📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

४५ वर्षे हजारो बालकांच्या भविष्याला आकार; ‘तारा मोबाईल क्रेशेस’चा प्रेरणादायी कौतुक सोहळा

स्थलांतरित बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी ४५ वर्षांपासून कार्यरत तारा मोबाईल क्रेशेसचा वार्षिक कौतुक सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि प्रेरणादायी मार्गदर्शन.

पुणे : बांधकाम साइटवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना सुरक्षित बालपण, पोषण, आरोग्य आणि शिक्षणाची संधी देण्यासाठी गेली ४५ वर्षे कार्यरत असलेल्या तारा मोबाईल क्रेशेस, पुणे (TMCP) संस्थेचा वार्षिक कौतुक सोहळा शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सिम्बायोसिस ऑडिटोरियम, विमाननगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या सोहळ्यास महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्याचे उपआयुक्त (नियंत्रण मंडळ) राहुल मोरे आणि भारतीय हवाई दलाचे माजी एअर मार्शल सुनील सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा मधुरा गोखले, संचालिका शर्मिला ब्रह्मे, निशा मेहता, समीर मेहता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेतील मुलांनी मल्लखांब, योगाची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. प्रकल्प प्रमुख नेहा घाणेकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आणि सध्याच्या कार्याचा आढावा घेतला.

मोबाईल क्रेशची सुरुवात १९६९ मध्ये दिल्ली येथे झाली असून पुण्यात त्याची शाखा १९८० मध्ये सुरू झाली. ‘प्रत्येक मूल आनंदी, निरोगी, सुरक्षित आणि जबाबदार नागरिक व्हावे’ हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

पुणे आणि परिसरातील बांधकाम साइटवर स्थलांतरित कुटुंबांतील मुलांसाठी संस्थेमार्फत सध्या २१ डे-केअर सेंटर चालविले जात आहेत. जन्मापासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित वातावरण, पोषक आहार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि खेळाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. मुलांच्या वयोगटानुसार विविध विकासात्मक उपक्रम प्रशिक्षित कार्यकर्त्यांमार्फत राबविले जातात.

कुपोषित मुलांकडे विशेष लक्ष देत दर महिन्याला आरोग्य तपासणी केली जाते. आवश्यकतेनुसार औषधोपचार आणि पोषक आहार उपलब्ध करून दिला जातो. मुलांच्या विकासासाठी केवळ त्यांच्यासोबतच नव्हे, तर त्यांच्या पालकांसोबतही संस्था सातत्याने काम करते. संरक्षण, वाढ आणि विकास, शिक्षण आणि बालहक्क या विविध अंगांचा समावेश असलेला एकात्मिक कार्यक्रम संस्थेमार्फत राबविला जात आहे.

अधिक गरजू मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेने २०२४-२५ पासून BRICKS (Building Resilience, Intelligence in Childhood Knowledge and Skills) हा प्रकल्प सुरू केला आहे. मावळ तालुक्यातील पाच वीटभट्ट्यांवर सुमारे १२५ मुलांसाठी शिक्षण, पोषण आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत.

पुण्यातील अनेक प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या साइटवर सध्या संस्थेची पाळणाघरे सुरू आहेत. देणगीदार, CSR भागीदार, हितचिंतक तसेच विविध तज्ज्ञ संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्यामुळे संस्थेचे हे कार्य सातत्याने सुरू आहे. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, मुलांची सुरक्षित वाहतूक करणारे सेवक आणि विविध संस्थांचे स्वयंसेवक यांचेही या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

कार्यक्रमात इयत्ता दहावीमध्ये उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ‘श्रीमती सिंधुताई सावर्डेकर पुरस्कार’, तर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘श्री. रामकुमार राठी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या चार विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी राहुल मोरे म्हणाले, “फिल्डवर काम करणाऱ्या ताईंचा सन्मान महत्त्वाचा आहे. NGO आणि सरकारी योजना यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. मुलांच्या हक्कांसाठी शासनाच्या योजना मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी म्हणून जिथे शक्य असेल तिथे नक्की मदत करेन.”

एअर मार्शल सुनील सोमण यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “TMCP ने तुमचा हात धरला आहे, ही देवाने दिलेली संधी समजा; पण देव त्यांनाच मदत करतो जे स्वतः प्रयत्न करतात,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, मेहनत आणि समर्पण हे उज्ज्वल भविष्यासाठीचे चार आधारस्तंभ असल्याचे सांगितले. देणगीदारांनी दिलेली मदत ही केवळ आर्थिक नसून आशेची दारे उघडणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी दररोज चिंतन, वाचन आणि व्यायाम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

संस्थेच्या अध्यक्षा मधुरा गोखले म्हणाल्या, “संस्था ही जगन्नाथाच्या रथासारखी आहे. एकट्याने रथ ओढता येत नाही. देणगीदार, पालक, संस्थेचा स्टाफ, बिल्डर आणि शिक्षक या सर्वांनी हातभार लावल्याशिवाय हा रथ पुढे जाणार नाही. पालक आणि संस्था एकाच दिशेने प्रयत्न करतील, तरच मुलांच्या भविष्याला खरी गती मिळेल.” त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचेही कौतुक केले.

कार्यक्रमात सर्व डे-केअर सेंटरवर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मंचावर बोलावून विशेष सत्कार करण्यात आला. काही माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून उपस्थित मुलांना प्रेरणा दिली. सूत्रसंचालन डे-केअर सेंटरमधील तीन विद्यार्थ्यांनी केले, तर प्रोग्रॅम सपोर्ट टीमच्या कोऑर्डिनेटर कीर्ती खंदारे यांनी आभार मानले.

Related posts

मसूराच्या एमएसपीत 500 तर मोहरीत 400 रुपयांची वाढ

नवदुर्गाः सोशिकतेला स्वतःची शक्ती बनवून स्वतःला सिद्ध करणारी ॲड. सुदर्शना जगदाळे

महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar