March 28, 2024
Cape Horn a mysterious place on earth article by jaiprakash pradhan
Home » केप हॉर्न…पृथ्वीवरील एक गुढ ठिकाण (व्हिडिओ)
पर्यटन

केप हॉर्न…पृथ्वीवरील एक गुढ ठिकाण (व्हिडिओ)

केप हॉर्न पृथ्वीचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच्यापुढे महाभयानक असा हा ड्रेक पॅसेज आहे. खलाश्यांचे कबरस्थान म्हणूनही ते ओळखले जाते. फार पूर्वीपासून ‘मृत्यूचा सापळा’ म्हणूनच परिचित आहे. या जागेला असे नाव का मिळाले ? येथे प्रवास करणे मोठे जिकिरिचे असते. ४० फुट प्रचंड लाटा, १२५ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अन् त्यात हिमवृष्टी असा हा चित्तथरारक प्रवास व या पृथ्वीवरील गुढ ठिकाणांबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांच्याकडून या व्हिडिओमधून.

Jaiprakash Pradhan Tour To Cape Horn

दक्षिण चिलीतल्या टिआरा देल फ्युगोच्या छोट्या छोट्या बेटांच्या समूहाचं हे अगदी दक्षिणेकडचं टोक. हॉर्नोस या लहानशा बेटावर ते वसलेलं आहे. जगभरातल्या अस्सल पर्यटकांना केप हॉर्न नेहमीच खुणावतं. ‘खलाश्यांना जलसमाधी मिळणारं सर्वांत मोठं ठिकाण’ म्हणूनही ते तसं ओळखलं जातं. या ठिकाणी क्रूझ जाणं हे सर्वस्वी हवामानावर अवलंबून असतं. या ठिकाणाला भेट देऊन, तिथं काही काळ घालवून टिपलेली तिथली ही निरीक्षणं…

‘केप हॉर्न’ हे पृथ्वीचं दक्षिणेकडील अखेरचं टोक. त्याच्या पुढं महाभयानक असा ‘ड्रेक पॅसेज’ आणि मग मनुष्यवस्ती नसलेला ‘अंटार्क्टिका’ हा सातवा खंड. केप हॉर्न फार पूर्वीपासून ‘मृत्यूचा सापळा’ म्हणूनच परिचित आहे. चाळीस-पन्नास फूट उंचीच्या लाटा…दीडशे-दोनशे किलोमीटर वेगानं वाहणारे वारे…प्रचंड हिमवृष्टी…यांमुळे प्रवास करणाऱ्या खलाश्यांना जिवाची जोखीम घेऊनच उतरावं लागतं. त्यामुळे ‘खलाश्यांच्या जलसमाधीचं सर्वांत मोठं ठिकाण’ (Greatest Graveyard) म्हणूनच ते ओळखलं जातं. पृथ्वीवरील गूढ ठिकाणांच्या यादीत केप हॉर्नचा क्रमांक खूप वरचा लागतो.

अशा या केप हॉर्नचा अप्रत्यक्ष परिचय तीन-चार वर्षांपूर्वी झाला. मध्य अमेरिकेतला पनामा कालवा पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. पनामा कालवा हे जगातलं एक मोठं आश्र्चर्य. मानवानं निसर्गावर केलेली मात! सन १९१४ मध्ये पनामा कालवा बांधून पूर्ण झाला व मालवाहू जहाजांची वाहतूक त्यातून सुरू झाली; पण त्याआधी काय परिस्थिती होती ? अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीवरचं सॅनफ्रॅन्सिस्को किंवा होनोलुलू इथून निघालेल्या जहाजाला पूर्वेकडच्या न्यूयॉर्कला जायचं असलं तरी फार मोठा फेरा पडत असे. म्हणजे प्रशांत महासागरातून निघाल्यानंतर दक्षिण अमेरिका खंडामधल्या चिली या देशातल्या ‘केप हॉर्न’ला वळसा घालायचा आणि मग अटलांटिक महासागरातून परत तेवढंच अंतर कापून न्यूयॉर्कचा किनारा गाठायचा! याचा अर्थ असा की सॅनफ्रॅन्सिस्को ते न्यूयॉर्क हा सागरी मार्ग पार करण्यासाठी जहाजांना तब्बल २२ हजार ५०० किलोमीटरचं अंतर कापावं लागत असे. त्यात प्रचंड वेळ जायचा व ते फार खर्चिकही असे. मुख्य म्हणजे, ‘केप हॉर्न’ इथून प्रवास करणं अतिशय धोकादायक ठरत असे. तिथलं क्षणाक्षणाला बदलणारं हवामान खलाश्यांना जीवघेणं ठरायचं. त्यामुळे पनामा कालव्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रामुख्यानं या खलाशीवर्गानं सुटकेचा मोठा निःश्‍वास टाकला. ही सगळी पार्श्वभूमी पाहता, केप हॉर्नबद्दल कमालीचं औत्सुक्य निर्माण झालं होतं. केप हॉर्नला जाता येईल का, निदान केप हॉर्नच्या मार्गानं प्रवास करता येईल का अशा विविध प्रश्‍नांचं द्वंद्व मनात सुरू झालं. अंटार्क्टिकाला जाताना केप हॉर्नवरून जावं लागतं याची माहिती होती. त्यामुळे अंटार्क्टिकाला जाऊन आलेल्या पर्यटकांकडे त्याबाबत चौकशी केली; पण भारतातून अंटार्क्टिकाला जाणारे बरेचसे पर्यटक अंटार्क्टिकाची बेसिक टूर करतात. म्हणजे उश्‍वायाहून क्रूझनं निघायचं, दोन दिवसांचा भयानक ड्रेक पॅसेज, मग अंटार्क्टिका पेनिन्सुलात चार-पाच दिवस, येताना पुन्हा ड्रेक पॅसेज व उश्‍वायाला परत. त्यात ते केप हॉर्नवरून जातात; पण तिथं थांबत नाहीत. एक-दोन जण केप हॉर्नला थांबणार्‍या क्रूझनं गेले होते; पण प्रतिकूल हवामानामुळे ते केप हॉर्नला उतरू शकले नाहीत. चिलियन फिओर्ड्‌सच्या तीन-चार दिवसांच्या काही सहलीही केप हॉर्नवरून जातात;पण तिथं उतरता येणं म्हणजे खरोखरच नशीब. कारण, सारं निसर्गाच्या हाती असतं.

अंटार्क्टिकाला जायचं नक्की झालं, तेव्हा केप हॉर्नला लँडिंग असलेल्या क्रूझेसचा शोध घ्यायला पत्नी जयंतीनं सुरुवात केली. त्यांची संख्या खूपच कमी होती; पण हुर्टिग्रुटन कंपनीची The legendary Magellan chilean fiords and Antarctic ही १८ दिवसांची क्रूझसहल यादृष्टीनं उपयुक्त ठरणारी होती. याच कंपनीतर्फे ग्रीनलँडची क्रूझसहल आम्ही केली होती. तिचा अनुभव अतिशय चांगला होता. त्या लक्झुरिअस सफरी नसून, ‘एक्स्पिडिशन क्रूझ’ असतात, त्यामुळे जास्तीत जास्त स्थळदर्शनावर त्यांचा भर असतो, म्हणून अंटार्क्टिकासाठी ही १८ दिवसांची सहल आम्ही निवडली. त्यात ‘एंड ऑफ द वर्ल्ड’ असलेलं प्युर्टो विल्यम्स हे गाव व केप हॉर्न इथं उतरण्याचा कार्यक्रम समाविष्ट होता. अर्थात हे सर्व हवामानावर अवलंबून राहील असं कार्यक्रमपत्रिकेत स्पष्ट करण्यात आलं होतं. केप हॉर्नला समुद्र खवळलेला असतो. अत्यंत आव्हानात्मक स्थिती असते. ‘आपण जर तिथं उतरू शकलो तर फार मोठी कामगिरी आपल्याकडून पार पडली असं समजण्यास हरकत नाही,’ हे त्यांच्या पुस्तिकेत सुरुवातीलाच ठळकपणे लिहिलं होतं. (If the weather is good, we will go ashore on Cape Horn. This area is known for high seas challenging conditions and if we make it ashore this will be a great achievement). याविषयी थोडी अधिक माहिती मिळवली.

Cape Horn a mysterious place on earth article by jaiprakash pradhan
Cape Horn a mysterious place on earth article by jaiprakash pradhan

आदल्या वर्षी एकूण सहा सहलींपैकी दोन वेळाच अनुकूल हवामानामुळे क्रूझ केप हॉर्नला लागली. आम्ही गेलो त्याच्या आधी तिन्ही वेळेस केप हॉर्नला ४० फुटी लाटांच्या तांडवामुळे बोट थांबण्याचा प्रश्‍नच आला नाही. त्यामुळे आमचं भविष्यही टांगलेलंच होतं. प्युर्टो विल्यम्स या ‘एंड ऑफ द वर्ल्ड’च्या छोट्या गावातून रात्री दहाच्या सुमारास आमची ‘मिडनॅटसोल’ क्रूझ निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठपर्यंत ती केप हॉर्नला पोचेल अशी अपेक्षा होती. वस्तुत: प्युर्टो विल्यम्स ते केप हॉर्न हे अंतर फार नाही. स्पीड बोटनं तर सहा-सात तासांत हे अंतर कापता येतं आणि मोठ्या क्रूझनं आठ ते दहा तासांत. मात्र, सारंच हवामानाच्या लहरीवर अवलंबून. कधी कधी १२-१४ ताससुद्धा लागतात. ही सगळी माहिती आमच्या क्रूझवरच्या अनुभवी कर्मचाऱ्यांनी आम्हाला दिली. पहाटेच जाग आली. खिडकीतून बाहेर फक्त पाणीच पाणी दिसत होतं. त्यातल्या त्यात एक बरं की लाटा फार उंच नव्हत्या. कॅप्टनच्या सकाळच्या घोषणेकडे आता आमचे कान लागले होते. बरोबर आठच्या सुमाराला कॅप्टननं जाहीर केलं : ‘आता आपली क्रूझ केप हॉर्नला लागत आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता, दोन-तीन तास इथं आपण सहज थांबू शकू. हवामान अगदी अनुकूल आहे. अर्थात्, क्षणाक्षणाला हवामान बदलूही शकतं. तसं काही जाणवलं तर लगेच तशी घोषणा करण्यात येईल. आता पंधरा मिनिटांत केप हॉर्नला प्रवाशांनी गटागटानं उतरण्याच्या सूचना देण्यात येतील.’

मला व पत्नी जयंतीला झालेला आनंद शब्दांत सांगणं अशक्य. आम्ही लँडिंगच्या तयारीला लागलो. पुंटा ऐरेनासहून क्रूझ निघाली त्या दिवशीच आम्हाला, आपापल्या मापाचे गुडघ्यापर्यंतचे रबरी बूट व वॉटरप्रूफ जॅकेट्स देण्यात आली होती. लाईफ जॅकेट्स प्रत्येकाच्या खोलीतच होती. क्रूझ थांबली की बाहेर पडण्यासाठीचा सर्व पेहेराव अंगावर चढवणं म्हणजे जणू एक समारंभच म्हणावा लागेल! ग्रीनलँडच्या सफरीतही आम्ही तो चढवला होता; पण या वेळी एक बदल चांगला होता व तो म्हणजे, आपापल्या खोलीत बसून हे सर्व ‘अलंकार’ परिधान करायचे होते, त्यामुळे तशी गडबड उडत नव्हती. मात्र, निदान अर्ध्या तासाचा कालावधी त्यासाठी लागायचा. केप हॉर्नचं तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस असल्याचं कप्तानानं सांगितलं. वारं प्रचंड नव्हतं; पण बऱ्यायापैकी वाहत होतं. त्यादृष्टीनं सर्व गरम कपडे घालणं आवश्यक होतं. वारा असला तर पायाला चांगलीच थंडी जाणवते. यासाठी पायांत थर्मल, जाड जॅकेट व हुर्टिग्रुटेन कंपनीनं दिलेलं वॉटरप्रूफ जॅकेट थंडी, वारा, पाऊस यांच्याशी सामना करण्याच्या दृष्टीनं योग्य होतं. काही वर्षांपूर्वी नॉर्वेला आम्ही हिवाळ्यात आइस हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेलो होतो.त्यासाठी – ४० अंश सेल्सिअसपर्यंत थंडी सहन करू शकतील असे पायांतले सॉक्स कॅनडातून घेतले होते, ते या वेळीही उपयोगी पडले. ते घालून त्यावर रबरबूट चढवले. आता शेवटी लाईफ जॅकेट्स. त्यांचा पट्टा दोन पायांच्या मधून पुढं आणून जॅकेटला अडकवावा लागतो. असं हे सर्व वेशांतर झालं की क्रूझच्या खोलीत कमालीचं गरम व्हायला लागतं. कधी एकदा क्रूझबाहेर पडून उघड्या थंडगार हवेत येतोय असं होऊन जातं.



क्रूझवर प्रवाशांचे गट पाडण्यात आले व त्यांना नावं देण्यात आली होती. आमची क्रूझ केप हॉर्नच्या बंदरापासून साधारणत: ५०० मीटर्स लांब उभी राहिली. तिथून छोट्या छोट्या बोटीतून – ज्यांना ‘झोडियाक’ असं म्हणतात – केप हॉर्नच्या बेटावर जायचं होतं. एका बोटीत १४-१५ प्रवासी. या रबराच्या ‘झोडियाक’मध्ये कसं चढायचं, बसायचं, उतरायचं याचं प्रशिक्षण आम्हाला सुरुवातीलाच क्रूझमधल्या सेमिनारमध्ये देण्यात आलं होतं.

केप हॉर्नला उतरण्याआधी त्याची भौगोलिक रचना आम्ही मुद्दाम समजावून घेतली. केप हॉर्न हे दक्षिण चिलीतल्या टिआरा देल फ्युगोच्या छोट्या छोट्या बेटांच्या समूहाचं अगदी दक्षिणेकडचं टोक आहे व ते लहानशा हॉर्नोस (hornos) बेटावर वसलं आहे, तसंच केप हॉर्न ही ड्रेक पॅसेजची उत्तरेकडची सीमारेषा असून, अटलांटिक व प्रशांत महासागर हे तिथंच एकमेकांना मिळतात.

योगायोग असा की, केप हॉर्नचा शोध लागल्याला ता. २९ जानेवारी २०१६ रोजी ४०० वर्षं पूर्ण झाली आणि आम्ही सहा जानेवारी २०१८ ला केप हॉर्नवर पाय ठेवत होतो. जून १६१५ च्या सुरुवातीला हॉलंडहून दोन बोटी निघाल्या. Endracht ही ३६० टन वजनाची बोट विल्यम स्कॉटन (Schouten) व ले मायरे (Le Maire) हे दोनजण चालवत होते, तर दुसऱ्या ११० टन वजनाच्या ‘हॉर्न’चं कप्तानपद स्कॉटनचा भाऊ जोहान (Johan) याच्याकडे होतं. मात्र, यांतली हॉर्न बोट लाटांच्या तडाख्यानं बर्फात मोडली, फुटली आणि जळाली.
त्यानंतर हॉर्नच्या खलाश्यांच्या साह्यानं, विल्यम व ले यांनी Endracht या बोटीतून अत्यंत अरुंद अशा Le Maire भागातून प्रवास करून फार मोठा शोध लावला. त्या खलाश्यांनी लिहून ठेवलं आहे : ‘ता २५ जानेवारी १६१६ रोजी संध्याकाळी वारं नैर्ऋत्य दिशेनं वाहत होतं. आम्हाला काहीतरी नवीन मार्ग सापडत असल्याची जाणीव सतत होत होती. ता. २९ जानेवारी १६१६ रोजी एका उंच डोंगरावर जमीन दिसली. ती संपूर्ण बर्फाच्छादित व अगदी टोकाला होती.’

विल्यमनं, अपघातात सापडलेल्या, त्यांच्याबरोबरच्या ‘हॉर्न’ बोटीची आठवण म्हणून त्या भागाचं नाव ‘केप हॉर्न’ असं ठेवलं; पण त्या वेळी निसर्गाचं अक्षरश: तांडवनृत्य तिथं सुरू होतं. ड्रेक पॅसेजमधल्या ५० – ५० फूट उंच लाटा, हिमवृष्टी, पाऊस यांमुळे त्या जागेचा अधिक शोध घेणं त्यांना शक्य झालं नाही, त्यामळे सन १६२४ मध्येच हॉर्न हे बेट असल्याचा शोध खऱ्या अर्थानं लागला असं म्हणावं लागेल. हे बेट साधारणत: आठ किलोमीटर (पाच मैल) लांब व त्याची जास्तीत जास्त उंची ४२४ मीटर असून, तो संपूर्ण भाग काळ्याभोर कड्यांनी व्यापलेला आहे.

अशा या केप हॉर्नवर उतरण्याची वेळ आता आली होती. आमची ‘मिडनॅटसोल’ क्रूझ जिथं उभी होती तिथून छोट्या झोडियाक बोटीतून केप हॉर्न बेटावर जायचं होतं. आमच्या गटाचं नाव जाहीर झालं, मग आम्ही टेंडरपिटमध्ये (बोटीचा अगदी खालचा मजला) गेलो आणि झोडियाकमधून केप हॉर्नच्या दिशेनं निघालो. तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस व त्याला जोरदार वाऱ्याची साथ. अर्थात निसर्गाच्या तिथल्या रौद्र रूपाचं जे वर्णन वाचलं-ऐकलं होतं (आणि पुढं ड्रेक पॅसेजमधून येताना जे थोडं अनुभवायला मिळालं) त्या तुलनेत सारंच शांत वाटत होतं. केप हॉर्न बेटावर उतरणं ही मात्र
एक मोठी करामतच होती. कारण, झोडियाक ही किनाऱ्याजवळ पाण्यातच उभी राहिली. त्यानंतर रबराच्या बोटीवर, बोट चालवणाऱ्याच्या दिशेनं पाय ठेवून, मग पाण्यात उतरावं लागत होतं.

तिथं सर्वत्र पाणीच पाणी. अर्थात्, लाटा उंच नव्हत्या व पाण्याची खोलीही फार नव्हती.
पायांत गडघ्यापर्यंत रबराचे बूट, त्यामुळे झोडियाकमधून पाण्यात उतरल्यानंतर, पाण्यातून चालत केप हॉर्न बेटावर आलो. बेटावर उतरल्यानंतर आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. या बेटावर अगदी उंचावर एक भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे. ते आगळंवेगळंच म्हणावं लागेल. ‘अल्बाट्रॉस’ पक्षी आकाशात भरारी घेत आहे असं ते शिल्प आहे; पण ते पाहण्यासाठी १७५ पायऱ्या चढून डोंगरावर जावं लागतं. सहलसंयोजकांनी सांगितलं, ‘ज्यांना एक तासात पायऱ्या चढून परत खाली येणं शक्य असेल त्यांनीच स्मारक बघण्यासाठी जाणं योग्य ठरेल. कारण, आपल्याला इथं फार वेळ थांबता येणार नाही.’ मला पायऱ्या‍या चढायला काहीच अडचण नव्हती; पण गुडघ्याच्या थोड्या त्रासामुळे वेळेचं बंधन पाळता येईल की नाही याबद्दल साशंक असल्यामुळे मी खालीच थांबलो व जयंती मात्र सगळ्या पायऱ्या चढून गेली. १७५ पायऱ्यांची रचना अगदी व्यवस्थित आहे. जवळजवळ ७० -८० पायऱ्या सरळ एकावर एक आहेत. त्या चढताना थोडा वेळ लागतो; पण पुढच्या निम्म्या पायऱ्या बऱ्याचशा आरामशीर आहेत. दोन पायऱ्या‍ चढायच्या, थोडं अंतर चालायचं आणि मग आपण त्या स्मारकाच्या पायथ्याशी पोचतो. केप हॉर्नच्या अथांग, खवळलेल्या महासागरात ज्या अनेकांना जलसमाधी मिळाली त्यांना आदरांजली म्हणून हे स्मारक उभारण्यात आलं आहे. उडणाऱ्या‍या अल्बाट्रॉस पक्ष्याची प्रतिकृती अप्रतिमच आहे. या पक्ष्याची सारी कहाणीच थक्क करून सोडणारी. पांढऱ्याशुभ्र रंगाच्या अल्बाट्रॉस पक्ष्याचे पंख १०-११ फूट रुंद असतात आणि तो एका दमात निदान १० हजार किलोमीटरची भरारी सहज मारू शकतो. जयंती या स्मारकाच्या पायथ्याशी उभी राहिली. सहप्रवाशांची गर्दी असूनही छान फोटो काढता आले. कारण, प्रत्येकजण एकमेकाला साह्य करत होता. ‘तुम्ही केप हॉर्नवर आलात,’ याचं प्रमाणपत्र इथं पैसे भरून मिळू शकतं (चिलियन सरकारतर्फे हे प्रमाणपत्र दिलं जातं) किंवा पासपोर्टवरही तसं स्टम्पिंग होतं. स्मारकाच्या परिसरात वाऱ्याचा जोर जबरदस्त होता; पण तरीही आज सर्व हवामान जणू आमच्यासाठी अनुकूल होतं. या स्मारकाच्या जवळ कवितेच्या काही समर्पक ओळी लिहिल्या आहेत. त्या मुद्दाम जशाच्या तशा इंग्लिशमध्ये देत आहे.

I am the albatross that awaits at the end of the world.
I am the forgotten soul of the sailors lots, Rounding Cape Horn from all seas of the world.
But die they did not in the fierce waves, for today towards eternity, in my wings
they soar, in the last crevice of the Antarctic winds
– Sara vial

स्मारकाच्या शेजारीच चिली देशाचा ध्वज मोठ्या डौलानं फडकत होता. शेजारीच एक चॅपेल आहे. अत्यंत धीरगंभीर, कमालीच्या शांत वातावरणात त्या चॅपेलसमोर उभं राहिल्यानंतर, केप हॉर्नच्या परिसरात घडलेल्या सर्व बऱ्याया-वाईट घटनांचा जणू इतिहासच आठवू लागलो. केप हॉर्नवर किंवा त्याच्या जवळ एकूण दोन दीपगृहं (लाईट हाऊस) दिसतात. त्यांपैकी एक चिलियन नाविक दलाच्या केंद्रात आहे. ‘केप हॉर्न लाईट हाऊस’ म्हणून ते ओळखलं जातं व तिथं सहज जाता येतं. विशेष म्हणजे चिलियन नाविक दलाचं केंद्र, त्यांचं दीपगृह व अल्बाट्रॉसचं स्मारक ही प्रत्यक्षात केप हॉर्न बेटावर नाहीत; तर ती सुमारे एक मैल लांब, ईशान्येला दुसऱ्या जमिनीवर आहेत. कारण, केप हॉर्नला जमिनीवरून किंवा समुद्रातून जाणं तसं फारच अवघड आहे. केप हॉर्न बेटावर अगदी छोटा म्हणजे चार मीटर (१३ फूट) उंचीचा फायबर ग्लासचा एक हलका टॉवर असून, त्याच्या अंतराची पातळी चाळीस मीटर (१३० फूट) व टप्पा सुमारे २१ किलोमीटरचा (१३ मैल) आहे. हे केप हॉर्नचं अगदी अधिकृत व जगाच्या नकाशावरचं दक्षिणेकडील शेवटचं पारंपरिक दीपगृह मानलं जातं. केप हॉर्न इथं मोठ्या जहाजांतून प्रवास करणं आता तसं सुरक्षित वाटत असलं, तरी आजही तिथं अगदी छोट्या शिडाच्या बोटीतून जलप्रवास करण्याचं धाडस दर्यावर्दी दाखवतात; किंबहुना इथं शिडाच्या बोटींच्या स्पर्धाही आयोजिण्यात येतात. त्यात खूपदा केवळ एक स्पर्धक ती नाव वल्हवत असतो. या स्पर्धांत संपूर्ण प्रदक्षिणा कुठंही न थांबता करावी लागते, तर काही स्पर्धांमध्ये एक-दोन थांबे घेतले जातात. ही स्पर्धा साधारणत: दर चार वर्षांनी होते. उत्साही, साहसी, निर्भय दर्यावर्दींसाठी हॉर्न हे नेहमीच जबरदस्त आव्हान असतं. त्यांना प्रोत्साहनाकरता माईल्स व बेरिल स्मिटोनची कहाणी आवर्जून सांगितली जाते. हे दोघंही वीर त्यांच्या Tzu Hang या शिडाच्या नावेतून हॉर्नला प्रदक्षिणा घालण्यास निघाले होते. हॉर्नच्या जवळ ते आले आणि त्यांची बोट तुफानी वाऱ्यामुळे हेलकावे खाऊ लागली. तिनं दोन-तीन जबरदस्त गटांगळ्या खाल्ल्या. बोटीचं नुकसान झालं; पण ते दोघं मात्र बचावले. चिलीमधल्या एका गावात त्यांनी नाव दुरुस्त करून घेतली व पुन्हा त्याच मार्गानं प्रवास सुरू केला. खराब हवामानामुळे बोट परत उलटीपालटी होऊ लागली, शीड फाटलं व बोट तुटली; पण या वेळीही ते दोघं या संकटातून आश्‍चर्यकारकरीत्या वाचले. केप हॉर्न बेटावर पाय ठेवल्याचा ‘पराक्रम’ बजावल्यानंतर आम्हीही आमच्या क्रूझवर सुखरूप परतलो आणि दुपारी बाराच्या सुमाराला ‘मिडनॅटसोल’नं भयंकर अशा ‘ड्रेक पॅसेज’च्या दिशेनं कूच केलं.

Related posts

हिमनगांची जागतिक राजधानी ग्रीनलँड…(व्हिडिओ)

व्हिडिओ : जॉर्जियातील अधुरी प्रेमकथा…

अंटार्क्टिकाची सफर…(व्हिडिओ)

Leave a Comment