February 19, 2025
Sheetal Malusare who has the personality to find a guiding light even in a storm
Home » वादळातही दिशादर्शक दिवे शोधणारे व्यक्तिमत्व असणाऱ्या डॅा. शीतल
मुक्त संवाद

वादळातही दिशादर्शक दिवे शोधणारे व्यक्तिमत्व असणाऱ्या डॅा. शीतल

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – १०
३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज डॅा. शीतल मालुसरे यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

डॅा. शीतल मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराण्यातील १२ वे वंशज असलेल्या शिवराज मालुसरे यांच्या पत्नी. एम. ए. पीएच. डी. १० पुस्तकांच्या लेखिका. १०० हून अधिक पुरस्कार मिळवणाऱ्या. १० विविध संस्थावर सक्रिय असलेल्या. सुभेदार तानाजी मालुसरेंचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून इतिहासाची पाने चाळत, महाराष्ट्र, कर्नाटक पिंजून काढत गोवा, दिल्ली, पंजाबातही साहित्य आणि इतिहासाचा जागर करत पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे फिरणाऱ्या. आज हा आलेख चढता दिसत असला तरीही त्यांना खाजगी आयुष्यात मात्र धगधगत्या निखाऱ्यावरून चालत जावे लागले. पण अतिशय कष्टाने, जिद्दीने गाठलेल्या यशोशिखराची ही कहाणी..

वडील वनखात्यात नोकरीला असल्याने दर ३ वर्षांनी बदली ठरलेली. आईसह शिक्षणासाठी सारे कुटुंब खानापूर ( कर्नाटक ) येथे स्थायिक झाले होते. लहानपणीच आई बाबांनी बचतीचा संस्कार केला. अभ्यास हा त्यांचा एकच ध्यास. आई ब्लाऊज़ शिवत असे. ताई काजे बटन व इतर सर्व कामात त्या मदत करायच्या. सर्वांना कष्टाची जाणीव असल्याने, आवड निवड व कशासाठीच हट्ट नसायचा. दहावीला आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मान व पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाल्याने आईबाबांना प्रचंड आनंद होता.

भरपूर बक्षिसे म्हणजे यश असे ताईंना वाटायचे. एकदा १५ ऑगस्टला वसंत बापट यांच्या हस्ते २७ बक्षिसे एकत्रित मिळाली. त्यांना डॉक्टर व्हायचे होते पण तेथे सायन्स कॅालेज नसल्याने त्यांचे बाबा त्यांना बेळगावला पाठवायला तयार नव्हते. १२ वी झाली आणि त्यांचे बाबा गेले. कर्नाटक सरकारने देऊ केलेली नोकरी नाकारुन भावाला द्यावी असे लिहून दिले.

ताईंनी कॅालेज करुन शिकवणी सुरु केली. ताईंना बेस्ट स्टुडंट ॲवॅार्ड एकूण ५ वेळा मिळाले. परीक्षा होताच लग्न ठरले. निकाल येण्याआधी ताई विवाहबध्द झाल्या. ताई कु. सुलोचना भवानजी भालेकरची, सौ. शीतल शिवराज मालुसरे झाल्या. या घरात आल्याने इतिहासाची पाने चाळण्याची त्यांना संधी मिळाली. १९८९ ला लग्न, १९९० ला अंकिताचा जन्म, १९९१ साली ताई अंकिताला घेऊन पारगडहून महाड येथे आल्या. दादली नावाच्या गावात खोली भाड्याने घेऊन त्यांनी संसाराचा सारीपाट मांडला. शिवराज कमी शिकलेले होते. त्यामुळे त्यांनी मेण आणून मेणबत्तीचा व्यवसाय सुरु केला. ताईंना शिकवण्याचा चांगला अनुभव असल्याने त्या शिक्षिका म्हणून K.E.S. शाळेत नोकरीला लागल्या. दिवसभर शाळा, सकाळी क्लासेस आणि संध्याकाळी मेणबत्ती पॅकिंग करून शिवराज कँडल्स लेबल लावायचे. रात्री दीडपर्यंत काम नंतर जेवण. पतीची आवड म्हणून रविवारी एखादा सिनेमा कधीतरी पहायचा. घर सारवायचं होत त्यामुळे रविवारी सारवायची सवय ताईंनी लावून घेतली होती.

संसार फुलत होता दिव्यांनीचा जन्म झाला. शून्यातून विश्व निर्माण करायचा प्रयत्न सुरु असतानाच अचानक त्यांच्या पतीच्या डोक्यात बेळगावला जायचे खूळ शिरले. मेणबत्तीचे डाय विकून T .V.,फ्रीज़, फर्निचर मित्रांना देऊन टाकले. शाळेत सांगितले आणि १९९७ ला बेळगावला रवानगी झाली. याच वेळी रायबाचा जन्म झाला. १० दिवसाच्या रायबाचे किडनीचे ॲापरेशन करावे लागले. २३ दिवस ICU मध्ये. घरात खर्चायला पैसे नव्हते. सात वर्ष जमवलेले पैसे, दागिने सगळे संपले. सासरेही वैतागले आणि म्हणाले तुम्ही महाडला जा. कुटुंब पुन्हा १९९८ साली महाडला आले.

रायबा अडीच वर्षाचा होताच ताईंनी पुन्हा शाळेत अर्ज करून काम सुरू केले. पती मुलांना सांभाळायचे पण कधी पाच मिनीट उशीर झाला तरी त्यांचा राग अनावर होत असे. एका बाईने किती वार झेललेत हे सांगता येणार नाही. त्या म्हणतात, ‘एकदा तर उजव्या हाताचं बोट मोडलं होतं. सहनशक्तीची परिसीमा काय असते ते मला विचारा..!’ तिन्ही मुलं हुशार पण पतीची दहशत होती. अंकिताने १० वीची परीक्षा व ताईंनी M.A.ची परिक्षा बरोबर दिली. पती शिकले नव्हते, पण ताईंनी शिकावं ही त्यांची इच्छा ही सकारात्मक बाजू होती.

ताई सांगू लागल्या, ‘लहानपणी मी कधीच हट्ट केला नाही, पण लग्नानंतर चॅाईस नव्हताच. अगदी भाजी कोणती करायची ? तेही साहेबच सांगत. साडी, ड्रेस, खाणे पिणे सारं त्यांच्या आवडीप्रमाणे. कोणतेही सण असो, वटसावित्री, हळदी कुंकू करायची मला हौस. पण परवानगी नव्हतीच. दागिने नेहमी गहाण ठेवायचे. सासरे वारले, त्यापूर्वी त्यांनी गावाकडील दुकान जावयाला दिले होते अन् फटाक्यांचा परवाना मुलीच्या मुलाला दिला. ही गोष्ट यांच्या मनाला खूप लागली. घरोघरी इन्व्हर्टर आल्याने मेणबत्तीचा व्यवसाय चालत नव्हता. निराश होऊन शिवराज डिप्रेशनमधे गेले ते त्यातून बाहेर पडलेच नाहीत. मी B.Ed. च्या परीक्षेला जात असताना ते दुपारी मला पोचवायला आले होते. पेपर छान लिही म्हणाले. आणि रात्री ९ ला रायबाचा फोन आला. रायबा रडतच बोलला पप्पा गेले. पायाखालची जमीनच सरकली. पुन्हा रात्री देवरुखवरून महाडला आले. हे अपघातात गेले होते. त्यांच्या देहाची राख होतांना पाहिली.

भारदस्त व्यक्तिमत्व अनंतात विलीन. आता सगळंच निरस वाटू लागलं. १५ दिवसांनी भाऊ घेऊन गेला. पुन्हा सासरी आले तर आई सारखं विचारु लागल्या कधी जातायं महाडला. त्याचक्षणी आपण निराधार आहोत याची जाणीव झाली आणि मन घट्ट करुन महाडला आलो. सासरच्या माणसांनी सूचना केल्या. साडी नेसून जात जा शाळेत, पदर घट्ट लपेटून घे. हे ऐकून डोकं फुटायची वेळ आली. रात्रीच्या वेळी आम्ही चौघेही डोक्यावर पांघरुण घेऊन रडत रहायचो. १ जूनला शाळेत गेले.

गळ्यात काही नाही, कपाळावर काही नाही. आमच्या मॅडम सांत्वन करत म्हणाल्या, मालुसरे असे रुप? अशा नका राहू. मुलांसाठी जगा. घरी आले तर अंकिता, दिव्यांनी, रायबा तिघेही म्हणाले मम्मी अशी नको ना राहू गं..! जग काय म्हणेल याचा विचार न करता परखडपणे जगायचे ठरवले, मुलांना आवडेल तसे. अनेक माणसं भेटायला आली. ताई एक पाऊल पुढे टाका, आम्ही नेहमीच सोबत आहोत म्हणाली. गेली १० वर्षे निखाऱ्यावरून चालतेय. खाजगी शाळा, पगार कमी. घरभाडं, तिघांच शिक्षण आणि खर्च ताळमेळ जमेना. शनिवारी रविवारी कार्यक्रम घेणे सुरु केले. सोमवारी पहाटे यायचं. पुन्हा शाळा, क्लास, चॅाकलेट बनवून विकायची. मुलांच्या सोबतीने तारेवरची कसरत सुरु होती. बरेच किल्ले पाहिले. Ph.D केली. आता विविध विषयावर बोलणे छान जमते.’

संपूर्ण महाराष्ट्रात आज शीतलताईंना बरेच राजकीय नेते, साहित्यिक, सिनेक्षेत्रातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक भेटले. गेली तीन वर्ष ऐतिहासिक चित्रपटासाठी योगदान देताना प्रत्येक संधीचं सोनं केलं. अंकिता MBA, दिव्यांनी B.Ed आणि रायबा MBA झाला. ताईंच्या कष्टाचे चीज झाले. तानाजी मालुसरे हा चित्रपट आला तसे अनेक लोक वंशज म्हणून उभे राहिले. खूप त्रास झाला तरीही त्या सर्वांना उत्तर देण्यास आज ताई पुरावे, अभ्यासासह मानसिकदृष्ट्या समर्थ आहेत. त्यांचा एकूण प्रवास पाहून मते मामांनी गाडी दिली.

५३ वर्ष झाली तरी क्लासेस आजही सुरू आहेत. आता त्या रायगडच्या सावलीत विसावल्या आहेत पण या २९ वर्षात १३ वेळा घर बदलले. ‘आजही पुस्तकं आणि सन्मानचिन्ह ठेवायला जागा नाही. तरीही लढते आहे, कारण आज यश दिसतं, सत्काराचा डोलारा दिसतो पण त्यामागचे कष्ट नाही दिसत. कधीच वाटलं नसेल का मला स्वतःसाठी जगावं? यशाची ही पहिली पायरी आहे, अजून यशोशिखर गाठायचे आहे. जमिनीवर पाय ठेऊन अंबर कवेत घ्यायचे आहे..!’ असे त्या कहाणी सांगताना म्हणतात.

अशा या कष्टाळू, हुशार, जिद्दी, वादळातही दिशादर्शक दिवे शोधणारे व्यक्तिमत्व असलेल्या या जिजाऊ – सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading