जय जवान जय किसान हा नारा आहे. जवानांच्याबरोबरच शेतकरी हासुद्धा श्रेष्ठ आहे. व्यापारी किंवा इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी श्रेष्ठ का? कारण हा व्यवसाय श्रेष्ठ आहे. इतर धंद्यात, व्यापाऱ्यांत फसवणूक करून पुष्कळसा नफा कमाविता येतो. पण शेती हा असा व्यवसाय आहे. येथे फसवणूक ही करताच येत नाही. जे काही कमाविले जाते त्याला कष्ट पडतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलांचा आधारु ।
घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ।। 880 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा
ओवीचा अर्थ – तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे.
शेतीसाठी आवश्यक भांडवल कोणते ? तर जमीन, बियाणे आणि अवजारे हे शेतीचे भांडवल आहे. याचा आधार घेऊन नफा मिळविणे हे शेतकऱ्याचे कर्म आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारा शिपाई मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो तो क्षत्रिय आहे आणि देशात शेती करून, व्यापार करून जगणारा कोणतीही व्यक्ती ही वैश्य आहे. ही रचना कर्मानुसार आहे. सीमेवर लढतो म्हणूनच तर देश सुरक्षित आहे. अन्यथा देशात पारतंत्र्य येईल. जिवाची पर्वा न करता लढतो. ऊन, वारा, थंडी याची त्याला तमा नसते. शत्रू केव्हा हल्ला करेल याचा नेम नाही. आता तर तो कशाप्रकारे हल्ला करेल याचाही भरवसा नाही. नागरिकांच्या वेशात घुसखोरी तो करतो आहे. अशा परिस्थितीत लढणारा जवान हा श्रेष्ठच आहे. त्याचे श्रेष्ठत्व आहे म्हणूनच देशातले सर्व नागरिक आज सुरक्षित आहेत. सुखाने नांदत आहेत. त्याच्या या कर्माला सलाम हा करावाच लागेल.
जय जवान जय किसान हा नारा आहे. जवानांच्याबरोबरच शेतकरी हासुद्धा श्रेष्ठ आहे. व्यापारी किंवा इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी श्रेष्ठ का? कारण हा व्यवसाय श्रेष्ठ आहे. इतर धंद्यात, व्यापाऱ्यांत फसवणूक करून पुष्कळसा नफा कमाविता येतो. पण शेती हा असा व्यवसाय आहे. येथे फसवणूक ही करताच येत नाही. जे काही कमाविले जाते त्याला कष्ट पडतात. जे काही मिळते ते नैसर्गिक परिस्थितीवर मिळते. आता ग्रीन हाऊस किंवा तापमान नियंत्रण करून शेती केली जात आहे. व्हर्टिकल फार्मिंग, टेरेस फार्मिंगही केले जात आहे. पण येणारे उत्पादन हे नैसर्गिक आहे. निसर्गावर अवलंबून आहे. वातावरणनिर्मिती करून उत्पादनात वाढ करू शकतो. पण तरीही येणारे उत्पादन हे नैसर्गिकच असते. कृत्रिमपणा त्यामध्ये नसतो. म्हणजे येथे फसवणूक नसते. फसवणूक करण्यास वावही नसतो.
शेतकऱ्यांच्या रक्तातच हा गुण नाही आणि तो येणारही नाही. उत्पादनवाढीच्या हव्यासापोटी काही शेतकरी विविध प्रकारच्या फवारण्या करतात. त्याचे प्रमाण ठरलेले आहे. पण तरीही प्रमाणापेक्षा अधिक फवारण्या होत आहेत. संजीवकांचा वापरही प्रमाणापेक्षा अधिक केला जात आहे. खतांचा वापरही अधिक केला जात आहे, असा आरोप होतो आहे. पण असे उत्पादन विकताना अनेक अडचणी येतात याची कल्पना शेतकऱ्यांना आहे. यामुळे अशा चुका तो आता टाळतो आहे. अशामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते याचीही कल्पना त्याला आली आहे.
शेतीत फसवणुकीचा धंदा हा करता येतच नाही. इतरांची फसवणूक करताना स्वतःचीच येथे फसवणूक होते. यासाठी इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी हा सर्वश्रेष्ठ उद्योजक आहे. भांडवलाच्या आधारावरच तो पुष्कळसा नफा घेऊ शकतो. आहे ते भांडवल त्याला टिकविणे हाच त्याचा धर्म आहे. यात कोणाचीही फसगत तो करत नाही याचमुळे हा व्यवसाय हा सर्वश्रेष्ठ आहे.
सध्याच्या बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा इतरावर अवलंबून होऊ लागला आहे. त्यामुळे तो अडचणीत आला आहे. पूर्वी बियाणे तो स्वतःच तयार करायचा. त्याला महागडे बियाणे विकत घ्यावे लागत नव्हते. अवजारे घरातीलच होती. पण आता यांत्रिकीकरणाच्या युगात त्याला सर्वच बाहेरून घ्यावे लागत आहे. म्हणजे त्याची स्वयंपूर्णतः कमी होऊ लागली आहे. यामुळेच तो तोट्यात जाऊ लागला आहे. उत्पादनापेक्षा खर्चात अधिक वाढ झाली आहे. अशाने तो नफा मिळवण्यात कमी पडत आहे. यासाठीच ही ओवी अभ्यासण्यासारखी आहे. कारण बी आणि अवजारे यात स्वयंपूर्ण असाल तर स्वतःच्या शेतात तुम्ही अधिक नफा निश्चितच मिळवू शकाल. शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण होण्यावर भर द्यायला हवा तसा विचारच शेतीला आता तारू शकतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.