February 6, 2023
nature-feel-mind-joyfull-article-by-rajendra-ghorpade
Home » निसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी
विश्वाचे आर्त

निसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी

ऐतिहासिक वास्तू आपणास नित्य प्रेरणा देत राहाते. तत्कालिन राजांनी केलेल्या पराक्रमातून नवी उर्जा मिळत राहाते. नवे नेते आले ते आजचे आदर्श होऊ शकतात. पण त्या राजाचा आदर्श कधी जुना होत नसतो. कारण नव्या आदर्शवादी नेत्यांनी त्यांचाच आदर्श घेऊन नवनिर्मिती केलेली असते. मग तो राजा आता जुना कसा वाटू लागतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

गंधर्वदुर्ग कायी पाडावें । काय शशविषाण मोडावें ।
होआवें मग तोडावें । खपुष्प कीं ।। २१५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहीजेत काय ? सशाचे शिंग मोडून टाकले पाहीजे काय ? आकाशाचे फुल असावे आणि मग तें तोडावे.

क्षणाक्षणाला आज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. विकासाचा वेग इतक्या झपाट्याने वाढला आहे की विचार करायलाही आपणास संधी राहीलेली नाही. दररोज नवनिर्मिती होताना पाहायला मिळत आहे. मनुष्य आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांची निर्मिती करताना पाहायला मिळतो. गरजेचे असेल तरच ते बाजारात चालणारे आहे. त्यामुळे गरजा विचारात घेऊन बाजारात वस्तू आणल्या जात आहेत. उन्हाळ्यात कोण स्वेटर घालेल का ? मग उन्हाळ्यात स्वेटरची विक्री कशी होईल. योग्यवेळी योग्य गोष्टींची निर्मिती करून अधिक नफा मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. म्हणजे मनुष्याच्या गरजा पाहून त्याची निर्मिती होत आहे.

पूर्वीच्या काळी सुरक्षेचे ठिकाण म्हणून गड-किल्ल्यांकडे पाहीले जात होते. त्यामुळे अशा वास्तूंची निर्मिती तत्कालिन सत्ताधिशांनी केली. अन्यथा त्यांची निर्मितीही झालीच नसती. आता सत्ता बदलली आहे. लोकशाही आली आहे. लोकशाहीत राजेशाहीचे महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे राजाच्या सुरक्षेचा प्रश्नच निर्माण झाला नाही. त्यामुळे तो आता गड-किल्ल्यावर राहाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकशाहीतील राजे, नेते आता सुरक्षेसाठी गड-किल्ल्यावर राहात नाहीत. बदलत्या परिस्थितीनुसार सुरक्षेचे प्रश्नही बदलले आहेत. त्यामुळे गड-किल्ल्यांचे महत्त्व आता उरलेले नाही. केवळ एक ऐतिहासिक वास्तू म्हणूनच त्याकडे पाहीले जाते. किल्ल्यांचे महत्त्व आता उरले नाही म्हणून ते पाडावेत का ? तसे करण्याची गरज आहे का ? ऐतिहासिक वास्तू आपणास नित्य प्रेरणा देत राहाते. तत्कालिन राजांनी केलेल्या पराक्रमातून नवी उर्जा मिळत राहाते. नवे नेते आले ते आजचे आदर्श होऊ शकतात. पण त्या राजाचा आदर्श कधी जुना होत नसतो. कारण नव्या आदर्शवादी नेत्यांनी त्यांचाच आदर्श घेऊन नवनिर्मिती केलेली असते. मग तो राजा आता जुना कसा वाटू लागतो. तो आदर्श जुना कसा होऊ शकतो ? तो आदर्श काढून टाकण्याची गरज का वाटते ?

काळ बदलला. अनेक युगे आली अन् गेली. पण आकाशातील ढग काही बदलले का ? त्यांची निर्मिती ही होत राहाते. फक्त ते दरवेळी वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या रुपात असतात. निसर्गाचा हा अविष्कार आत्ताच्या नव्यापिढीला पाहाण्यासाठीही वेळ नाही. निसर्गातील हे सौंदर्य पाहाण्यासाठी कोणी अडवतही नाही. कारण ते सदैव उपलब्धही आहे अन् नित्य नुतनही आहे. पण हा डोळ्यांना सुख देणारा निसर्ग सोडून आजची पिढी ही नवतंत्रज्ञानाच्या कृत्रिम जगात वावरते आहे. त्यामुळे त्यांचे आदर्शही कृत्रिम झाले आहेत. त्यांचे विचारही कृत्रिम झाले आहेत. उत्स्फुर्तपणे येणारा विचार, आलेली प्रतिक्रिया अनेक बदल घडवून जाते. तो बदल हा शाश्वत असतो. कारण तो नैसर्गिक असतो. निसर्गात उत्पन्न झालेल्या या कलाकृतींतून मिळणारा आनंद उपभोगण्याची गरज आहे. पैशाने आनंद मिळवणाऱ्या पिढीला निसर्गातील मुक्त आनंदाची ओळख करून देण्याची गरज आहे. निसर्ग संवर्धनासाठी या मुक्त आनंदाची अनुभुती त्यांनी घ्यायला हवी. यातून उत्पन्न होणारा नैसर्गिक विचारच खरा आदर्श उभा करू शकतो. निसर्गातून मिळणारा मुक्त आनंदच मनाला प्रोत्साहित करतो. मनाला उभारी देतो. यासाठीच निसर्ग हा जपायला हवा.

Related posts

सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी)

साधनेत मन स्थिर होण्यासाठीचा सोपा उपाय

वर्षियेंवीण सागरू । जैसा जळे नित्य निर्भरु । (एकतरी ओवी अनुभवावी)

Leave a Comment