June 2, 2025
Rapid growth of ice cream market in India
Home » भारतातील आईस्क्रीम बाजारपेठेची वेगवान वाढ !
विशेष संपादकीय

भारतातील आईस्क्रीम बाजारपेठेची वेगवान वाढ !

एप्रिलमध्ये सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात उन्हाळ्याचा जास्त चटका बसण्यास प्रारंभ झाला आहे. भारताच्या राजधानीत तर 52.4 अंश तापमान असून दिल्लीकर भाजून निघत आहेत. स्वाभाविकच या उन्हाळ्याची तिव्रता कमी करण्यासाठी थंडगार शीतपेये, सरबते तसेच कोणत्याही वेळेला आईस्क्रीम खाण्याच्या सवयीमध्ये चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळेच उन्हाळ्याचा ताप वाढत असताना आईस्क्रीम उत्पादक कंपन्या मात्र त्यांच्या व्यवसायात उत्तम वाढ करत असून यावर्षी त्यांच्या धंद्यात किमान 25 ते 30 टक्के वाढ होत असल्याचे गेल्या दोन महिन्यातच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा आईस्क्रीमचा धंदा तेजीत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आईस्क्रीमच्या धंद्यावर विपरीत परिणाम झालेला होता. भारतातील आईस्क्रीम बाजारपेठेतील संघटित क्षेत्राचा वाटा सध्या 22 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याचप्रमाणे असंघटित शेकडो स्थानिक ब्रँड सर्वत्र उपलब्ध असतात. या असंघटित क्षेत्राची वेगळी 10 हजार कोटी पेक्षा जास्त मोठी बाजारपेठ आहे. राष्ट्रीय पातळीवर सध्या 100 ते 120 नामवंत आईस्क्रीमचे ब्रँड आहेत. त्यात मदर डेअरी, क्रीम बेल, दिनशा, वाडीलाल, क्वालिटी वॉल्स, बास्किन रॉबिन्स अरुण आईस्क्रीम, लोट्टे इंडिया (हॅवमोर ब्रँड), डेअरी क्लासिक, गियानी, हॅगन डॅझ, यम, ग्राव्हिस फूडस, नॅचरल्स, निरुलाज्, रामाणी कंपनीचे टॉप एन टाऊन, ट्रीट व अमूल हे मोठे, मध्यम आकाराचे आईस्क्रीम उत्पादक आहेत.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन यांचा “अमूल ” ब्रँड भारतात अग्रगण्य आहे. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे अमूलचे उत्पादन 100 टक्के दुग्धजन्य व संपूर्ण शाकाहारी स्वरूपाचे आहे. या आईस्क्रीम मध्ये वापरण्यात येणार सर्व खाण्याचे रंग, स्टॅबिलायझर्स, इमल्सीफायर्स, ॲडेटिव्हज् शंभर टक्के शाकाहारी असल्याने त्यास देशभराच्या काना कोपऱ्यातून सर्वाधिक मागणी आहे. भारतातील सुमारे 40 टक्के बाजारपेठ अमूलने काबीज केलेली आहे. संपूर्ण देशात पंधराशे पेक्षा जास्त शहरांमध्ये अमूल पार्लर आहेत. या कंपनीची आजची उलाढाल 72 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

“हृदयाचा” आकार असलेल्या ‘क्वालिटी वॉल्स’ या आईस्क्रीमचा त्याखालोखाल लोकप्रिय ब्रँड असून 1993 पासून ही कंपनी भारतीय बाजारपेठेत आहे.त्यांची उलाढाल 7 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा 16 ते 17 टक्क्यांच्या घरात आहे. देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर ‘वाडीलाल’ आईस्क्रीम असून त्यांचे गांधीनगर, गुजरात आणि बरेली, उत्तर प्रदेश येथे तीन उत्पादन प्रकल्प आहेत. 1907 मध्ये सुरू झालेली ही कंपनी आहे. ही कंपनी दररोज 8 लाख पेक्षा जास्त आईस्क्रीम कपचे उत्पादन करते व त्यांची उलाढाल 900 कोटी रुपयांच्या घरात आहे.

भारतीय बाजारपेठेतील त्यांचा वाटा 12 ते 13 टक्क्यांच्या घरात आहे. त्या खालोखाल ‘मदर डेअरी’ या कंपनीचा ब्रँड लोकप्रिय असून त्यांची बाजारपेठ 8 टक्क्यांपेक्षा जास्त असून उलाढाल 15 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. 1974 मध्ये या कंपनीचा ब्रँड बाजारात आला. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) यांची उपकंपनी आहे. भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या मालकीची ही वैधानिक संस्था असून दूध, दुग्धजन्य पदार्थ खाद्यतेले, फळे यांचे उत्पादन व विक्री करते. बंगलोर येथे त्यांचा उत्पादन प्रकल्प आहे व मुख्यालय नॉयडा येथे आहे.

उत्तर अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या ‘बास्किन रॉबिन्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीने भारतात 1993 पासून बस्तान बसवले असून त्याचा उत्पादन प्रकल्प पुण्यात आहे. 1953 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे बर्ट बास्किन व ईरव्ह रॉबिन्स यांनी स्थापन केलेली ही कंपनी आहे. 31 प्रकारची विविध चवीची आईस्क्रीम हा त्यांचा लोकप्रिय ब्रँड असून देशातील पाचव्या क्रमांकाचा बँड आहे. देशभरातील 200 शहरात व सुमारे 800 पेक्षा जास्त दुकानांमध्ये या ब्रँडची विक्री केली जाते.

याशिवाय 1932 पासून दिनशॉ बंधूंनी सुरू केलेला ‘दिनशॉज’ हा आईस्क्रीम ब्रँड ही खूप लोकप्रिय आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे आणि देशातील बारा पेक्षा जास्त राज्यांमध्ये तो उपलब्ध आहे. हाताने तयार केलेले आईस्क्रीम म्हणून दिनशॉचा देशात प्रारंभ झाला होता. या कंपनीची उलाढाल 500 कोटी रुपयांच्या घरात आहे.

भारतीय बाजारपेठेत काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचाही अनेक वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.’ ‘हॅवमोअर’ नावाचा आईस्क्रीम ब्रँड गेल्याच वर्षी भारतात आला. दक्षिण कोरियातील लोटे कन्फेक्शनरी कंपनीचा हा ब्रँड आहे. गुजरात मधील त्यांचा प्रकल्प 120 टकके उत्पादन क्षमतेने चालत आहे. दरम्यान यापैकी कोणत्याही कंपन्यांनी त्यांचे सध्याचे दर वाढवलेले आढळत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या या क्षेत्रात फारशी भाववाढ झालेली दिसत नाही.

वरील प्रमुख ब्रँडच्या तुलनेमध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये स्थानिक पातळीवर तयार होत असलेले आईस्क्रीमचे ब्रँड खूप लोकप्रिय आहेत.त्यांची बाजारपेठ हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. आईस्क्रीमच्या जोडीलाच स्थानिक पातळीवर ‘मस्तानी’ सारखे आईस्क्रीम व मिल्कशेकचे संयुक्त प्रकार खूप लोकप्रिय आहेत. पुण्याच्या सदाशिव पेठेतील कोंढाळकर यांची ‘मस्तानी’ खूपच लोकप्रिय असून ती अनेक दशके पुणेकरांची सर्वाधिक पसंतीची ठरली आहे. आता तर तिचा विस्तार शहराच्या विविध भागांमध्ये झालेला आहे. एका अर्थाने आईस्क्रीमची ही भावंडे ही देशभरात खवय्यांमध्ये लोकप्रिय होत असल्याचे दिसून येते. ही असंघटित बाजारपेठही दरवर्षी किमान 25 ते 30 टक्के वेगाने विस्तारित असून प्रति वर्षी 15 ते 17 हजार कोटी रुपयांची त्यात भर पडत होत आहे.

प्रा. नंदकुमार काकिर्डे
(लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading