📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
मुक्त संवाद

‘नीलमोहर’चा अबोल दरवळ : जयश्री वाघ यांची काव्यसृष्टी

जयश्री वाघ यांच्या ‘नीलमोहर’ कवितासंग्रहातून प्रेम, स्मृती, विरह, माणुसकी, निसर्ग आणि अध्यात्माचे भावविश्व साध्या, रसाळ व अर्थपूर्ण शब्दांत उलगडते.

आजच्या अस्वस्थ, कोलाहलमय जगण्यात माणूस सुखाच्या शोधात स्वतःपासून आणि मातीपासूनही दूर जात असताना जयश्री वाघ यांची ‘नीलमोहर’ कविता मनाला पुन्हा संवेदनांच्या हिरव्या वाटेवर घेऊन जाते. प्रेम, विरह, स्मृती, माणुसकी, सामाजिक विसंगती आणि चिंतनशील अध्यात्म अशा विविध भावछटांना साध्या, रसाळ आणि अर्थसघन शब्दांत गुंफणाऱ्या या कवितांचा दरवळ मोठा गाजावाजा न करता मनाच्या आत खोलवर उतरतो. ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘नीलमोहर’ हा संग्रह म्हणजे शब्दांच्या अलंकारापेक्षा त्यांच्या अंतःस्वरातील माधुर्य आणि जीवनानुभवाची प्रामाणिकता जपणारी जयश्री वाघ यांच्या काव्यप्रतिभेची हळुवार ओळख आहे.

मनीषा उगले

बोलून पाहू शब्द तहाचे / किती दु:ख हे रणांगणावर
चल ताऱ्यांचे तोरण बांधू / पुन्हा मनाच्या नभांगणावर

समकालातल्या सर्वस्तरिय कोलाहलात मनाला शांतता आणि धीर देणारे हे शब्द आहेत कवयित्री जयश्री वाघ यांचे.भौतिक जीवनाच्या आत्यंतिक आहारी जाऊन माणूस आपली सुखे वस्तूंत शोधू लागला आहे खरा, पण त्याने खऱ्या सुखाच्या ऐवजी कमावली आहे ती केवळ अशांतता आणि अस्वस्थताच. एवढ्यातेवढ्याने हताश होणारी आणि एकमेकांपासून तुटत जाणारी माणसे आता मातीपासूनही तुटत चालली आहेत. अशा या व्याकूळ दिवसांत जयश्री वाघ यांच्यासारख्या कवींचे शब्द मनाला आधार देणारे वाटतात. हे शब्द तापलेल्या वाळवंटात तहानेसाठी झरे होतात.

सरळसोप्या, रसाळ आणि तरीही अर्थसघन आशयाच्या वाचकप्रिय कविता लिहिणाऱ्या कवींच्या प्रभावळीतले महत्त्वाचे नाव म्हणजे कवयित्री जयश्री वाघ. त्यांचा ‘नीलमोहर’ हा कवितासंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे.‘नीलमोहर’ प्रकाशित होऊन आता अडीच वर्षे झाली आहेत. या काळात चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरून त्याने आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. संयत, ऋजू स्वभावाच्या कवयित्री जयश्री वाघ यांच्या प्रतिभेच्या प्रांगणात कवितेची लज्जानम्र वल्लरी मुक्तपणे वाढते आणि बहरते आहे. रसिकमान्यता आणि मानसन्मानांची मधुर फळेही तिला लगडून येत आहेत.

ऐश्वर्यसंपन्न तरीही आर्जवी, नम्र अशी शब्दकळा आणि त्यातून साकार होणारा अभिभूत आशय हे जयश्री वाघ यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कमीत कमी शब्दांत व्यापक आशय मांडणारी ही कविता तितकीच समंजससुद्धा आहे. सल एक बिलोरी कायम / पदराला बांधून घ्यावी वाटेवर नियती केवळ / स्वप्नांना उधळत नाही

क्वचितप्रसंगी एखाद्या कवितेचा सूर बंडखोरीचाही लागलेला दिसतो. पण ती बंडखोरी बाह्य बदलांतून व्यक्त होऊ पाहणारी नसून, मानसिक पातळीवरच्या बदलांचे संकेत देणारी आहे.कविता सहज गुणगुणावी असा स्वर शब्दांना मागणारी लयबद्धता हे या संग्रहातील रचनांचे खास बलस्थान आहे. त्यामुळेच एकदोनदा वाचूनही या कविता वाचकाच्या सहज लक्षात राहतात. मूलतःच मृदू प्रकृतीच्या असणाऱ्या या कवितेला कर्कश्शरवाने प्रकट होण्याचे साफ वावडे आहे.

कवींना शब्दांचे ईश्वर म्हटले जाते. मनोमय पातळीवरील प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. पहिल्याच कवितेतून कवयित्री जयश्री वाघ वाचकांना त्यांच्या प्रतिसृष्टीची सैर घडवून आणतात. तिच्यातले कल्पनावैभव वाचकाला चकित करणारे आहे.

पाहा प्राक्तनाच्या छतालाच माझ्या / तुझ्या झुंबरांचे रुपेरी झुले
असो दूर तरीही तुझ्या संगतीने / किती अंतरी या दिवे लागले

कवीजवळ अद्भुत असे कालयंत्र असते. कल्पनेचे पंख लावून तो क्षणात भूतकाळात तर क्षणात भविष्यकाळात विहार करून येतो. स्मृतींच्या कॅलिडोस्कोपमधून ही कवयित्री भूतकाळावर नजर टाकते, तेव्हा नदीकाठच्या एका छोट्याशा गावात व्यतीत झालेल्या गतदिवसांचा मोर तिच्यासमोर रंगीत पिसारा फुलवून उभा राहतो. त्यातले एकेक पीस उघडून ती वाचकालाही दाखवते. नॉस्टॅल्जिक भावावस्थेतून दृश्यमान होत जाणाऱ्या या काही कविता कवयित्रीच्या व्यक्तिमत्त्वाची घडण कशी होत गेली असावी याचे सूचन करतात, त्याचप्रमाणे जगण्यातून निसटून चाललेल्या सांस्कृतिक गतवैभवाबाबतची खंतही व्यक्त करताना दिसतात.

मज केळीच्या पानावरचे जेवण आठवते / शेणसड्याने सारवलेले अंगण आठवते
गर्द जुईचा मांडव माझ्या माहेरी आहे / आंब्याच्या पानांचे हिरवे तोरण आठवते

ही संपूर्ण कविता मुळातून वाचावी अशीच आहे.

आजवर अनेक कवींनी राधा – कृष्णांच्या प्रतिमेच्या आदिबंधातून प्रेमभावनांना शब्दरूप दिले आहे. या कवयित्रिलाही तो मोह आवरलेला नाही. यमुनातिरावरून पाणी भरून लगबगीने घरी जाणाऱ्या राधिकेची वाट अडवणारा कान्हा आणि त्या प्रसंगात निर्माण झालेले नाट्य एका कवितेत अतिशय प्रभावीपणे शब्दबध्द केलेले दिसून येते. प्रेम, प्रणय आणि विरहाच्या असंख्य उत्कट भावच्छटा या संग्रहातील कवितांतून वाचायला मिळतात.

असा श्वास नाही कधी घेतला की / तुझी नाममुद्रा नसे ज्यावरी यांसारख्या मुग्ध ओळी असोत की

तुझ्या रानातले पाहून / हिरवे कोंभ मोहरते
कधी ओलांडल्या नाही / तरी मोहात पाणंदी

अशाही काही ओळी, प्रेम व्यक्त करणारी किती ही सलज्ज, संयत पण सूचक तऱ्हा! तिच्या मोहात पडल्याशिवाय कोण राहील?

या संग्रहातील अनेक ओळी सुभाषितांच्या तोलामोलाच्या आहेत. अनुभवातून आणि चिंतनातून आलेली शहाणीव त्या वाचकाच्या ओंजळीत हार्दिकतेने घालतात.

भंगूर जीवनाचे क्षण फार फार थोडे /
का माणसा तुला ही जाणीव होत नाही

माणसांच्या वेदना, दुःख आणि दारिद्रय पाहून ही कवयित्री व्यथित होते. प्रतिभेच्या अवकाशात मुक्त विहरतानाही तिची मातीशी, समाजाशी असलेली नाळ सुटलेली नाही. विश्ववेदनेचा हुंकार भरणारी तिची कविता मानव कल्याणाची आस बाळगून आहे. कवयित्री एके ठिकाणी म्हणते त्याप्रमाणे ‘कारुण्याच्या रसात शब्दांच्या वाती भिजवून हे कवितारुपी सतीचे धगधगते वाण’ तिने हाती घेतलेले आहे.

माणसाचे दुटप्पी वागणे आणि त्यामुळे सामाजिक जीवनात पदोपदी निर्माण होणारी विसंगती याचे सूक्ष्म निरीक्षण करत त्यावर तीक्ष्ण भाष्य करायला देखील ही कवयित्री विसरत नाही.

‘कुणा मारीते ही भूक / कुणा उदराचा घेर ’ अशा ओळी त्या तगमगीतूनच आलेल्या आहेत.

गझल, वृत्तबद्ध कविता, छंदोबद्ध कविता असे रचनेचे विभिन्न प्रकार कवयित्रीने लीलया हाताळले आहेत. अभिव्यक्तीचा नैसर्गिक डौल सांभाळताना आशयात कृत्रिमता डोकावणार नाही याचीही ती काळजी घेताना दिसते. जागोजागी अनुप्रासांचा खुबीने केलेला वापर त्या कवितांचे लालित्य खुलवणारा आहे.

मनाचे पान हलते चार शब्दांनी /
उगा ती बोलते का बोलण्यासाठी

व्यक्त होण्यासाठी हे साधेसरळ प्रयोजनही कवयित्रिला पुरेसे वाटते.

कवयित्री जयश्री वाघ यांची काव्यप्रतिभा विलक्षण खरीच, त्याहून स्तिमित करणारे आहे ते त्यांच्या लेखणीतून अवतरणारे कसदार शब्दवैभव! या शब्दांना अलंकारांचा सोस नसला तरी अंगभूत माधुर्य, प्रासादिकता आणि अर्थवाहिपणा यांच्या अनुपम मिलाफातून त्यांची कविता अलौकिकाची उंची गाठते. त्यांच्या ऐहिकाच्या जाणिवांना चिंतनशील अध्यात्माची अविचल बैठक आहे, त्याचा प्रत्यय या संग्रहातील कविता वाचताना निरंतर येत राहतो. मानवी भावभावनांना याच पारलौकिक अवस्थेतून त्या तटस्थपणे तपासू पाहतात.

जयश्री वाघ यांची कविता महत्त्वाकांक्षी नाही. ती स्वतःत रमणारी, अल्पसुखात संतोष पावणारी आहे. उसने पंख घेऊन मोठ्या भराऱ्या घेण्यापेक्षा फुलपाखरू होऊन रानफुलांवर बागडणे तिला अधिक प्रिय आहे.

‘शब्दांच्या पायांत अर्थांचे चाळ बांधून’ कवितारूपाने आपल्या उत्कट भावभावनांना मुखर करणाऱ्या या गुणी कवयित्री जयश्री वाघ यांना उज्ज्वल यशकीर्ति लाभो आणि यापुढेही त्यांच्या हातून अशीच दर्जेदार साहित्यनिर्मिती घडत राहो या सदिच्छा.

पुस्तकाचे नाव – ‘नीलमोहर’ (कवितासंग्रह)
कवयित्री : जयश्री वाघ
प्रकाशक ः ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे : ९२ मूल्य : १५०/-
पुस्तक खरेदीसाठी संपर्क – https://granthali.com/product/book_nilmohar/

Related posts

मधुभाईं म्हणजे आनंदाचा सागर

Saloni Art : असे रेखाटा बेडकाचे थ्रीडी चित्र…

‘स्व’ च्या शोधातील कविता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar