September 24, 2023
God Bless you article by Rajendra Ghorpade
Home » देव तारी त्याला कोण मारी…
विश्वाचे आर्त

देव तारी त्याला कोण मारी…

परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. मन हे इतके चंचल आहे. मन परिवर्तन इतक्या झपाट्याने होऊ शकते. मनातील याच बदलाचा विचार करून आपणातही असे सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. यासाठी मन चांगल्या विचारात गुंतवायला हवे. चांगली संगत आपल्यात सकारात्मक बदल घडवू शकते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

होय अदृष्ट आपैतें । तै वाळूचि रत्नें परते ।
उजू आयुष्य तें मारितें । लोभु करी ।। 22 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – दैव जर अनुकुल झालें, तर वाळूची रत्ने होतात. अथवा जर आयुष्य अनुकुल असेल तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो.

एका चित्रकाराला मारण्याची सुपारी एका गुंडाला मिळाली. चित्रकाराची हत्या करण्याच्या उद्देशाने तो गुंड त्याच्या घरी गेला. त्यावेळी तो चित्रकार कॅनव्हासवर सुंदर चित्र रेखाटत होता. त्याचे चित्र शेवटच्या टप्प्यात होते. ते अपूर्ण चित्र पाहूनच तो गुंड थक्क झाला. हे अर्धवट चित्र आत्ताच इतके सुंदर दिसते मग पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसेल याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. चित्रकार चित्रात तल्लीन होऊन ते रेखाटत होता. हे दृश्य तो गुंड पाहातच बसला. चित्रकाराची हत्या करण्यासाठी आपण इथे आलो आहोत हेच तो विसरून गेला. चित्रकाराचे ते चित्र पाहून तो त्याची हत्या न करताच माघारी फिरला. हत्त्या करण्याच्या विचारापासून तो परावृत्त झाला. इतकेच नव्हे तर त्यालाही त्या कलेचा नाद लागला. अन् त्याने चक्क गुंडगिरी सोडून चित्रकारितेचा व्यवसाय सुरु केला. असा बदल त्याच्यात झाला. असे चमत्कार आपण बऱ्याचदा पाहीलेले आहेत. देव तारी त्याला कोण मारी.

परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. मन हे इतके चंचल आहे. मन परिवर्तन इतक्या झपाट्याने होऊ शकते. मनातील याच बदलाचा विचार करून आपणातही असे सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. यासाठी मन चांगल्या विचारात गुंतवायला हवे. चांगली संगत आपल्यात सकारात्मक बदल घडवू शकते. दुष्टाच्या मनातील दुष्ट दुर करण्याचा विचार माऊलीने मांडला आहे. दुष्ट व्यक्तीला ठार मारून दुष्ट विचार कधीही मरत नाही. कोणाला मारून त्याचा विचार मारता येत नाही. यासाठी मनपरिवर्तन हाच एकमेव त्यावरील उपाय आहे. गुन्हेगारी संपवायची असेल तर गुन्हेगारीचा विचार गुन्हेगारांच्यामधील घालवायला हवा. तो विचारच त्याच्या मनात येणार नाही असा सकारात्मक बदल करायला हवा. माणसात माणुसकी भरल्यास सर्वत्र आनंदी आनंद पाहायला मिळेल.

रत्न म्हणजे एक प्रकारचा दगडच. पण त्या दगडात रत्न आहे हे समजायला हवे. शोधायला हवे. दैव जर अनुकुल असेल तर या दगडातही रत्न मिळू शकते. एखाद्या गरीबाला अशी रत्नाची खान मिळाल्यानंतर त्याचे आयुष्यच पालटते. नशीबाची साथ असेल तर कितीही संकटे आली तरी त्यातून तो तारून जातो. अपघातात चमत्कारीकरित्या वाचलेल्या अनेकांची उदाहरणे आपणास देता येऊ शकतील. पाण्याचा शोध घेण्यासाठी खड्डा खोदला पण कितीही खोल गेले तरी त्याला पाणी लागले नाही. पण एखाद्याला एक फुटावरच चक्क दगडात पाणी मिळते. दैव अनुकुल असेल तर काहीही चमत्कार होऊ शकतो. नशीबाची साथ मिळाली तर आयुष्याचे कल्याण होऊ शकते.

सद्गुरुंनी आपणास ब्रह्मसंपन्न करण्याचा निश्चय केला असेल. तसा आर्शिवाद त्यांनी दिला असेल तर आपली इच्छा असो नसो आपणास ब्रह्मसंपन्नता येते. आयुष्यात काय वाढून ठेवले आहे ते मिळणारच. पण ते मिळणार असे भविष्य कोणी सांगितले म्हणून आपण त्या आशेवर कधी जगायचे नसते. आपण आपले प्रयत्न सोडायचे नसतात. प्रयत्नाअंती परमेश्वर हे सुद्धा लक्षात ठेवायला हवे. जीवनात आपणाला मिळायचे ते मिळणारच पण ते मिळणार म्हणून आपण गप्प बसायचे हे सुद्धा योग्य नाही. आशा जरूर असावी पण प्रयत्न, कष्ट हे करावेच लागतात. ते कधीही सोडायचे नाहीत. दैव अनुकुल असेल तर तो लाभ आपणाला होईलच पण प्रयत्न हे करायलाच हवेत.

Related posts

आत्मज्ञानानेच होतो संसारवृक्ष नष्ट

ज्ञानेश्वरीच्या ज्ञानातून मराठी भाषेचे संवर्धन

अध्यात्मात आपणच आपली प्रतिमा ओळखायची असते

Leave a Comment