जयसिंगपूर येथे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
जयसिंगपूर : शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम शेतकरी साहित्य संमेलनातून होत आहे. शेतकरी साहित्यांच्या लेखणीतून सर्वांना शेतीचा अभ्यास समजत आहे. शेतकऱ्यांच्या न्याय – हक्कासाठी रस्त्यावरच्या लढाई पेक्षा लेखणीची चळवळ रुजली पाहिजे. शेतकऱ्यांना दिशा दाखवणारी लेखणी आज गरजेची आहे. त्यामुळे शेती, शेतकरी यांचं भविष्य उज्वल करण्यासाठी शेतकरी साहित्य संमेलन होणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा, माजी आमदार, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर यांनी केले.
जयसिंगपूर येथे शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय, यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर यांच्यावतीने १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार, जेष्ठ शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर बोलत होत्या.
प्रारंभी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. यानंतर येथील स्व.शामरावअण्णा पाटील यड्रावकर नाट्यगृहात मराठी गौरव गीत शेतकरी नमनगीत संपन्न झाले. यानंतर संमेलनाचा उद्घाटन सोहळा झाला.
यावेळी बोलताना सरोजताई काशिकर पुढे म्हणाल्या, पूर्वी शेती हे कुटुंबाच्या जगण्याचे मुख्य साधन होते, पण शेतकऱ्यांच्या व्यथा आणि संकटांची जाणीव खूप उशिरा झाली. कृषी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतरही शरद जोशींच्या विचारांमुळेच शेतकऱ्यांच्या संघर्षाचे खरे स्वरूप मला समजले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी आंदोलनं झाली, जी फक्त रस्त्यावर नव्हे तर विचारधारेच्या माध्यमातून लढवली गेली.
1986 च्या आंदोलनात हजारो शेतकरी तुरुंगात गेले, महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सरकारच्या नियंत्रणामुळे शेतकऱ्यांच्या मालावर स्वातंत्र्य नव्हते, आणि पिक आले नाही तरी कर भरावा लागतो, ही व्यवस्था अन्यायकारक होती. शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी शरद जोशींची चळवळ महत्त्वाची ठरली.
आज समाजात मोठे बदल झाले आहेत. मुलं शहरांकडे नोकरीसाठी धाव घेत आहेत, कुटुंबव्यवस्था कमकुवत होत आहे, आणि स्त्रियांनीही जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. गावागावात शिक्षण, अर्थव्यवस्था, आणि कुटुंबसंस्था यावर नवे आव्हान उभी ठाकली आहेत.
साहित्यिकांनी या प्रश्नांवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. पूर्वीच्या साहित्यिकांनी सामाजिक वास्तव मांडले तसेच आजच्या लेखकांनीही शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांच्या हक्कांसाठी लढा, आणि सरकारच्या धोरणांवर परखड भाष्य करणे गरजेचे आहे. समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी लेखणीचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. शेतकरी चळवळ, तंत्रज्ञान, आणि नव्या पिढीला दिशा देण्यासाठी साहित्य हेच प्रभावी माध्यम ठरू शकते.
यावेळी बोलताना संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भाषणात शेतकरी साहित्य संमेलनाच्या महत्त्वावर भर दिला, त्यांनी सांगितले की, हे संमेलन शेतकऱ्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि त्यांच्या साहित्याला मंच प्रदान करते. विदर्भ व मराठवाड्यात सातत्याने होत असलेले संमेलन पश्चिम महाराष्ट्रातहोवून येथील शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
शेतीच्या समस्यांवर बोलताना त्यांनी एफआरपी, कर्जमाफी आणि शेतीच्या बाजारीकरणावर चर्चा केली. कृषी खात्याच्या कार्यक्षमतेवर भर देत त्यांनी कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज अधोरेखित केली.
शेतीतील आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर त्यांनी भर दिला. ठिबक सिंचन, माती परीक्षण, आणि पीक नियोजन या गोष्टींचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, शेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांची पुढची पिढी शेतीकडे वळत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी, शेतकरी चळवळींमध्ये राजकारण नसावे आणि शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च राहावे, असे त्यांनी आवाहन केले. शेतकरी साहित्य संमेलन हा शेतीच्या समस्या व त्यावरील उपायांसाठी चर्चा करण्याचा एक महत्त्वाचा मंच आहे, असे सांगून त्यांनी या शेतकरी साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी ॲड. सतीश बोरुळकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती विशद केली.
आपल्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ११ वर्षाची वाटचाल नमुद करून साहित्य संमेलनातून माहिती विषद केली. आपल्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी अखिल भारतीय साहिय संमेलनाची ११ वर्षाची वाटचाल नमुद करून साहित्य संमेलनातून माहिती विषद केली. आपल्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी अखिल भारतीय साहिय संमेलनाची ११ वर्षाची वाटचाल नमुद करून साहित्य संमेलनातून माहिती विषद केली.
यावेळी बोलताना उद्घाटक ॲड. वामनराव चटप म्हणाले, 1951 मध्ये भारतीय संविधानात पहिल्या घटनादुरुस्तीने शेतकऱ्यांचा मालमत्तेचा मूलभूत अधिकार कमी केला. त्यामुळे शेतकरी विरोधी कायद्यांविरुद्ध लढण्याचीही त्यांना संधी नाही.
कोरोना काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था वाचवली, जेव्हा उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. शेती टिकली, म्हणून देशाचा GDP टिकून राहिला. त्यामुळे समाजात शेतीचे स्थान कनिष्ठ न राहता, तिला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. लेखकांनी आणि साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही.एम. शिंदे, रावसाहेब पुजारी, अविनाश पाटील, वसंतराव जुगळे, प्रा. जालंदर पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातून आलेले साहित्यिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मनिषा रिठे यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.