📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ दीर्घ कवितेचा पंजाबी अनुवाद प्रकाशित Punjabi Translation of Ajay Kandar’s Epic Poem Yuganuye Tuich

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या बहुचर्चित दीर्घ कवितेचा पंजाबी अनुवाद प्रसिद्ध झाला. साहित्य अकादमी विजेते लेखक सत्यपाल भिखी यांनी हा अनुवाद केला.

  • साहित्य अकादमी विजेते पंजाबी लेखक सत्यपाल भिखी यांचे भाषांतर
  • पंजाब पटियाला येथे प्रकाशन सोहळा

अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’चा पंजाबी अनुवाद

पटियाला – मराठी दीर्घ कवितेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे कवी अजय कांडर यांचा बहुचर्चित युगानुयुगे तूच हा दीर्घ कवितासंग्रह हिंदी पाठोपाठ आता पंजाबी भाषेत अनुवादित प्रसिद्ध झाला आहे.पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी विजेते नामवंत लेखक आणि अनुवादक सत्यपाल भिखी यांनी हा पंजाबी भाषेत अनुवाद केला आहे.या अनुवाद ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पंजाब पटियाला येथे पंजाबी साहित्यातील नामवंत साहित्यिक तथा प्रसिद्ध कथाकार किरपाल कझाक, पंजाब लेखक संघाचे अध्यक्ष सरदार दर्शन बटर, कवी आणि अनुवादक तरसेम बरनाला, प्रा.सुरजित सिंह, प्रकाशक संदीप सिंह यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला.

अजय कांडर यांनी ‘हत्ती-इलो’ या आपल्या लक्षवेधी दीर्घ कवितेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे कसे आहेत हा विचार मांडणारी ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता लिहिली. ही कविता लोकवाङ्मय गृह, मुंबई यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आली. या कवितेला वाचकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. प्रकाशनापूर्वीच तिच्या दोन आवृत्त्या एकाच वेळी छापण्यात आल्या. प्रकाशनानंतर अवघ्या सहा महिन्यांत तिची तिसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली.या कवितेला समीक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे लोकवाङ्मय गृहातर्फेच समीक्षक कवी प्रा. एकनाथ पाटील यांच्या संपादनाखाली ‘युगानुयुगे तूच : चर्चा आणि चिकित्सा’ हा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला. त्याचबरोबर मुंबई दूरदर्शनने या कवितेवर आधारित नाट्यनिर्मिती केली असून, त्या नाटकाचे प्रयोग सध्या विविध ठिकाणी आयोजित केले जात आहेत.

दरम्यान, मराठी-हिंदीतील प्रसिद्ध अनुवादक प्रा. डॉ. सुधाकर शेंडगे यांनी ‘युगानुयुगे तूच’चा हिंदी अनुवाद केला असून तो दिल्लीच्या वाणी प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या हिंदी अनुवादित ग्रंथाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. याच हिंदी अनुवादावरून सत्यपाल भिखी यांनी या कवितेचे पंजाबी भाषांतर केले असून, ते आता ग्रंथरूपात प्रकाशित झाले आहे.

या भाषांतराविषयी सत्यपाल भिखी म्हणतात, “‘युगानुयुगे तूच’ ही आंबेडकरांच्या विचारधारेविषयी मराठी कवी अजय कांडर यांनी लिहिलेली एक महत्त्वपूर्ण दीर्घ कविता आहे. ही कविता भारतातील जातीय, धार्मिक आणि वर्गीय प्रश्नांवर अत्यंत सखोल आणि नेमकेपणाने भाष्य करण्यात यशस्वी झाली आहे. भारतीय संदर्भातील अनेक मुद्दे समजून घेण्यासाठी ही कविता अत्यंत महत्त्वाची आहे.

या कवितेचे एक वैशिष्ट्य असे की, तिची पहिली मराठी आवृत्ती २०१९ मध्ये आली आणि ती बुकिंगवरच संपली. दुसरी आवृत्ती हातोहात विकली गेली, त्यामुळे तिसरी आवृत्ती लवकरच छापावी लागली. हे सर्व घडले ते बाबासाहेब हे संपूर्ण भारताचे कसे आहेत, हे महत्त्व अधोरेखित करणारी ही कविता असल्यामुळेच. मराठी साहित्यातील ही महत्त्वाची कविता पंजाबी वाचकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने मी तिचा पंजाबी भाषेत अनुवाद केला आहे. कोकणात आज लिहिल्या जाणाऱ्या कवितांमध्ये अजय कांडर यांच्या या कवितेने हिंदी पंजाबी भाषांतरामुळे भारतीय पातळीवर स्वतंत्र स्थान मिळवल्यामुळे त्यांच्या पाठोपाठ लिहिणाऱ्या कोकणातील नव्या कवींना यातून प्रेरणाच मिळणार आहे.”

Related posts

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

उपासमारीसंदर्भातील जागतिक आकडा चिंताजनक

रुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar