- प्रभानवल्ली ते धूतपापेश्र्वर साहित्य संस्कृती जागर परिक्रमा
- विश्व मराठी परिषेदेच्यावतीने शनिवार ( ता. २९ ऑक्टोबर) ते बुधवार (ता. २ नोव्हेंबर) दरम्यान आयोजन
- ग्रामीण जीवनाची युवकांना ओळख हा उद्देश
- साहित्यिक / कलाकार परिक्रमेत होणार सहभागी
रत्नागिरी – लांजा तालुक्यातील प्रभानवल्लीपासून राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिरापर्यंत शनिवार ( ता. २९ ऑक्टोबर) ते बुधवार (ता. २ नोव्हेंबर) अशी ५ रात्री आणि ६ दिवस अशी एकूण ६ दिवसांची साहित्य संस्कृती जागर परिक्रमा आयोजित केली आहे. आजच्या तरुणाईला खऱ्या भारताची ओळख होण्यासाठी प्रत्यक्ष खेड्यात जाऊन तेथील संस्कृती आणि लोक जीवन याची अनुभूती घेण्यासाठी आणि तेथील ग्रामस्थ बंधू भगिनी बरोबर मनमोकळा संवाद साधून खरा भारत जाणून घेण्याची संधी देणारी ही एक अनोखी परिक्रमा आहे. यातून इंडियाची भारताशी ओळख होईल. विश्व मराठी परिषदेच्यावतीने या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिक्रमेमध्ये १८ ते ३५ वयोगटातील सुमारे १२५ जण यामध्ये सहभागी होणार असून परिक्रमेदरम्यान रोजचे चालणे सुमारे १२ ते १५ किलोमीटर असणार आहे. परिक्रमेदरम्यान प्रभानवल्ली हा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि स्वराज्याला सर्वात जास्त महसूल देणारा सुभा, खोरनिनको येथील मुचकुंदी नदीचा उगम आणि धरण, बल्लाळेश्वर मंदिर , शिवकालीन गढी, वेरवली, लांजा, ओणी, राजापूरची गंगा, उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे, इंग्रजांच्या वखारीचे अवशेष, प्राचीन धूतपापेश्वर मंदिर इत्यादी स्थळांना भेट देण्यात येणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्यातून चालताना तळकोकणाचे अद्भुत सौंदर्य अनुभवता येणार आहे.
निवासाच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर चर्चा, गप्पा-गोष्टी आणि विचारांची देवाण-घेवाण, ग्रामीण कलांचे सादरीकरण, ग्रामीण खेळ असे उपक्रम होणार असून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे, ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, लेखक अतुल कहाते, नीलिमा बोरवणकर असे काही साहित्यिक / कलाकार परिक्रमेत सहभागी होणार आहेत.
सहभागासाठी संपर्क – अपूर्वा राऊत – 9309462627 स्वाती यादव – 9673998600