जीवन आनंदी, प्रकाशमान व्हावे असे वाटत असेल तर प्रथम मन आणि प्राण यांच्यात बदल घडायला हवा. तरच आपले जीवन हे प्रकाशमान होईल. सद्गुरुंचा नित्य तसा प्रयत्न सुरु असतो. शिष्याला याचा बोध देऊन ते नित्य त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी इच्छुक असतात. शिष्याला आत्मज्ञानाच्या ज्योतीने ओवाळण्याची त्यांची इच्छा असते. शिष्याच्या आयुष्यात आत्मज्ञानाची दिवाळी ते आणू पाहातात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
प्रत्यगज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनांची खेळणी ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ।। ६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – आत्मप्रकाशरुप ज्योतीने साधकरुपी बाळकांस ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध करणे ही खेळणी त्यांच्या हातात देतेस व स्वरुपानंदाचे ( लहान मुलांना घालावयाचे ) दागिणे साधकरुपी बालकांच्या अंगावर घालतेस.
गुरु आणि शिष्य हे नाते आई आणि मुलासारखे आहे. आई जसे आपल्यामुलाचे सर्व लाड पुरवित असते तसे शिष्याचे सर्व लाड सद्गुरु पुरवित असतात. शिष्याचे लालनपालन सर्वतः श्रीगुरुंकडूनच होत असते. शिष्य आत्मज्ञानी व्हावा हा सद्गुरुंचा नित्य प्रयत्न सुरु असतो. यासाठी शिष्याला ते नित्य आत्मप्रकाशाचा बोध करून देत असतात. लहान मुलांना एकटे सोडले किंवा त्याच्या तसे लक्षात आले की ते रडायला लागते. ते घाबरते. ही त्याची अवस्था होऊ नये यासाठी त्याला कोणत्यातरी खेळात गुंतवणे गरजेचे असते. त्याचे मन एकटे पडणार नाही इतरत्र विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यासाठी त्याला विविध खेळणी देऊन त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न आईकडून केला जात असतो. सद्गुरुही नित्य याच प्रयत्नात असतात. साधनेच्या वाटेवर शिष्य एकटा पडणार नाही. त्याचे मन विचलित होणार नाही. साधनेत त्याचे मन रमावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असतात. साधनेच्या वाटेवर शिष्य घाबरून जाऊ नये, त्याला एकटे वाटू नये याची काळजी ते नित्य घेत असतात. आईप्रमाणेच सद्गुरुचे मन ही शिष्यामध्ये गुंतलेले असते. या संगोपनातूनच शिष्याची वाढ ही होत असते.
मुलाकडे आईचे दुर्लक्ष झाले तर मुलाच्या वाढीवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी त्याचे मन आणि प्राण हे खेळात गुंतवावे लागतात. मुलाला एकटे टाकल्यास ते रडते. त्याला कोणीच जवळ केले नाही तर ते उग्र होऊ शकते. अशी मुले रागीट होतात किंवा खूप घाबरट तरी होतात. यासाठीच त्याच्या मनावर चांगले परिणाम होण्यासाठी त्याचे मन हे खेळण्यात गुंतवावे लागते. स्मृती अन् वासनेमुळे मन आणि प्राण हे चंचल असतात. या त्यांच्या प्रत्येक हालचालीचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. यासाठीच मन आणि प्राण हे महत्त्वाचे आहेत. मनातील प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा आपल्या शरीरावर अर्थातच आरोग्यावर होत असतो. औषधाचा परिणाम शरीरावर जाणवत नसेल तर बऱ्याचदा डॉक्टर मनातून आजार घालवण्याचा सल्ला देतात. आजार मनातून गेला तरच औषधीचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. यासाठी मनाने प्रथम बरे व्हायला हवे. मनाने बरे झाल्यासच प्राण वाचतील. यासाठीच मन आणि प्राण हे महत्त्वाचे आहेत.
मनात नित्य चांगले विचार घोळू लागले तर आपले जीवनही प्रसन्न होईल. मनात विकृती असेल, विकार असतील तर जीवनही विकृत, विकारी होईल. मनाच्या विकृतीतूनच गुन्हे हे घडत असतात. यासाठीच मन हे विकारमुक्त, विकृतीमुक्त व्हायला हवे. मनाची शुद्धी ही यासाठीच महत्त्वाची आहे. गुन्हेगाराचे गुन्हे थांबवायचे असतील तर त्याच्या मनातून विकृती, विकार हे काढून टाकायला हवेत. तेंव्हाच गुन्हे थांबतील. गुन्हेगारांचे मनपरिवर्तन हे यासाठीच महत्त्वाचे आहे. आपल्या मनातील व प्राणातील चंचलपणा व विकारवशता दूर झाली तरच आपले जीवन हे आनंदाने भरून जाईल.
जीवन आनंदी, प्रकाशमान व्हावे असे वाटत असेल तर प्रथम मन आणि प्राण यांच्यात बदल घडायला हवा. तरच आपले जीवन हे प्रकाशमान होईल. सद्गुरुंचा नित्य तसा प्रयत्न सुरु असतो. शिष्याला याचा बोध देऊन ते नित्य त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी इच्छुक असतात. शिष्याला आत्मज्ञानाच्या ज्योतीने ओवाळण्याची त्यांची इच्छा असते. शिष्याच्या आयुष्यात आत्मज्ञानाची दिवाळी ते आणू पाहातात. आत्मप्रकाशाच्या ज्योतीने शिष्याची ओवाळणी करण्यासाठी ते आतूर असतात. प्रत्यगज्योतीची ओवाळणी याचा अर्थ समजावून सांगताना बाबा महाराज आर्वीकर म्हणतात, योगमार्गात शिष्याला पावलोपावली अनुभव येत असतात. त्याच्या डोळ्यांना सर्वत्र आत्मप्रकाशच दिसत असतो. त्यामुळे तो सर्व जगत एकात्मतेने जाणतो. त्याचे मन आणि प्राण हीच जणू खेळण्याप्रमाणे समजून कधी त्याला आपल्या स्वरुपात सद्गुरु नेतात तर कधी त्याला अवस्थाभंग न होऊ देता त्यास खेळावयास आपण त्याच्यामध्ये प्रविष्ट होतात. त्यामुळे शिष्याच्या मनाचा मनपणा मोडतो व प्राण समष्टीच्या प्राणाशी समरस होतात. अशा अलौकीक अनुभवाच्या दशेत दिव्यसुखे देत सद्गुरु त्याला खेळवीत असतात. अशा प्रबोध देण्याच्या क्रियेस प्रत्यगज्योतीची ओवाळणी असे म्हणतात.