अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले असे फडणवीस यांनी सांगून थेट अजितदादांवर शरसंधान केले. पण त्याला अजितदादांनी उत्तर दिलेले नाही आणि दिले तर निवडणुकीच्या तोंडावर ठिणग्या उडतील याची त्यांनाही जाणीव आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर होणार याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या मुंबई भेटीत दिले. कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस व अजित पवार यांना आपले सरकार निवडणुकीनंतर आणायचे आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो जबर फटका बसला त्यातून शिंदे, फडणवीस व अजित पवारांना बरेच शिकायला मिळाले. राज्यात सर्वाधिक आमदारांचा पक्ष म्हणून भाजपला आपला नंबर १ टिकवायचा आहे.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपचे १०६ आमदार विजयी झाले होते, आता भाजपने आपले टार्गेट १२५ ठेवले आहे. भाजपला १६० जागा लढवायच्या आहेत, पण एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच मित्रपक्षांना जागा देऊन ते शक्य होईल का ? विधानसभेत २८८ जागा आहेत. जागांचे वाटप करताना महायुतीला मोठी कसरत करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी अजित पवार यांना कमी महत्त्व द्यायला सुरुवात केली.
अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले असे फडणवीस यांनी सांगून थेट अजितदादांवर शरसंधान केले. पण त्याला अजितदादांनी उत्तर दिलेले नाही आणि दिले तर निवडणुकीच्या तोंडावर ठिणग्या उडतील याची त्यांनाही जाणीव आहे. अजितदादांचा पक्ष ऐंशी जागा लढविण्याची भाषा करीत असला तरी प्रत्यक्षात किती जागा मिळणार व किती निवडून येणार, त्यावर त्यांचे व त्यांच्या पक्षाचे भविष्य अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेची मते भाजपाकडे वळली पण अजितदादांच्या पक्षाची मते भाजपाला मिळाली नाहीत, असे सरकारमधील उच्चपदस्थच उघडपणे सांगत असतील, तर महायुतीत सर्वकाही अलबेल नाही, हाच संदेश त्यातून जातो.
अजित पवारांना महायुतीत घेणे सहज झालेले नाही, अशी कबुली भाजप नेते देत आहेत. अगोदर संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर व विवेक या नियतकालिकांनी अजित पवारांना बरोबर घेतले नसते. तर भाजपचे लोकसभेत नुकसान झाले नसते अशी टीका केली होती, आता सरकारमधील मंत्रीच तसे उघड बोलू लागले आहेत.
पंतप्रधानांच्या राज्यात दीड डझन सभा होऊनही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ पैकी केवळ १७ जागांवर महायुतीला विजय मिळाला. त्यात भाजपचे नऊ, शिवसेना शिंदे गटाचे सात व अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार म्हणून निवडून आले. अजितदादांच्या पक्षात संभ्रम असून विधानसभा निवडणुकीनंतर आपले काय होणार याची अनेकांना धास्ती वाटू लागली आहे, त्यामुळेच शरद पवारांकडे दादांचे बरेच सहकारी हात जोडून जाताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार हे भाजपला नकोसे झालेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
अजितदादांना महायुतीत घेताना आपल्याला राजकीय लाभ मिळेल, अशी भाजपची अपेक्षा होती. खरे तर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिवसेनेचे ४० आमदार व दहा अपक्ष समर्थक आमदार घेऊन भाजपसोबत आले. भाजप-शिवसेना शिंदे गटाचे विधानसभेत चांगले बहुमत झाले. मग अजितदादांची भाजपला गरज का भासावी, या प्रश्नाचा भुंगा भाजपामधील अनेकांना विशेषत: संघ परिवाराला गेले वर्षभर सतावत आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावून भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, अजित पवार हे योग्य ठिकाणी आले आहेत, पण इथे येण्यास त्यांनी बराच वेळ घेतला. पंतप्रधानांनी तर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उघडपणे आरोप केला आणि आठवडाभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकला अजित पवारांमुळे भाजपचे लोकसभेच्या निवडणुकीत नुकसान झाले, असा साक्षात्कार पक्षातील अनेकांना होऊ लागला आहे. मग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना महायुतीतून बाहेर काढणार का? तसे झाले तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी भाजपाने अजितदादांचा उपयोग करून घेतला असा सर्वत्र संदेश जाईल.
दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रवक्ते सांगत आहेत की, लोकसभा निवडणुकीत भाजपने आमचा प्रचार केला नाही…. दादांच्या पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे की, आमची पुरोगामी भूमिका कायम आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांना मानणारे आम्ही आहोत. धर्मनिरपेक्ष विचाराशी आम्ही तडजोड करणार नाही. भाजपाशी आम्ही केलेली युती ही विकासासाठी आहे…. नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात शिंदे व फडणीस हे दोघे गेले होते, तेव्हाही अजित पवार कुठे आहेत, अशी चर्चा झाली होती.
आमच्या फायली अर्थखाते परत पाठवते, अशा तक्रारी शिंदे गटाचे आमदार करीत आहेतच. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विदर्भातील संस्थेला ५ हेक्टर जमीन देण्यास अजितदादांच्या अर्थ खात्याने विरोध केला होता. अशी जमीन देताना जे निकष असतात, ते ती संस्था पुरे करीत नाही असा अभिप्राय त्या फाईलवर नोंदवला होता. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत बावनकुळे यांच्या संस्थेला सवलतीच्या दराने जमीन देण्याचा निर्णय झाला.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना उभे केले होते. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, पवार विरुद्ध पवार, बहीण विरुद्ध पत्नी, काका विरुद्ध पुतण्या, असा तो संघर्ष होता. तसे करण्यामागे अजितदादांचा काय हेतू होता ? कोणाच्या सल्ल्यावरून त्यांनी पत्नीला बारामतीत उभे केले? त्यातून त्यांना काय साध्य झाले ? सुप्रिया सुळे या लोकप्रिय असून बारामतीमधील जनता शरद पवारांच्या पाठीशी उभी आहे, हाच निकालाचा अर्थ होता. पवार घराण्यात कटुता मात्र वाढली. नंतर आपली चूक झाली असे अजितदादांना वाटले व त्यांनी तसे बोलून दाखवले…. अजित पवारांना परत घेणार का, असे जेव्हा पत्रकार शरद पवारांना विचारतात तेव्हा, आम्ही घरात सर्व एकत्र आहोत, असे मोजक्या शब्दात ते उत्तर देतात.
अजित पवारही म्हणतात, ते आमचे मोठे काका आहेत, त्यांच्या डोळ्यांत डोळा घालून आपण बोलू शकत नाही. भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवारांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार असा केला तेव्हा अजितदादांनी त्यासंबंधी नाराजी व्यक्त केली. अजितदादा महायुतीत रमले नाहीत का ? त्यांच्या मनाची अजून घालमेल होत आहे का? ते बळेबळेच आपल्या काकांना निवडणुकीच्या राजकारणात विरोध करीत आहे का ? एकनाथ शिंदे यांचे सहकारी व आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, मी कट्टर शिवसैनिक आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी कधी जमले नाही. आज मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात. हे सहन होत नाही… असे भाजपचे प्रवक्ते म्हणतात, अजित पवारांबरोबर झालेली युती दुर्दैवी आहे. आम्हाला पटली नाही. असंगाशी संग… महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना व पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत केल्याशिवाय आपला पक्ष वाढणार नाही, असे भाजपचे गणित होते. विरोधकांना दुर्बल केल्याशिवाय आपण सबल होणार नाही, हे दोन्ही पक्ष फोडण्यामागचे सूत्र होते. एकनाथ शिंदे हा मराठा नेता असतानाही अजित पवारांसारखा दुसरा मराठा नेता भाजपाने मिळवला. पण त्याचा लोकसभेत लाभ झाला नाही.
शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपाने रिमोट आपल्या हातात ठेवलाय. जे मोदी-शहांना पाहिजे ते महाराष्ट्रात घडते. अडीच वर्षांत शिंदेंनी मोदी-शहांचा मोठा विश्वास प्राप्त केला. तुलनेने अजितदादा मागे पडले. त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा तेच आहेत. आजवर ते कधी काकांशिवाय कोणापुढे झुकलेले नाहीत. दिल्लीपुढे झुकण्याची त्यांना सवय नाही आणि त्यांचा स्वभावही नाही. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचे कारण सांगत भाजपसोबत आले पण अजित पवार हे विकासाचा मुद्दा पुढे करून महायुतीत आले. ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धवनंतर आदित्य नंबर २ आहे व पवारांच्या राष्ट्रवादीत साहेबांनंतर सुप्रिया नंबर २ आहे, हे एकनाथ व अजितदादांना कळून चुकले. शिंदे मुख्यमंत्री झाले पण पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजितदादांची गाडी पुढे सरकत नाही.
अजितदादांच्या सभांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या फलकावरून मुख्यमंत्री हा शब्द गायब असतो. गुलाबी जाकीट व डोक्यावर टोपी घालून लोकांच्या गर्दीत मिसळणारा बिनधास्त नेता अशी दादांची प्रतिमा आहे. मालवणला राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागणारा हा पहिला नेता आहे. आपला पक्ष टिकवायचाय, वाढवायचाय हे मोठे आव्हान आहे. शिंदे व फडणवीसांची साथ मिळण्याची शक्यता कमी आहे. एका टर्ममध्ये फडणवीस, ठाकरे व शिंदे अशा तीन मुख्यमंत्र्यांसोबत तीन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, हा विक्रम आहे. पहाटेचा शपथविधी महाराष्ट्र विसरलेला नाही. काकांविरोधात बंडाचा बिगूल वाजविल्यावर अजितदादांनी स्वत:चा पक्ष वेगळा काढला नाही, त्यांचा पक्ष, त्यांचे निवडणूक चिन्ह काबीज केले. भाजपचे राजकीय संरक्षण असल्याने ते सर्व साध्य झाले, आता मात्र येणारी विधानसभा निवडणूक ही अजितदादांची मोठी परीक्षा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.