📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
मुक्त संवाद

करोडो बिया पेरल्या, जंगल हिरवं झालं… पण वेड्या बाभळींनी सरकारलाच वेड लावलं!

कोट्यवधी बिया आणि सीड बॉलच्या मोहिमेतून जंगल हिरवं झालं; पण वेड्या बाभळींच्या वाढीने निसर्गाचा समतोलच बिघडला. वृक्षलागवडीतील नियोजनाच्या अभावावर उपरोधिक भाष्य.

झाडांची संख्या वाढली म्हणजे जंगल समृद्ध झालं, असा समज एखाद्या सरकारला किती महागात पडू शकतो? कोट्यवधी बिया गोळा करायच्या, त्यांचे सीड बॉल बनवायचे, हेलिकॉप्टरमधून जंगलभर फेकायचे आणि नंतर उगवलेल्या रोपांची संख्या मोजून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची—या ‘वेड्या वृक्षप्रेमा’चा शेवट मात्र जंगलावर वेड्या बाभळींच्या कब्जात झाला! ज्या मोहिमेत निसर्गाचा समतोल साधायचा होता, त्याच मोहिमेने काटेरी झुडपांचा असा विळखा घातला की वन्यप्राणी त्रस्त झाले, माणसांची वाट अडली आणि अखेर सरकारलाच ‘हाकही मारता येईना अन् बोंबही मारता येईना’ अशी अवस्था आली. ही केवळ एका वृक्षलागवड मोहिमेची उपरोधिक कथा नाही; तर निसर्ग संवर्धनात ‘किती झाडं लावली?’ यापेक्षा ‘कोणती झाडं लावली आणि ती कुठे लावली?’ हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे, याची बोचरी जाणीव करून देणारा अनुभव आहे. पर्यावरण संवर्धन करताना शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवे हाच या मागचा उद्देश आहे.

निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी ,
मंडळ कृषी अधिकारी,लासूर स्टेशन,गंगापूर,
जि.छत्रपती संभाजीनगर.9423180393,8668779597

‘ वेडं वृक्षप्रेम!’

स्वयंभू संस्थान सरकारने पर्यावरणाचा समतोल राहावा,निसर्गाबरोबर अन्याय अत्याचार नको अन् तो ठीक तर सगळं जग ठीक या व्यापक जनकल्याणाच्या भावनेतून प्रचंड वृक्ष लागवड करण्याची संस्थानभर व्यापक मोहीम उभारली. वृक्ष लागवड म्हणजे पावसाळ्यातच झाडांची लागवड करायची ह्या परंपरागत पद्धतीला संस्थानाने कधीच छेद देऊन टाकला!

वृक्षांची लागवड जर का संख्यात्मक वाढवायची असेल तर परराज्यातील कामगारांच्या संस्थानात आलेल्या टोळ्यांना बरोबर घेऊनच मोहीम फत्ते करूया असा दृष्टिकोन ठेवून स्वयंभू सरकारने त्यांना उत्तम मजुरीची ऑफर दिली.“प्रत्येक गावागावात जाऊन शक्य तितक्या झाडांच्या बिया गोळा कराव्या आणि तिथल्या एका होतकरू स्वयंसहाय्यकाकडे जमा कराव्यात.यातूनच जो चांगलं काम करेल अशांच्या पाल्यांना सुद्धा आमचे संस्थान सरकारी नोकरीत प्राधान्य देईल.”अशा देखील सूचना देण्यात आल्या. संस्थानाच्या प्रेसिडेंटांचा फतवा कळल्याबरोबर लगेचच कामगारांनी गावागावात जाऊन सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एकच बिया गोळा करायचा धंदा सुरू केला! संख्यात्मकच वाढ करायची म्हणल्यावर कामगारांनी झाडे आणि झुडपे असं वेगळं कशाला काय म्हणून अगदी रुई-तरवडापासून तर थेट तणांपर्यंत मजल मारली ! संस्थानात एक तर पहिलेच बोरी बाभळी सारख्या काटेरी झाडांचा सुळसुळाट अन् त्यांच्याच बिया जास्त ! त्यातल्या त्यात ‘वेडी बाभळ’ हा एक परदेशातून संस्थानात घुसखोरी केलेला महान वृक्ष ज्याला कोणता प्राणी तोंड लावत नाही, ज्याचा काटा गाडीचा टायर कितीही भारीतल्या कंपनीचा असू द्या अन्याय अत्याचार न जुमानता तो अलगदपणे त्या टायरात घुसल्याशिवाय राहत नाही आणि यदाकदाचित मनुष्य प्राण्याला तो काटा नुसता वरवर ओरखडला तरी विषारीजन्य आग तासंतास झाल्याशिवाय राहत नाही अशी त्या बाभळीची महती ! त्यातल्या त्यात बिया गोळा करणाऱ्यांसाठी सर्वात सोप्पं काम म्हणजे वेड्या-शहाण्या बाभळीची एक शेंग जरी गोळा केली तरी पंधरा-वीस बियांचा ऐवज एका झटक्यात सापडणार म्हणून संस्थानातल्या सर्वच शहाण्या अन् वेड्या बाभळींखाली कामगारांनी स्वच्छ संस्थान मिशन राबवल्यासारखं एक सुद्धा बी शिल्लक ठेवलं नाही! शेण लावून सीड बॉल अन् शेंगा बॉल सुद्धा त्यांनीच बनवून दिले.

मे महिन्याच्या शेवटी सर्वच गावांचे संख्यात्मक अहवाल प्रेसिडेंट ऑफिसला बोलावले. झाडांच्या जाती प्रजातींपेक्षा संस्थानाला झाडांची संख्या वाढवायची म्हणून एकत्रित रिपोर्टमधील कोट्यावधीचा आकडा बघून प्रेसिडेंटांचा अन् त्यांच्या वनमंत्र्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला! पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच हेलिकॉप्टरने बियाणे चेंडू (सीड बॉल, शेंगा बॉल ) जंगलात सर्वत्र फेकायचा कार्यक्रम सुद्धा आखला! चांगल्या कामाला उशीर कशाला म्हणून शेजारच्या संस्थानातले राजे फेकोजी यांनाच बियाणे फेकायला निमंत्रित केलं. ठरल्याप्रमाणे संस्थानभर फेकाफेकी कार्यक्रम पावसाळ्या अगोदर आटोपल्याचं समाधान सरकारला मनोमन वाटलं!

यावर्षी पाऊस मात्र वेळेवर आला. शेतातल्या पेरण्यांसोबतच संस्थानातल्या जंगलांत फेकलेले सीड बॉल सुद्धा प्रेसिडेंट डेंगणे सरकारला तितकेच महत्त्वाचे होते. प्रेसिडेंट कार्यालयाकडून वनमंत्र्यांना वारंवार याबाबत विचारणा होत होती. त्याप्रमाणे वनमंत्री कार्यालय देखील खालून माहिती घेऊन वर प्रेसिडेंट कार्यालयाला रिपोर्ट देताना,
१.“फेकलेल्या एकूण बियाण्यांचा अहवाल…”
२. “फेकलेल्या बियाण्यांपैकी पहिल्या पावसानंतर उगवलेल्या एकूण रोपांचा अहवाल.”
३.“ जुलै…महिनाअखेर एक फुटापेक्षा वाढीस लागलेल्या एकूण रोपांचा अहवाल”
४.“वर्ष अखेर सुस्थितीत वाढ झालेल्या एकूण रोपांचा अहवाल.”

असे एकामागून एक अहवाल येत गेले. जोमाने वाढीस लागलेल्या संस्थानातील एकूण रोपांची संख्या बघता प्रेसिडेंट वन कार्यालयावर एकदम जाम खुश झाले! अन् लगेच त्यांनी संस्थानात हवाई दौरा आखला. प्रत्यक्षात वरून खाली जबरदस्त हिरवाई बघताना त्यांना एकदम धन्य धन्य झाल्यासारखं वाटत होतं. वर्षभरातच संस्थानातल्या जंगलांवर वेड्या बाभळींनी कब्जा केला !

जंगलात साधं कोणाला घुसताही येईना! काटेरी झुडपांनी सर्वच जंगली प्राणी त्रस्त होऊन शेजारच्या राजे फेकोजी यांचे संस्थानाकडे पळ काढू लागले…………तिथल्या जनतेला प्राणी येऊ लागल्याचं मूळ कारण काटेरी झाडांमुळे त्रस्त झाल्याचं समजलं. प्रकरण अंगलट आलं. सदर लागवडीला आपल्याच राज्याचे राजे फेकोजी गेल्याचं सुद्धा समजलं अन् तिथं एकच हाहाकार उडाला! त्यांचं सरकार डळमळायला लागलं. काही देणं-घेणं नसताना उद्घाटन फुशारकीच्या नादात अविश्वासाची टांगती तलवार त्यांच्यावर लोंबकळू लागली! ‘आग रामेश्वराला लागलेली बोंब मात्र सोमेश्वराला’ उठलेली होती! ……. राजे फेकोजींना प्रचंड जनक्षोभास सामोरं जावं लागलं. इथून पुढं असा पाहुणे जाऊन काही गरज नसताना ‘आ बैल मुझे मार’ असा अगुचरपणा करण्यापेक्षा कानाला खडा लावलेला बरा ‘इथून पुढं असं काही झालं तर राजसंन्यासाची प्रतिज्ञा देखील त्यांनी घेतली’ त्या संपूर्ण वर्षात पाऊसमान झाडांच्या वाढीसाठी खूपच पोषक होतं! या ना त्या मार्गाने स्वयंभू सरकारचं वेडं वृक्षप्रेम अंगलट आलेलं होतं. परंतु आता काय करता?हाकही मारता येईना अन् बोंब सुद्धा! अशी अवस्था प्रेसिडेंटांची झालेली होती !

जंगलातल्या नद्या नाले सर्वच ओसंडून वाहत होते म्हणून सुरू असलेला पावसाळा संपल्याशिवाय काटेरी झाडांच्या विरोधात स्वयंभू सरकारला काहीच हालचाल करता येईना मात्र तोपर्यंत वनमंत्रांच्या मदतीने वेड्या बाभळी उपटून कायमस्वरूपी नष्ट करण्याचं टेंडर सरकारने ताबडतोब फ्लोट केलं ………घडाई पेक्षा मोडाई एक हजार एक टक्का जास्तच खड्ड्यात घालणारी होती!

(ताजा कलम: पडीक,बेवारस शेतजमिनी, रस्त्याकडेवरचे साईड गटर पट्टे ,नदीकाठचा प्रदेश तसेच नव्याने जंगलांमध्ये प्रचंड शिरकाव केलेल्या वेड्या बाभळींची संख्या बघता खूपच वाईट वाटतं…..)

Related posts

भारतात आता कागदी नोटा ऐवजी प्लॅस्टिक नोटा ? Polymer Banknotes in India

पुरुष घरचा आणि बाहेरचा सारखाच

डॉ. श्रीकांत पाटील यांच्या नाट्यछटा प्रयोगक्षम

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar