटांनाही या ऑर्डर पोटी मोठा डिस्काउंट मिळाला असेल यात शंका नाही. यामध्ये लांब पल्ल्याच्या विमानसेवा देणाऱ्या व नेहमीच्या चार आसन क्षमते ऐवजी केवळ दोन आसन क्षमतेच्या ७० विमानांचा समावेश आहे. सध्या एअर इंडिया कडे विविध क्षमतेची 140 दणकट विमाने आहेत मात्र त्यातील बरीच विमाने लहान आकाराची आहेत त्यामुळे त्यांचा वापर देशांतर्गत प्रवासी हवाई वाहतुकी सेवेसाठी केला जातो. त्यासाठी प्रामुख्याने एअरबस विमाने वापरली जातात तर मोठ्या आकाराची बोईंग विमाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जातात.

खरंतर एवढी भव्य मागणी नोंदवण्यात आल्यामुळे त्याचे महत्त्व केवळ एअर इंडिया किंवा भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. या ऐतिहासिक मागणीच्या नोंदणीच्या प्रसंगी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायोडेन, फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रोन व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिघेही या घटनेचे साक्षीदार होते. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांचाही या व्यापारी घडामोडीत सक्रिय सहभाग होता. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तर यावेळी असे जाहीर केले की अमेरिकेच्या किमान 44 प्रांतांमध्ये दहा लाख पेक्षा जास्त रोजगारांची निमित निर्मिती या करारामुळे होणार आहे. त्याचप्रमाणे फ्रान्समधील एअरबस ला दिलेली मोठी मागणी ही इंग्लंडच्या हिताचीच ठरणार आहे. याचे कारण एअरबसला लागणारे इंजिन हे इंग्लंड मधील रोल्स राईस ही कंपनी तयार करते त्यामुळे इंग्लंडमध्ये ही लाखो रोजगार या पोटी निर्माण होणार आहेत.

खुद्द फ्रान्सला या ऑर्डरपोटी रोजगाराचे अक्षरशः घबाड सापडलेले आहे. रशिया युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेत तसेच युरोपामध्ये मंदी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे तिन्ही देश त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून खूप प्रयत्नशील होते आणि जी 20 चे अध्यक्ष पद लाभलेल्या भारताने या तिन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. खरं तर हे सर्व देश भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो म्हणून नाराज होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटांच्या या भव्य दिव्य ऑर्डर मुळे या तिन्ही देशांना मुत्सद्देगिरीने मोठा हात दिलेला आहे यात शंका नाही. भारत आणि भारतीय कंपन्या जगातील कोणत्याही देशांमध्ये व्यापार किंवा व्यवहार करण्यासाठी खुल्या दिलाने तयार आहेत असाच संदेश टाटा समूहाने या ऐतिहासिक मागणी द्वारे दिला आहे. जागतिक व्यापार संबंधांच्या क्षेत्रात भारताने एक विश्वासार्ह व दमदार पाऊल निश्चित टाकलेले आहे.

गेल्या वर्षीच केंद्र सरकारच्या मालकीच्या व तोट्यात असलेल्या एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्स या दोन्ही कंपन्या त्यांचे मूळ प्रवर्तक असलेल्या टाटा उद्योग समूह यांच्या ताब्यात परत गेल्या. त्यावेळी पासूनच या कंपन्यांचा भव्य विस्तार करण्याचे टाटांच्या मनात होते.या कंपन्यांचा शाश्वत विकास करण्याबरोबरच त्यांना नफा मिळवून देणे व हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून देणे हे टाटांचे भव्य स्वप्न होते. त्या दृष्टीनेच त्यांनी एक वर्षानंतर लगेचच नेत्र दीपक निर्णय घेतला. सध्या एअर इंडियाने त्यांच्याकडील विमानांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही विमाने भाडेपट्ट्यावरही देण्याची कंपनीची योजना आहे. पुढील सात-आठ महिन्यातच बोईंग कंपनीची 25 विमाने तर सहा भव्य एअरबस विमाने येण्याची शक्यता आहे. पुढील वर्षा दीड वर्षातच म्हणजे वीस ते पंचवीस मध्ये एअर इंडियाची क्षमता प्रचंड वाढलेली असेल व त्यांची विमानसेवा जागतिक पातळी वरील सेवेचे आव्हान स्वीकारण्यास तयार असेल.

गेल्या दशकामध्ये देशांतर्गत हवाई विमान सेवा क्षेत्रात एअर इंडिया चा वाटा दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्या तुलनेत इंडिगो सारख्या कंपनीचा वाटा तर 55 टक्केच्या घरात आहे. त्यामुळे देशांतर्गत सेवेमध्येही टाटा समूह मोठ्या प्रमाणावर क्षमता वाढवणार आहेत. एअर इंडिया बरोबरच टाटा समूहामध्ये सध्या विस्तारा नावाची एक संयुक्त कंपनी आहे. सिंगापूर एअरलाइन्स व टाटा उद्योग समूह यांची ही विस्तारा ही संयुक्त कंपनी आहे या कंपनीचे विलीनीकरण लवकरच एअर इंडिया मध्ये केले जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर इंडिया एक्सप्रेस व पूर्वीची एअर एशिया या दोन कंपन्यांचेही विलीन करण करण्याची टाटा समूहाची योजना आहे. यामुळे नजीकच्या काळातच इंडिगो ला देशांतर्गत स्पर्धेमध्ये टक्कर देणारी कंपनी एअर इंडिया बनणार आहे.

एअर इंडिया कंपनीने दिलेल्या या मोठ्या ऑर्डर्स लाभ आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रवासी देशात येण्यामध्ये व भारतीय प्रवासी जगभरात जाण्यासाठी होणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई विमान सेवेला मोठी बळकटी प्राप्त होणार आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र यामुळे जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचे केंद्र यानिमित्ताने निश्चित बनणार आहे. अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये तसेच युरोपातील अनेक देशांमध्ये थेट प्रवासी वाहतूक करण्याची योजना एअर इंडियाने या निमित्ताने तयार केली आहे. त्यामुळेही भारताच्या विमान सेवा कंपन्या आंतरराष्ट्रीय पटलावर आपली कार्यक्षमता निश्चित सिद्ध करणार आहेत. त्या दृष्टीने मोठ्या आकाराची विमाने आंतरराष्ट्रीय मार्गावर तर छोट्या व मध्यम आकाराची विमाने देशांतर्गत मार्गांवर वापरली जातील. त्याद्वारे एअर इंडिया ही कंपनी अत्यंत वाजवी दरामध्ये त्यांची सेवा स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये यशस्वी करून दाखवतील असा विश्वास वाटतो.

एअर बस व बोईंग या दोन्ही कंपन्यांचा उत्पादनाचा दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. त्यात सर्व प्रकारच्या सुरक्षितता किंवा तांत्रिक बाबींच्या बाबतीत कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. खरंतर टाटांचे कोणतेही उत्पादन किंवा कोणतीही सेवा ही आजवर उच्च दर्जाची आणि वाजवी दरामध्ये ग्राहकांना परवडणारी आहे असे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. एअर इंडियाच्या विस्ताराच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्राहक सेवा ग्राहक सेवेच्या क्षेत्रातील नवा मापदंड एअर इंडिया निर्माण करेल अशी खात्री आजच्या घडीला वाटते. एवढेच नाही तर य क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा देणारे हजारो वैमानिक, हवाई सुंदरी आणि प्रत्यक्ष विमानतळावरून सर्व प्रकारची प्रशासकीय व तांत्रिक सेवा देणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसाठी एअर इंडिया नजिकच्या काळात ही मोठी उपलब्ध करून देणार आहे. एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भरतेच्या मार्गाने मोठी चालना देण्यामध्ये टाटा समूहाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका बाजूला उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी विविध आकर्षक योजना राबवत आहेत त्याचप्रमाणे हवाई सेवा क्षेत्रात जागतिक पातळीवर भारतीय कंपनी सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहीणार आहे.

Related posts

खेड चिपळूणात नवरंगाचे दर्शन…

यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय चोरमारे

कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान

Leave a Comment