विसरू नको बापाला…सीमा मंगरूळे तवटे, वडूज सातारा यांची कविता
बाप डे येताच
येई बापाची आठवण
भरभरून सांगताना प्रत्येक
प्रसंगाची होई साठवण….
बापाविषयी लिहीताना मात्र
शब्द नेहमीच पडतात अपूरे
मोजमाप करता येत नाही
जसे भासे आकाशातील तारे…
याच बापाचे हाल का
होतात मग म्हातारपणी
मुलांचा संसार सुरू होताच
वाढतात कशा अडचणी…
बालपणी आपला वाटणारा बाप
पंख फुटताच होत जातो वैरी
विसरुनी सारी माया त्याची
फिरायला लावतो दारोदारी…
वाट दाखवतो वृद्धाश्रमाची
जाणिव नसे जबाबदारीची
एवढा होई अंध संसारी
होत नाही आठवण त्याच्या प्रेमाची…
होत असतो तोही बाप
फिरुनी वेळ हीच येणार
जैसी करणी वैसी भरणी
आपलेही दिवस एक दिवस फिरणार….
आता तरी जागा होऊन
बघ बापाच्या डोळ्यात
तुझ्या आधाराची काठी
आस लावून बसलाय मनात….