November 21, 2024
dr-v-n-shinde-article-on-floods-and-landslides
Home » पूर, महापूर आणि दरडी !
विशेष संपादकीय

पूर, महापूर आणि दरडी !

झाडे तोडल्यामुळे आणि गवत काढून टाकल्यामुळे मातीला पकडून ठेवणाऱ्या मुळ्या मृत पावतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहू लागते. डोंगराचा पृष्ठभाग हळूहळू पाण्यामध्ये विरघळत जातो. ती माती खाली वाहून जाते. नदीपात्रात जमा होते आणि नदीचे पात्र उथळ बनत जाते. त्यामुळे पूर येताच पाणी पात्राबाहेर पडून पसरू लागते.

डॉ. व्ही.एन. शिंदे

यावर्षी पावसाने सुरुवातीला महाराष्ट्रापुरते ताणून धरले. पण उशिराने महाराष्ट्रात पडू लागला. नंतर त्याने आपला हात सैल सोडला आणि महाराष्ट्रातही पूर आणि महापूराची स्पर्धा सुरू झाली. २०१९ आणि २०२१ साली महापूराने कोल्हापूर भागात थैमान घातले होते. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने यावेळी अतिरिक्त दक्षता घेतली. वेळीच लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि प्रत्यक्षात मात्र पूर आला नाही. जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता, त्याच दिवशी पावसाने आपला हात आखडता घेतला. विदर्भात मात्र महापूराने थैमान घातले. अनेक गावांना कवेत घेत पाणी समुद्राकडे जात राहिले.

यावेळच्या पावसामध्ये सर्वात मोठी बातमीची घटना घडली, ती इरशाळवाडीची. इरशाळवाडी हे कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये डोंगररांगेवर वसलेले छोटेखानी गाव. अनेक वर्षांपासून सुखाने नांदत असलेले. या ठिकाणी येणाऱ्या गिर्यारोहकांना चहा, जेवण बनवून देणारे. त्यातून चार पैसे कमावणारे. सुखाचे जीवन जगत होते. १९ जुलैच्या मध्यरात्री या गावावर डोंगराचा कडा कोसळला. हे गाव अशा दुर्गम ठिकाणी वसलेले की तेथे पोहोचण्यासाठी, पाच किलोमीटरपर्यंत चालत प्रवास करावा लागतो. त्यामुळे बचाव कार्यासाठी एनडीआरएफचे जवानांना पोहोचताना अडचणी आल्या. जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी पायपीट करावी लागत होती. गावात १००च्या आसपास घरे असणारे गाव. लोकसंख्या अवघी २२९. सर्वच घरे या दुर्घटनेत गाडली गेली. दुसऱ्या दिवसापासून बचाव कार्य सुरू झाले. तीन दिवस शोधमोहीम झाल्यानंतर दुर्गंधी आणि पावसाच्या माऱ्यामुळे बचाव कार्य थांबवावे लागले. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला, तर बचाव कार्य थांबवले तेव्हा, एकूण ७८ लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. गावातील १२४ जण वाचले.

यापूर्वी अनेक ठिकाणी अशा दुर्घटना घडल्या. चेंबूरमध्ये दरड कोसळून २२ लोक मरण पावले होते. माळीण येथे कोसळलेल्या दरडीखाली अख्खे गाव गाडले गेले होते. तेथे गाव असल्याच्या खूणाही राहिल्या नव्हती. वेताळवाडीलाही असेच दरडीने झाकून टाकले. पन्हाळ्याची तटबंदी गतवर्षी ढासळली. विशाळगडावरही पडझड झाली. यावर्षीच्या पावसात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेही मागील दहा वर्षात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये १०० पट वाढ झाली आहे. रस्त्याच्या कडेला दरडी कोसळून होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू या बातम्या नित्याच्या झाल्या आहेत. २०११ मध्ये माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल दिलेला आहे. त्यातील तरतूदींची अंमलबजावणी झालीच नाही. मात्र डोंगररांगामध्ये मानवी हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत गेला आहे आणि निसर्ग त्यावर आपली प्रतिक्रिया देत राहिला आहे. वारंवार अशा घटना घडत असूनही मानवाने निसर्गातील हस्तक्षेप कमी केलेला नाही; तर, तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळेच दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. हे फक्त महाराष्ट्रात नाही तर केरळपासून ते हिमालयापर्यंत सर्वदूर, संपूर्ण भारतात हीच परिस्थिती आहे.

डोंगररांगातील महत्त्वाचा हस्तक्षेप आहे तो म्हणजे वृक्षतोड. भारतातील सर्वच राज्यात जंगलांचे प्रमाण कमी होत आहे. शेतीसाठी झाडे तोडून काही ठिकाणी डोंगरमाथ्यावर शेती करण्याचे प्रयत्न करण्यात आले. माळीणची दुर्घटना डोंगरमाथ्यावर शेती करण्यामुळे घडली असल्याचा निष्कर्ष निघाला. माळीणच्या शेजारी असणाऱ्या डोंगरावरील जमीन वाहिताखाली आणली होती. शेतीसाठी घालण्यात आलेल्या बांधामुळे पाणी साठले. त्यामुळे डोगंरावरील मातीमध्ये पाणी मुरले. माती सैल झाली आणि डोंगर कोसळला. ज्या कृषी आधिकाऱ्याचे डोंगरमाथ्यावर यशस्वी शेतीचा प्रयोग केल्याबद्दल सन्मान करण्यात आला होता, त्यालाच माळीण घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले. निसर्गातील हस्तक्षेपाचा भविष्यात काय परिणाम होणार आहे, याचा विचार वेळीच केला नाही केला तर काय होते याचे हे उत्तम उदाहरण!

सह्याद्रीच्या डोंगररांगात तर आणखी एक वेगळ्या प्रकारचा हस्तक्षेप वाढला आहे. कोकाणातील खाजगी मालकीचे अनेक डोंगर आहेत. त्यावर खाजगी मालकीची जंगले होती. हे डोंगर धनिकांनी विकत घेतले. त्यावरील खाजगी जंगले नष्ट केली गेली. डोंगररांगावरील विविध प्रकारची नैसर्गिक वाढलेली वनसंपदा नष्ट करून ते सपाट करण्यात आले. त्याठिकाणी हापसूची कलमे लावण्यात आली. हापूसची वाढ चांगली व्हावी म्हणून जमिनीवरील गवतही काढून टाकण्यात आले. त्यामुळे पूर्ण जमीन मोकळी झाली. मोठी घरे बांधण्यासाठीही झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. डोगररांगामध्ये फार्म हाउस बांधण्याचे वेड अलिकडे वाढले आहे. अशा घरांच्या बांधकामामुळे झाडांची होणारी कत्तल हा चिंतेचा विषय आहे. अशा डोंगररांगातील घराकडे जाण्यासाठी रस्ता करताना पुन्हा तेथील मूळ रचनेला बांधा पोहोचवली जाते.

झाडे तोडल्यामुळे आणि गवत काढून टाकल्यामुळे मातीला पकडून ठेवणाऱ्या मुळ्या मृत पावतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहू लागते. डोंगराचा पृष्ठभाग हळूहळू पाण्यामध्ये विरघळत जातो. ती माती खाली वाहून जाते. नदीपात्रात जमा होते आणि नदीचे पात्र उथळ बनत जाते. त्यामुळे पूर येताच पाणी पात्राबाहेर पडून पसरू लागते. एकीकडे डोंगरमाथे उघडे झाल्याने त्यावर असणारी मृदा वाहून जाते. तर दुसरीकडे नद्यांना थोड्या पावसातही पूर यायला सुरुवात होते. पावसाचे पाणी थोडेफार जमिनीत मुरत असे तेही यामुळे पूर्णत: थांबते आणि उन्हाळ्यात वाहते असणारे झरे आटून जातात. पावसाळ्यात पूराची परिस्थिती; तर, उन्हाळ्यात पाणीटंचाई असे विरोधाभासी चित्र दिसते.

रस्त्याच्या बांधकामाचा निसर्गाला मोठा फटका बसत आहे. आज जलद प्रवास प्रत्येकाला हवा असतो. रस्त्यावर वेळ घालवणे नको असते. त्यासाठी डोंगर फोडून किंवा डोंगरामध्ये भुयार काढून कमी अंतराचे, मोठे रस्ते बांधण्याचे आणि त्याचे जाळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सह्याद्रीपासून हिमालयापर्यंत सर्वच डोंगराना असे पोखरण्याचे कार्य सुरू आहे. संरक्षणापासून जनतेच्या सोईसाठी हे आवश्यकही आहे. ही रस्त्याची कामे करत असताना अवजड यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जूना पुणे-मुंबई रस्ताही सह्याद्रीच्या पर्वतरांगाना ओलांडून जाणारा. या रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. याचे कारण हा रस्ता बांधताना किमान यंत्रांचा वापर झाला होता. त्या काळाच्या तुलनेत आज पोखलँड, जेसीबीसारखी मोठीमोठी यंत्रे आली आहेत. ही यंत्रे वापरून काम गतीने पूर्ण होते. मात्र त्यांच्या हादऱ्याने संपूर्ण परिसर खिळखिळा करते. पाऊस पडू लागला की पाणी भेगामध्ये जाते आणि दरडी रस्त्यावर कोसळतात. म्हणून निसर्गात किमान हस्तक्षेप न करता, जल-जंगल-जमीनीचा समतोल राखणारा विकास आवश्यक ठरतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading